Friday, April 14, 2017

मुलगी झाली हो

"अरे तो बाळा बघ बाहेर आहे ,बोलावू का त्याला ? असे म्हणताच  विक्रम ने ऑम्लेट पावचा तुकडा तोंडातून खाली काढला आणि मनापासून एक शिवी मला दिली .
रविवारी नेहमीप्रमाणे आम्ही इराण्याकडे  नाश्ता करायला बसलो  होतो . रविवारी  घरी नाश्त्याला सुट्टी द्यायची असे आमचे पूर्वीपासूनच ठरले होते  आणि आळीपाळीने बिल भरत होतो . आज बिलाची पाळी विक्रमची होती म्हणून त्याला संताप आला होता.
तरीही मी बाळाला हाक मारून बोलावले . बाळा तसा आमचा लहानपणापासूनचा मित्र .थोडा पुरोगामी विचारांचा ,घरचे वातावरण ही तसेच.  हा सरकारी नोकर. आपण बरे आपले काम घर बरे अश्या वृत्तीचा .कधीतरी येऊन गप्पा मारायचा .विक्रमशी लांबच राहायचा . मी हाक मारताच बाळा आत आला आणि बसला.
"काय रे बाळा गेले काही दिवस बघतोय खूप उदास आणि टेन्शन मध्ये दिसतोस काय झाले ?? तसा बाळा हसला," अरे सुमीचे लग्न ठरले आहे त्याचे टेन्शन
"तुला कसले टेन्शन रे तिचे? नावाला बाप तू तिचा . काय केलेस तिच्यासाठी ??मुळात तुला मुलगी नकोच होती पण झाली आणि तुझ्या गळ्यात पडली . पाच दिवस सतत दारू पित होतास ते विसरलास का ??विक्रम चा पट्टा सुरू झाला.
" हो खरे आहे .पहिली मुलगी झाल्याबरोबर माझा मूडच गेला खूप निराश झालो आई बापाची इच्छा होती मुलगा व्हावा आमच्या घरात सर्वाना पहिला मुलगा मग माझ्याच बाबतीत का असे ? मग केवळ एक उपचार म्हणून पितृत्व स्वीकारले . सगळा राग बायकोवर काढायचो . मुलीला नजरेसमोर फार काळ ठेवायचो नाही . तिच्या पालनपोषणाची फक्त आर्थिक जबाबदारी मी घेतली बाकी सर्व बायकोवर सोपवले . हळू हळू सुमन मोठी झाली तेव्हा तिला जाणवू लागले इतरांसारखे आपले वडील आपल्याशी वागत नाही . आपला घरातील वावर अस्वस्थ करतो त्यांना . मग ती दबूनच राहू लागली . मी समोर आलो की तणावाखाली यायची . त्यामुळे एकलकोंडी बनली . हे पाहून मला अजून संताप यायचा . च्यायला मुलगा असता तर कुठच्या कुठे गेला असता पण ही मुलगी ?  तरीही बुद्धिबळात महाराष्ट्रातून पहिली आली . ह्या बैठ्या खेळाचे किती कौतुक करायचे .माझी प्रतिक्रिया पाहून तिने तेही सोडून दिले . आमच्या ऑफिस च्या आजूबाजूला बिनधास्त वावरणाऱ्या मुलांच्या बरोबर ,चित्रविचित्र कपडे घालून वावरणाऱ्या मुली पाहून मला अजून संताप यायचा . अश्याच वागतात का ह्या मुली ?? माझीही अशीच वागेल ???
शेवटी लग्न करायचे ठरल्याबरोबर आलेल्या स्थळाला होकार दिला आणि लग्नाच्या तयारीला लागली . पण आज तिचे लग्न ठरले हे ऐकून  का कोण जाणे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली .घरात येताच खाली मान घालून कोपऱ्यात उभी राहणारी ती सुमा आठवू लागते .  मनात इच्छा नसताना तिचा वावर अनुभवायचो पण आता तीच दिसणार नाही . जाईल लग्न होऊन ती पण मला अस्वस्थ करून जाईल . एकदा चुकून तिचे खळखळून हसणे ऐकले होते मी . काळजात आता कळ उठते ते आठवून . आणि त्यात काल एक आघात झाला ,माझ्या बायकोने पहिली मुलगी होताच माझी अवस्था पाहून सरळ ऑपरेशन करून टाकले कदाचित दुसऱ्यांदा मुलगी झाली तर माझ्या हातून काही घडू नये म्हणून . खरेच भाऊ इतका दुष्ट आहे का मी ??
"प्रश्न तुझ्या दुष्टपणाचा नाही बाळा तर तुझ्या पुरोगामी विचारांचा आहे . मुलगा पाहीजे मुलगी  काय कामाची ?? तू मुलीचा कधीच छळ केला नाहीस पण प्रेमाने कधी जवळही घेतले नाहीस . तुझा अहंकार आड आला प्रत्येकवेळी . तुला चांगले माहीत आहे सुमी किती गुणाची मुलगी आहे पण तू ते कधी खुलेआम मान्य केलेस नाही आणि मुलगा मुलगा काय घेऊन बसलास आमचे चिरंजीव बघ आताच बोलू लागले की मी परदेशात स्थायिक होणार ".
", बरोबर आहे तुझे भाऊ ,माणूस नजरेआड झाला की त्याची किंमत कळते हे खरे आहे . म्हणूनच मीआजपासून बदलायचा प्रयत्न करणार "
" .अरे वा मस्तच!! मग आता या नाश्त्याचे बिल तू भरून टाक" असे विक्रम बोलताच आमच्या हास्याने हॉटेल हादरून  गेले .

(C) श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment