Saturday, October 14, 2017

दिवाळी गिफ्ट

तिच्या हातातील रिमोट त्याने खेचून घेतला आणि चॅनल बदलले.तिच्या आवडीचा डान्स प्रोग्रॅम चालू होता .आज बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता .त्यात आवडता प्रोग्रॅम म्हणून ती खुश होती .सासूबाई ही बाहेर गेल्या होत्या तर मुले शाळेत.
पण तो अचानक आला आणि नेहमीसारखे समीकरणच बदलून गेले.चरफडत उठली आत निघून गेली.लहानपणापासूनच तिला नृत्याचीआवड                                   गणेशोत्सव,नवरात्र सारख्या उत्सवात अगदी हौसेने भाग घ्यायची . पण परिस्थितीमुळे पुढे काही जमलेच नाही .लग्न झाले तेव्हा त्याने प्रेमाच्याभरात तुझी इच्छा पूर्ण करेन असे वचन दिले पण भर ओसरल्यावर सगळे विसरून पैश्याच्या मागे लागला.
खरेच अश्या कित्येक इच्छा..आवडी... मारल्या आपण.नंतर संसारात गुरफटून गेलो.पैश्याची कमी नाही पण पाहिजे ते सुख कुठे आहे ?? आता दिवाळीची तयारी सुरू होईल . दिवसभर जेवण आणि फराळाचे काम . तो काही मदतीला येणार नाही .आपणच करायचे . विचार करता करता केव्हा झोप लागून गेली हे कळलेच नाही.
संध्याकाळी त्याने तिला उठवले तेव्हा कळले खूप वेळ झोपलो होतो आपण . घाईघाईत चहा केला आणि सर्वाना दिला . त्याने तिला सांगितले ,चाल तयार हो आज खरेदीला जायचे आहे . काही न बोलता ती तयार झाली. सर्वांसाठी खरेदी करून रात्री घरी आले तेव्हा लक्षात आले त्याने माझ्यासाठी काहीच घेतले नाही . खिन्नपणे हसून मनात म्हणाली रोजचेच आहे . माझी किंमत काय ते लक्षात येत नाही त्याच्या.रात्री सर्व आवरून त्याच्या शेजारी येऊन झोपली . त्याने तिला अलगद मिठीत घेतले आणि पांढरेशुभ्र पाकीट हाती दिले . उघडून पाहिले तर  मृणाल नृत्य क्लासची पावती होती.
आश्चर्याचा धक्का बसून ती ओरडली", हे काय नवीन"?
तो हसून म्हणाला ",तुझे दिवाळी गिफ्ट. उद्यापासून तू रोज नृत्य शिकायला जायचे . वर्षभराची फी भरली आहे.मोकळी कर स्वतःला रोजच्या या चक्रातून. काही वेळ स्वतःसाठी जग.तुझी धावपळ कळत नाही का आम्हाला ??? स्वतःचे मन .इच्छा मारून जगतेस.म्हणून आम्ही सर्वांनी ठरविले तुला नृत्याच्या क्लासला पाठवू . तासभर का होईना तुझे आयुष्य जगशील तू "
"आहो पण आता या वयात नृत्य शिकून काय करू"?? ती डोळ्यात पाणी आणून बोलली.
"आपल्याला कुठे स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. फक्त आनंद घे तुझ्या आवडीचा .तुला दिलेले वचन लक्षात आहे माझ्या.पण परिस्थितीमुळे ते वेळेवर पूर्ण करता आले नाही.पण हरकत नाही.शिकण्यासाठी वय आणि वेळ कोण पाहत नाही .स्वतःसाठी जग थोडा वेळ" . तिच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले.
त्याच्या कुशीत शिरत म्हणाली "आजची दिवाळी ही खऱ्या अर्थाने माझी दिवाळी आहे" .

© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment