Tuesday, May 30, 2017

चित्रपट

आज त्याने तिला छान सरप्राईज द्यायचे ठरविले . मोठ्या मुश्किलीने सचिन चित्रपटाच्या दोन तिकीट मिळविल्या होत्या . गेले चार दिवस थोडे जास्त काम करून अलाऊन्स मिळवला होता .आणि तसेही शेवटचा चित्रपट पाहून सात वर्षे झाली होती .पण नंतर या संसाराच्या रगाड्यात वेळच मिळाला नाही .काहींनाकाही काम निघायचे आणि राहून जायचे.
पण परवा त्या कार्यक्रमात सचिनला पहिला आणि ती जुन्या आठवणीत हरवून गेली .ती आणि सचिन एकाच शाळेतले  . ती सचिनला सिनियर आणि  तो आपल्या शाळेचा याचा तिला अभिमान . सहज बोलून गेली बघायला हवा हा चित्रपट आणि त्याच्या मनात बसले .शेवटी रविवारी संध्याकाळच्या शोच्या दोन तिकीट्स मिळाल्या आणि तिला सांगितले .
प्रथम तिचा विश्वासच बसेना पण नंतर हरखून गेली . रविवारी पटापट आवरून ती तयार झाली . खरेच माणसाचे मन आनंदी असेल तर त्याचे रूपही खुलून दिसते हे तिला पाहून जाणवले मला . खरेच किती छोट्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यात खुश होण्यासाठी आणि नेमके आपण तेच विसरतो . चित्रपट नेहमीप्रमाणे हाऊसफुल होताच .
"किती वर्षे झाली हो शेवटचा चित्रपट पाहून आपल्याला "?? ती त्याच्या खांद्यावर डोके घुसळत लटक्या रागाने म्हणाली .
"असतील सहा सात  वर्ष ",तोही गमतीने म्हणाला.", पण खरे सांगू बरेचदा वाटायचे तुला घेऊन जावे चित्रपट पाहायला ,पण नंतर विचार करायचो दोघेही समोरच्या पडद्याकडे तीन तास बघत राहणार  आणि मोठ्या मुश्किलीने मिळणारे तीन तास फुकट घालवायचे ?? त्यापेक्षा एकमेकांच्या  डोळ्यात पाहत बोलत बसू ,भविष्याचे प्लॅन्स करू .पण साले ते तीन तास तरी कुठे मिळायचे ?? रोज काहीतरी नवीन कारणे ,नवीन अडचणी .कधी तुला तर कधी मला" .तो वैतागून बोलत सुटला .
तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि डोळ्यात पहात म्हणाली", जाऊदे ,आताचे क्षण उपभोगूया .
इतक्यात शेजारी कोणाचेतरी मुसमुसणे ऐकू आले . दोघांनीही माना तिथे वळविल्या तर शेजारी दोन  तरुण रुमालाने डोळे पुसत होते .",अरे काय झाले ?? त्याने विचारले .
"दादा मोठ्या हौसेने सचिन पाहायला आलो. उद्यापासून आम्ही चाललो परदेशात प्रोजेक्ट साठी आणि तिथे प्रोजेक्ट संपेपर्यंत हलताही येणार नाही .म्हटले सचिन पाहून जाऊ .आमचा आयडियल आहे तो .आम्हालाही आमच्या क्षेत्रात त्यांच्यासारखेच बनायचे आहे .पण इथे चित्रपट फुल आहे आणि दुसरीकडे  तिकीट्स मिळत नाही .
त्यांचे केविलवाणे  चेहरे  पाहून आम्हाला वाईट वाटले .अधिक काही घडू नये म्हणून त्याने तिचा हात धरला आणि बाजूला घेऊन जाऊ लागला .इतक्यात तिने त्याचा हात बाजूला केला त्याच्या खिशातील तिकिटे काढून त्यांच्या समोर धरली .
"ही घ्या दोन तिकिटे आणि बघा चित्रपट .एन्जॉय करा". त्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू पसरले . दिलेले पैसे घेऊन ती बाहेर पडली .
"अग बाई !!वेड लागले का तुला ?? तो थोडा चिडूनच बोलला "अशी कशी  दिलीस त्यांना तिकिटे ? एकतर किती वर्षांनी दोघे चित्रपट पाहायला बाहेर पडलो .तुही किती खुश होतीस  आणि त्यांना सहज तिकीट देऊन टाकल्यास ??
" मला खुश पहायचे होते ना तुला ?? मग हा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही का ?? अरे बघ मुले किती खुश झालीत . आपण त्यांच्या रडवेल्या चेहऱ्यावर हसू आणले यापेक्षा जास्त आनंद कोणता . नाहीतरी आपल्याला सवय आहेच या गोष्टीची .आज आपण चित्रपट पाहून घरी गेलो असतो पण त्या मुलांचे चेहरे पाहून सुखाने झोपलो असतो का ?? आणि सचिन पहायची खरी गरज त्यांनाच आहे . त्यांनाच सचिनकडून आयुष्यातील  स्ट्रगल शिकायचं आहे . त्यातून मोठे व्हायचे आहे . आपले स्ट्रगल तर चालूच राहणार आहे . चला आता बसू पार्कात . तिथे गजरा घ्या आणि डोळ्यात डोळे घालून माझ्या सौंदर्याची तारीफ करीत बसा .त्याने मनोमन तिला हाथ जोडले आणि पावले पार्काकडे वळवली .
(C) श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment