Saturday, May 13, 2017

पहिला पाऊस

पहिला पाऊस ....सेकंड शिफ्ट मध्ये काम करणारा अनिल चौगुले पाऊस पडताच बाहेर पडला .कडेकडेने पावसाला चुकवत मनोमनी शिव्या देत उघड्या मशीन आणि इतर साहित्य शेडखाली लपवू लागला . अचानक त्याला जाणवले हा पहिला पाऊस आहे . स्वतःशी हसत त्याने पहिल्या पावसात झोकून दिले .बाजूचे कामगार आश्चर्याने पाहू लागले तेव्हा म्हणाला", कामे तर होतच राहतील पण हा आनंद परत मिळणार नाही .
पहिला पाऊस .... ती स्टेशनला आली आणि पहिल्या पावसाला सुरवात झाली . घरी उशीर झाला तर सोनूली घाबरेल याविचाराने ती हैराण झाली . पहिल्या पावसाच्या निमित्ताने रिक्शावाल्यानी अवाच्या सव्वा भाडे घेण्यास सुरुवात केली . शेवटी ती नाइलाजाने भिजत भिजत घरी पोचली . तिला पाहताच खिडकीत पाऊस पाहत असलेली सोनूली धावत तिच्या मिठीत शिरली . "अय्या तू भिजून आलीस किती मज्जा आणि मी घरात बसून तुझी वाट पाहतेय ",असे म्हणून गाल फुगवले . तिने हसून तिला उचलून घेतले आणि पावसात उभी राहिली . दोघीही मायलेकी पहिल्या पावसाच्या धारा अंगावर घेत नाचू लागल्या .
पहिला पाऊस ...मुबाईच्या ट्राफिक मध्ये अडकलेला सुपरस्टार खान आपल्या कोऱ्या BMW मध्ये बसून पावसाळा शिव्या देऊ लागला .नुकत्याच घेतलेल्या कोऱ्या करकरीत गाडीची त्याला चिंता होती . बाजूला बसलेली छोटी रेहाना मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाकडे कौतुकाने पाहत होती ."पापा भिजूया का ?? ती पावसात नाचणाऱ्या छोट्या मुलांकडे पाहून बोलली . ",काही गरज नाही ?? कशाला नवीन गाडीची वाट लावतेस घरी गेल्यावर शॉवर खाली भिज" .परवीन आपल्या नवऱ्याकडे पाहून मोठ्याने बोलली . रेहनाचा हिरमुसलेला चेहरा पाहून खान हसला . एक बटन दाबून गाडीचे वरचे कव्हर ओपन केले . पाऊस उघड्या टपातून कोसळू लागला . खान हळूच पत्नीकडे पाहून म्हणाला" या आनंदासाठी दहा गाड्या कुर्बान करेन मी ".
पहिला पाऊस ...... राजाराम नेहमीप्रमाणे शेतात फेरी मारायला गेला . यावर्षी काय लावू या चिंतेत शेतात उभा राहिला .तीन एकरचे त्याचे शेत कोमेजून गेले होते .रखरखत्या उन्हाने जमीन भाजून गेली होती .त्याच्या डोळ्यातील अश्रूच फक्त जमिनीला पाण्याच्या रुपात मिळत होते . या वर्षी तरी पाऊस होईल का असा विचार करत असतानाच आभाळ भरून आले आणि पावसाची सर त्याच्य अंगावर कोसळली .त्याच्या तोंडातून फक्त हुंदका फुटला . न राहवून त्याने आपले शरीर त्या मातीत लोटून दिले . पाठीवर पडून आभाळाकडे पाहत त्याने पाऊस अंगावर घेतला .यावेळी मात्र जमिनीला त्याच्या अश्रूंची चव वेगळीच लागली .
पहिला पाऊस .. बंड्या मोठमोठ्याने ओरडतच घरात शिरला . पावसाने पूर्ण भिजून गेला होता तो . पोळ्या लागणाऱ्या मनीला त्याने उचलून बाहेर आणले .तिच्या ओरडण्याकडे ,ओरबडण्याकडे लक्ष न देता पावसात उभे केले  आणि नाचू लागला . पावसाची सर अंगावर येताच मनी शहारली आणि प्रेमाने भावाच्या पाठीवर धपाटा देत नाचू लागली .
पहिला पाऊस ...भाईनी खिडकीतून पाऊस पाहणाऱ्या निखिलला विचारले ",जायचे का भिजायला ??. एक आनंदाची लकेर निखिलच्या चेहऱ्यावर उमटली ." हो चालेल !! पण तुम्ही आजारी आहात आजोबा "??. तो काळजीने म्हणाला ."अरे  काही होत नाही .या आजारामुळे ही पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद का घालवू" .तितक्यात अवि आत शिरलो आणि म्हणाला," भाई ,निखिल चला पहिल्या पावसाचा आनंद लुटू
पहिला पाऊस ...विक्रमने फोन केला ,"भाऊ चल बसू पूर्वीसारखे कट्ट्यावर, मी समान घेऊन येतो .आज भिजत भिजत पिऊ ",. म्हटले ",नको त्यापेक्षा तू घरी ये ही भज्या करतेय .गरम गरम चहा आणि भज्या खात पाऊस एन्जॉय करू .तर हा म्हणतो वहिनीला फक्त चहा करायला सांग आम्ही दोघे भज्या घेऊन येतो .आपण चौघे आज पाऊस एन्जॉय करू .
पहिला पाऊस ....पावसात नाचणाऱ्या चिंगीला पाहून विक्रम चिंतनला म्हणाला "अरे चिंत्या आज चिंगी पावसात कशी भिजतेय ?? प्रॅक्टिस नाही का ? घरात राहून प्रॅक्टिस करण्यापेक्षा पहिल्या पावसात मित्र मैत्रिणीबरोबर नाचणाऱ्या चिंगीच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त महत्वाचा आहे .चिंतन ने पावसात भिजणाऱ्या चिंगीकडे हसून पाहत उत्तर दिले .
पहिला पाऊस .....अचानक पाऊस आला म्हणून तो आडोश्याला उभा राहिला तेव्हा ती त्याला दिसली .नेहमीसारखीच पदर सावरत ,धक्के चुकवत बाहेर पडणारी . तिचेही लक्ष  त्याच्या कडे गेले आणि डोळ्यातील आनंद चेहऱयावर पसरला ,अय्या तुम्ही ??? हो !!बाहेरच काम होते ,म्हणून लवकर आलो .तो हसून म्हणाला  तू ??  "पावसाची लक्षण दिसत होती म्हणून म्हटले आज घरी जाऊ ,पहिला पाऊस आहे .घरी कुठे कुठे गळतय ,समान नीट ठेवावे लागेल . म्हणून  लवकर  .ती नेहमीच्या काळजीने म्हणाली  .दोघेही आडोशाने चालू लागले .अचानक थांबून त्याने तिच्यासाठी गजरा  घेतला .ती मोहरली . त्याने  तिच्या केसात गजरा माळला ".किती वर्षांनी ?? ती भरल्या कंठाने बोलली दोन अश्रू तिच्या डोळ्यातून खाली ओघळले . काही न बोलता तो तिला घेऊन आडोश्यातून बाहेर आला आणि एकमेकांच्या  कमरेभोवती हात  टाकून भिजत भिजत घरी निघाले .

(C) श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment