Thursday, September 8, 2016

गणेशाचे दुखणे

"बाबा ,आज जायलाच पाहिजे का "? गणेश थोड्या नाखुषीनेचे बोलला "अरे बाळा हा रिवाज आहे ,दरवर्षी 10 दिवसाची रजा मंजूर होते ना तुला ,नाहीतर आम्ही बघ ,फक्त एकच दिवस जाऊन येतो "महादेव हसून म्हणाले ."तसे नाही हो बाबा , पूर्वी छान होते जाण्याचा दिवस जसजसा जवळ यायचा तेव्हा किती हुरहुर व्हायची ,कधी एकदा जातो आणि माझ्या भक्तांना भेटतो असे व्हायचे " काय तो टाळ मृदूंगचा ठेका धरत म्हटलेली आरती ,डोक्यावर टोपी घालून माझ्या पुढे नतमस्तक होणारे आबालवृध्द, भरजरी शालु ,पैठणी नेसून ,साजशृंगार करून हातात ओवळणीचे तबक घेऊन वाट पाहणाऱ्या माझ्या माता बहिणी ,सभोवताली दरवळणारा धूप ,स्वच्छ नीटनेटके आसन ,सर्व काही छान होते "गणेश  भावनावश होऊन बोलत होता .मग आता ?? महादेवनी थोडे हसून विचारले "काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते .हल्ली काहीजण 2/3 दिवस आधीच मला न्यायाला येतात का ?? तर म्हणे ट्रॅफिक असतो ,आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही "अरे तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का ?? बरे तिथे नेऊन तोंडावर रुमाल टाकून बसवतात मग कोणी लक्ष देत नाही ,साधे खायला पण देत नाहीत ,समोर बसून पत्ते खेळतात आणि चहा डोसत असतात " ."अरे हे चालणारच ,महादेवना हि आता थोडा रस वाटू लागला .काळ बदलला आहे मूला "काळ बदलला म्हणून रिवाज बदलले नाहीत ना " पूर्वी मी घरा घरात जात होतो .त्यावेळी सगळे माझ्या सेवेसी असायचे ,कोणी बाहेर पडत नाही आणि स्वातंत्रलढ्यास जनजागृतीची गरज होती म्हणून लोकमान्य टिळकांनी मला घराबाहेर काढून  सार्वजनिक ठिकाणी बसविले ,तेथे इंग्रजांविरुद्ध नाटके व्हायची ,राष्टभक्तीचे पोवाडे गायले जायचे ,माझ्या पाठींब्याने लोक पेटून उठले ,स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सर्वत्र बोलू जाऊ लागले ,भक्तांना स्वातंत्रलढ्यासाठी एक नवीन दिशा मिळाली ,कित्येक शाहिरांनी माझ्या पुढ्यात पोवाडे गायले ,बालगंधर्वांनी आपल्या गाण्यांनी रात्रभर मंडप भारावून टाकला,टिळक आगरकर ,सावरकरांची अंगावर काटा आणून देशभक्ती फुलवणारी भाषणे  ऐकली.दशावतार बघितला.खूप मज्जा असायची त्यावेळी असे वाटायचे कि घरी जाऊच नये .10 दिवसांनी परत येताना डोळ्यात पाणी यायचे ,अनेक भक्त तर हमसा हमशी रडताना पहिले आहेत मी .इथे आल्यावर  खूप चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे ,परत कधी जातोय याची वाट पहायचो."अरे मग आता काय झाले "?? बाबा हळू हळू लोक सर्व रिवाज विसरू लागली ,टिळक ,आगरकर ,बालगंधर्व गेले ,स्वतंत्र मिळाले मग माझा वापर करमणुकीसाठी होऊ लागला ,रात्र रात्रभर गाणी वाजवली जाऊ लागली .आजूबाजूला कोण आजारी आहे का ,म्हातारी माणसे आहेत का याचा विचारही केला जात नाही .मोठमोठे फटाके  फुटू लागले ,माझा उंदीर तर आता माझ्याजवळही राहत नाही ,माझेही कान दुखतात हो ,कारण  माणसे बदलतात मी नाही .आता तर माझा मंडप तर राजकीय पक्षांचा आयते व्यासपीठ झाले आहे .कोणीही येतो आणि माझ्या बाजूला उभे राहून मनात येईल।ते बोलतो ,आता इथे लोकांची मने पेटवली जातात पण ती आपल्याच लोकांवर वार करण्यासाठी .रात्री आरती म्हणण्याच्या नावावर जो धुडगूस  चालतो तो तर बघण्यासारखा असतो .एखादे गाणे हिट झाले कि त्या चालीवर माझी आरती सुरु होते.माझ्या नावावर हवे ते खपविले जाते .जनजागृती होतच नाही " महादेव खरेच आता विचारात पडले "बाळा ,ह्याला कुठेतरी आपण हि जबाबदार नाही का ? आपण त्यांना बुद्धी दिली पण त्यावर कॅट्रोल ठेवला नाही ,त्यांनी त्या बुद्धीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीसाठी केला .पण वाईट गोष्टी लवकर पसरल्या जातात ,आपण त्यांच्यापुढे ध्येय ठेवलेच नाही ,मानव प्रगतीच करत गेला पण कुठे थांबायचे तेच अजून कळले नाही". होय बाबा खरे आहे याला आपणही जबाबदार आहोत ,भक्तांचे आपण ऐकतो आणि ताबडतोब नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध होतो .मला भेटायला येणारे सर्व सारखेच पण लोकांच्याच्या मते काही सेलिब्रेटी असतात म्हणूनही मी प्रसिद्ध होतो.10 दिवसांनी पोट भरत नाही म्हणून पुन्हा माघी गणेश नावाने पुन्हा मला बोलावण्यात येते.मला माझी सुट्टी कधीच एन्जॉय करता येत नाही ,मंडपात हल्ली काही कार्यक्रम होतच नाहीत " काय करू मी बाबा ??? आता ह्या वर्षी त्या सैराटच्या तालावर आरती ऐकायला लागेल ", तुला जावेच लागेल गणेशा नाहीतर हि लोक तुला इथे येऊन घेऊन जातील ,त्यापेक्षा तू स्वतः निघ " महादेवन निक्षूंन सांगितले आणि गणेश नाईलाजाने निघाला भक्तांना भेटण्यासाठी.

No comments:

Post a Comment