Tuesday, May 2, 2017

स्पर्धा

मी आणि विक्रम नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर बसलो होतो .तोच समोरून घाईघाईत चिंतन गेला . जाताजाता आमच्याकडे पाहून नुसता हात हलविला . मी आश्चर्याने विक्रमला विचारले  "काय रे, हा चिंत्या हल्ली असतो कुठे ? फारच घाईत दिसतो" ??
"माहीत नाही यार ,पण  रोज घरात लावण्या वाजत असतात .आणि चिंगी तर हल्ली दिसतच नाही बाहेर",
चैताली उर्फ चिंगी म्हणजे चिंतनची सात वर्षाची मुलगी .  हुशार ,चुणचुणीत आणि नकलाकार . टीव्ही समोर उभी राहून जसेच्या तसे नृत्य करणारी . "काहीतरी गडबड आहे बुवा, मी चिंतेच्या स्वरात म्हटले.
" चल उद्या घरी जाऊ त्याच्या ",विक्रमने उद्याचा प्लॅन जाहीर केला आणि विषय संपवला .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी विक्रमला घेऊन त्याच्या घरी धडकलो . वहिनीने कपाळावर आठ्या पाडत स्वागत केले .आमचे घरी येणे तिला तितके रुचले नाही . तर चिंतनने हसून स्वागत केले . घरात एका कोपऱ्यात घुंगरू पडले होते .लहान तयार पद्धतीच्या नऊवारी साड्या होत्या  आणि चिंगी हातात टॅब घेऊन यु ट्यूब वर लावणी बघत होती . तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता .वहिनी तिच्याकडे पाहून बोलल्या ",हा आता हावभाव सुरू कर ",. तशी चिंगी उठली आणि आरशासमोर उभी राहून ,ओठ चावू लागली ,ओठावरून जीभ फिरवू लागली ,पापण्यांची फडफड करू लागली .
"देवा !!!  विक्रम आणि मी तरुणपणी ह्याप्रकारचे बरेच अनुभव घेतले असल्यामुळे हादरलोच .
"नाही अजून उठावदार होऊ दे" ,वहिनी ओरडल्या . आणि टॅब मधून विडिओ काढून दाखविले.
"चिंत्या काय चालले हे ?? मी थोड्या रागातच विचारले.
" अरे काही नाही एका वाहिनीवर लहान मुलांच्या लावणी स्पर्धेचा शो चालू होतोय . चिंगी छान डान्स करते म्हणून म्हटले तिला भाग घ्यायला लावू . त्याचीच तयारी करून घेतोय तिच्याकडून ". असे बोलून चिंगीला म्हणाला ",चल काकांना डान्स करून दाखव चिंगी" .
अतिशय नाईलाजाने  चिंगी तयार झाली . वहिनीने खुश होऊन एक लावणी सुरू केली आणि चिंगीने डान्स . खरेच सांगतो हो मन मारून पोरगी नाचत होती . विक्रमने तर डोळे मिटून घेतले तर चिंतन आणि वहिनी तिला अजून प्रोत्साहन देऊ लागले . एकदाची लावणी संपली आणि चिंगीच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव आला .
" तेव्हाच  हल्ली चिंगी दिसत नाही  बाहेर खेळताना". विक्रम थोड्या छद्मीपणे बोलला .
"हो ,वहिनीही तेव्हडयाच  ठसक्यात बोलल्या", काय मिळते त्या मुलांच्यात खेळून. त्यापेक्षा नाचाची प्रॅक्टिस करते  . त्यातूनच काहीतरी मिळेल नाहीतर वाया जातील गुण ".
मग कशी प्रॅक्टिस चालू आहे"?? मी कौतुकाने विचारले . तसा चिंतन उत्साहाने पुढे झाला", अरे  सकाळी सहा वाजता उठते मग अर्धा तास योगा त्या नंतर शाळेत जाते. शाळेतून येताच डान्सची प्रॅक्टिस सुरू करते मग संध्याकाळी डान्सच्या टीचरकडे जाते. तिथे प्रॅक्टिस करते . रात्री घरी येते यु ट्यूब वर विविध प्रकारच्या लावणी नृत्याचे विडिओ बघते त्याची आरश्यात बघून प्रॅक्टिस करते आणि झोप आली की झोपून जाते . तसे बघायला गेलं तर दिवस कमीच पडतो ,पण चिंगीचा उत्साह भारी आहे हो ."
दोघांच्याही चेहऱ्यावर कौतुक ओसंडून वाहत होते तर चिंगीच्या डोळ्यावर झापड येत होती . आम्ही हातातील खाऊ चिंगीकडे दिला आणि म्हटले" खाऊन टाक पटकन.
तश्या वहिनी म्हणाल्या ",आता नको ,वजन  वाढेल तिचे .काही दिवस तिच्या खाण्यावर कंट्रोल ठेवलाय आम्ही ".
हताश होऊन आम्ही निघालो इतक्यात चिंगीचा आवाज ऐकू आला", मम्मी छोटा भीम लावू का ?? "काही नको त्या फालतू सिरीयल ,इतर मुलांसारखे बिघडायचे आहे का तुला .झोप आली असेल तर गप झोप .

No comments:

Post a Comment