Thursday, September 22, 2016

कावळे आणि पितृपक्ष

आजपासून कोणाच्या खिडकीवर भीक मागायला जायला नको ,आणि नको त्या कोळिणीच्या शिव्या खायला ,सकाळी उठल्या उठल्या पंख फडकवत आणि आपली काळीभोर चोच दगडाला घासत त्याने विचार केला .होय ,पितृपक्ष सुरु झाला होता .नेहमीच त्याला हाड हाड करणारे आजपासून पंधरा दिवस तरी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणार होते .अर्थात त्याला खाण्याची कमतरता कधीच नव्हती.पण सकाळी 7 ला उठून स्मशानात उडत जाणे फार कंटाळवाणे काम होते त्याच्यासाठी ,शिवाय मेन्यूहि ठरलेलाच असायचा ,त्यामुळे तिथे जाण्यापेक्षा चालत  जाणाऱ्या कोळिणीच्या डोक्यावरील पाटीमधून एखादा रसरशीत मासा काढणे आवडायचे त्याला .शिवाय सकाळचा व्यायाम हि होतो त्यामुळे .
त्याने नेहमीची काव काव आरोळी ठोकत हवेत सूर मारला ,एका इमारतीच्या गच्चीवर राजासारखा उतरला ,समोर दोन पाने होती .एक बहुतेकम्हातारा असावा  ,कारण पानात पालेभाज्यांच जास्त दिसत होता ,दुसरा मात्र दारू पिऊन गेला असावा ,शेजारी वाटीत थोडी दारू दिसत होती ."काय साली माणसे आहेत ,निदान एक  क्वार्टर तरी ठेवायची " तो चिडला आणि निषेध म्हणून म्हाताऱ्यांच्या पानातले वरण भात खाऊन उडाला ."बघा बघा ,पाहिलेत ना ह्या बेवाड्याच्या पानाला कावळेहि शिवायला तयार नाही ,जिवंतपणी त्रास दिला मरणानंतर हि पिच्छा सोडत नाही " एक स्त्री पुटपुटली .त्याने तुच्छतेने काव काव करून दुसरीकडे प्रस्थान केले .एके ठिकाणी खूप गर्दी दिसली तो खुश झाला ,बहुतेक पंचपक्वान्न असतील म्हणून आनंदाने सूर मारला .पण जवळ जाताच एक शांतता दिसून आली ,हे काय पानाच्या बाजूला बंदूक ,आणि पदके? तो अजून जवळ गेला ,त्याला पाहून जमलेली लोक खुश झालेली दिसली "आला आला ,हा नक्कीच शिवेल "गर्दीतून आवाज  .पण हे काय तो  चित्काराला' "अरे ,हा तर शाहिद झालेला सैनिक आहे ? काश्मीर मधील अतिरेक्यांशी लढताना शाहिद झालेला हा कोवळा सैनिक आहे ??याला कशी मुक्ती देऊ मी ?? अरे हा स्वतःच अजून अतृप्त आहे ? देशासाठी फार काही करू शकलो नाही याचे दुःख मनात ठेवून गेला आहे  . मग याला कशी शांती देऊ ? आमच्या कावळे संघाने ठरविले आहे कि दहशदवाद्यांशी लढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या पिंडास शिवायचे  नाही  कारण त्यांना अतृप्तच राहायचे आहे .जोपर्यंत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या अतिरेक्यांचे आणि दहशदवादी संघटनांचे उच्चाटन होत नाही तो पर्यंत आमच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही असे तेच म्हणतात ना ?? म्हणूनच कोण कावळा आला नाही .त्यांच्या मतांचा आदर केलाच पाहिजे ,माफ कर बाबा इच्छा असूनही मला तुला शांती देता येत नाही .अरे तुझ्या पानाला शिवलो तर तुला शांती मिळेल, पण माझे काय ? मी आयुष्यभर अतृप्तच राहीन ना ?.परत फिरून त्याने वर सूर मारला पण त्या पंख फडकविण्यात उत्साह दिसत नव्हता .एका पराभूत योध्यासारखा आपल्या ठिकाणाकडे परतला .

No comments:

Post a Comment