Tuesday, April 4, 2017

पक्या

संध्याकाळी घरी येताच सौ.ने सांगितले "आहो ,प्रकाश भाऊजी आलेत ,आणि तुम्हाला घरी बोलावले आहे "
ते ऐकूनच प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे पळून गेला . प्रकाश उर्फ पक्या आमचा बालपणापासूनचा मित्र . एकत्र वाढलो ,खेळलो ,शिकलो . तो हुशार ,आई वडील शिक्षक त्यामुळे पुढे शिकला आणि चांगली नोकरी हि लागली . त्यातून तो पुढे परदेशात गेला आणि बरीच वर्षे तिथेच राहिला . मध्येच एकदा महिनाभर आला आणि लग्न करून  बायकोला घेऊनही गेला . आज जवळ जवळ 15 वर्ष तो बाहेर होता ,कधीतरी 15 दिवसासाठी इथे यायचा . पण आल्यावर मला आणि विक्रमला भेटल्याशिवाय जायचा नाही.
मी आणि विक्रम त्याला भेटायला गेलो . आम्ही घरात शिरलो तेव्हा एकप्रकारची शांतता जाणवली .वातावरणात थोडा तणाव होता . आम्हाला बघून प्रकाश खुश झाला . विक्रम तर नेहमीच्या शैलीत" पक्या !! म्हणत मिठीत शिरला.
"चल बाहेरच बसूया" असे म्हणत पक्या बाहेर घेऊन आला .
मस्तपैकी कट्ट्यावर मांडी घालून  बसलो . विक्रमने त्याच्या मांडीवर थाप मारून विचारले ,  "काय झाले पक्या ,डोळ्यात पाणी का "??
" च्यायला ,ह्याचे बरे लक्ष " !! मी मनात म्हटले
"काहीं नाही रे नेहमीचेच ,दादा ऐकत नाहीत . यावेळी ठरवले घेऊन जायचेच .अनुही  मनात पक्के ठरवून आलेली . पण म्हातारा ऐकत नाही आणि म्हातारी त्याला शब्दाबाहेर नाही ".  निराश होऊन पक्या बोलला .आम्ही माना डोलावल्या.
" अरे मग तुम्ही का इथे येत नाही" ?? मी विचारले .
तसा  पक्या खिन्नपणे हसला.
" अरे खूप प्रयत्न केले  मी. मागच्या 8 वर्षात खूप प्रयत्न केले इथे राहायचे .पण खरे सांगू ?आता इथली लाईफस्टाइल नाही जमत . इथला ट्राफिक, रांगा ,काम होण्यास लागणार उशीर ,नाही जमत मला . च्यायला खिश्यात भरपूर पैसे आहेत तरी पुण्याला जायला चार  तास लागतात, खाजगी वाहन केले तरी . आणि ट्रेन नेहमी फुल . शिवाय इथले वातावरण ,प्रदूषण नाही सहन होत." पक्या हताशपणे म्हणाला.
" पक्या ,xxxx तुझा जन्म इथेच झालाय म्हटलं " विक्रम ने तोफ डागली .
मी दर्डावले तसा  पक्या बोलला "अरे बोलू दे त्याला .हाच आपलेपणा  तिथे मिळत नाही . तुमच्या शिव्या ऐकल्या कि छान वाटते "हे बघ विकी ,मी नाव ठेवत नाही पण माझे शरीर ,मन आता तिकडच्या वातावरणाला रुळावलंय ,त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी इथले वातावरण आता मी स्वीकारू शकत नाही . अरे तिकडे कसे आरामात चालते सगळे . कसली घाई नाही ,मुलांना ऍडमिशनचे टेन्शन नाही ,कि घरातील दुरुस्तीचा त्रास नाही . सगळे कसे एका फोन वर होते . इथे कामाचे टेन्शन ,मग प्रवासाचे .अरे घरी येतो तेव्हा दिवस संपलेला  असतो .बाहेर पडायची इच्छा होत नाही ,आता मुले तर म्हणतात 'पपा आपण महिन्याभरासाठी जाऊ भारतात पण इथे कायमचे राहू . बायकोला हि वाटते इथे कधीतरी यावे ,म्हणून आम्ही दादांच्या मागे लागलोय तुम्ही पण चला . अरे इथे कोण आहे त्यांना पाहायला . सारखी त्यांचीच काळजी वाटत असते ,उद्या आजारी पडले तर कोण आहे पाहायला ,तिथे सर्व सोयी आहेत ,आम्ही असू .  तरूणपणी खूप खस्ता काढल्या माझ्यासाठी ,निदान उत्तरार्ध तरी सुखात जावा असे वाटते मला" .पक्याची काळजी स्पस्ट दिसत होती आम्हाला .पण दादांचा स्वाभिमान हि ओळखून होतो आम्ही . पक्या भावनिक आणि प्रॅक्टिकल अश्या दोन्ही बाजूने विचार करत होता . दादांचे संस्कार विसरला नव्हता .
पक्या हळूच मला म्हणाला भाऊ तुला कधी वाटले नाही का ,परदेशात नोकरी करावी खूप पैसे कमवावे आणि विकी तुला रे ??
मी हसलो "हे बघ पक्या ,प्रत्येकाने सारखाच विचार करावा असे काही नाही . तू पैसे कमावण्याच्या सुख मानतोस, मी नाही .याचा अर्थ तू चूक मी बरोबर असा नाही . मला फॅमिली जवळ असावी असे वाटते ,आणि मला आतापर्यंत पैश्याची कमी पडली नाहीच "
माझेही तसेच आहे " विक्रम उद्गारला ,मस्त चालले आहे आमचे , सर्वाना पुरेल असे घर आहे ,गाडी आहे .बारश्या पासून ,अंत्ययात्रेपर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड करतो . तुमच्यासारखे 40 वर्ष जुने मित्र आहेत .अजून काय पाहिजे भाऊ ???
तसा प्रकाश थोडा शांत झाला ,त्याच्या चेहऱ्यावर हसू प्रकटले .
विक्रम शांतपणे त्याला म्हणाला ,"पक्या दादा ऐकणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेष आहे . त्यांना दुसरीकडे करमणारही  नाही  आणि तुलाही ते रोखणार नाहीत . पण लक्षात ठेव, दादा माई एकटे नाहीत इथे . आम्ही आहोत त्यांच्या मागे . आमच्यावर हि त्यांनीच संस्कार केलेत .  तुला जेवढे प्रेम दिले तेवढेच आम्हाला दिले त्यामुळे त्यांचे काय होईल ती काळजी सोड .  आणि बिनधास्त जा तू . काही झाले तर आधी त्यांना बघू मग तुला कळवू .काय भाऊ बरोबर ना ?? माझ्याकडे वळून बोलला. मी हसलो आणि ते पाहून पक्या गहिवरला .

(C) श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment