Sunday, April 16, 2017

भावना

काल परत चार्ली चॅप्लिनचा सिटीलाईट पाहिला . भावना व्यक्त करायला संवादाची गरज नसते तर नुसते डोळे ,स्पर्श याद्वारेही व्यक्त करता येतात हे हा माणूस दाखवून देतो .
खरेच फार पूर्वीपासूनच असे चालत आहे . एकत्र कुटुंबीपद्धतीत स्त्रीला आपल्या नवऱ्याशी बोलणे शक्य होत नसे .त्यावेळी रूढी परंपरा ,संस्कार याचा पगडा होता .तेव्हा ती आपल्या डोळ्यातून नवऱ्याशी बोलायची .तोही आपल्या डोळ्यातूनच भावना व्यक्त करायचा मग ते प्रेम असो कौतुक असो की राग . चित्रपटातही तेच चालायचे . नायिका दाराआडून आपल्या नायकाशी डोळ्यांनीच संवाद साधायच्या . मग परिस्थिती सुधारत गेली . कुटुंबे विभक्त झाली . शिकलेली बाई बायको बनून घरात आली . ती मोठ्यांचा मान ठेवते पण घरातील न पटणाऱ्या गोष्टीला विरोध ही करू लागली आपली मते स्पष्टपणे मांडू लागली . आता नवरा बायको बिनधास्त हातात हात घालून फिरू लागले . वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा स्पर्श अनुभवाला जाऊ लागला. तो कधी आईच्या मायेचा ,भावाच्या प्रेमाचा ,मुलावरच्या वात्सल्याचा तर नवऱ्याचा अंगावर रोमांच उभे करणारा  आणि कधी कधी परक्याकडून जाणवणाऱ्या वासनेचा . चित्रपट ही आता बराच सुधारला . घरात कोणी नाही पाहून नायक नायिकेला मिठीत घेऊ लागला ,तर रस्त्यावरून अपरात्री जाणाऱ्या मुलीचा हात खलनायक धरू लागला .
पुन्हा काही वर्षे गेली .आता कुटुंबातही विभक्तपणा आला . नवरा बायको मुलगा असे कुटुंब असतानाही प्रत्येक जण एकटे राहू लागला . नवरा बायको दोघेही कामावर .मुले त्यांच्या विश्वात रमलेली . मग त्या स्पर्शाची जागा कॉम्पुटर आणि मोबाईलने घेतली . नवरा बायको मुले फॅमिली ग्रुप मधून एकमेकांशी संवाद साधू लागले . घरी येऊन प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चाटद्वारेच बोलू लागले .मी निघालोय ,जेवण तयार ठेव .मुलगा अभ्यास करतोय का ? परीक्षा कधी आहे ??असे प्रश्न नवरा बायकोला आणि मुलाला मोबाइलद्वारे विचारू लागला .समोरासमोर न येता न बोलता स्पर्श ही न करता कश्या भावना व्यक्त कराव्या हे मोबाईल शिकवू लागला . त्याने राग ,प्रेम ,आनंद या सर्व भावनांना चित्राचे रूप दिले .चॅटिंग मधूनही आपण उत्तमप्रकारे आपल्या भावना व्यक्त करू लागलो .नवऱ्याचा आय लव्ह यु आणि त्याच्याबरोबर हृदयाचे चिन्ह असा मेसेज आला की बायको हुरळून जाते . तिच्या अंगावर अजून रोमांच उठतात .
शेवटी काय तर भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे महत्वाचे.
पण हे योग्य की अयोग्य हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे .
(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment