Thursday, October 26, 2017

अण्णा

दिवाळीच्या दिवशी कामावर जाताना अमित चौगुलेला नेहमी घाम फुटायचा .त्यातही नाईट शिफ्ट असेल तर जास्तच घाबरायचा तो . कारणही तसेच होते .काही  वर्षापूर्वी घडलेली घटना आठवून त्याचा जीव धडधडायचा.
त्यादिवाळीच्यादिवशी नेहमीप्रमाणे पाण्याचा टँकर डिझेल टॅंकजवळ उभा होता . दरवर्षीची ठरलेली गोष्ट होती ती. आजूबाजूला वाजणाऱ्या फटाक्यांमुळे काही नुकसान होऊ नये म्हणून तो टँकर दोन दिवस तिथेच राहणार होता . टँकरचा चालक केरळचा अण्णा होता . सर्वजण त्याला अण्णाच म्हणत . आताही अण्णाच दोन दिवस टँकरमध्ये मुक्काम करणार होता . त्यादिवशी दिवसभराचे काम आटपून सर्व घरी गेले आणि रात्री फॅक्टरीत सन्नाटा पसरला .  अधून मधून वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाजच ऐकू येत होता . फॅक्टरीत पुढच्या आणि मागच्या गेटजवळ मिळून तीन सिक्युरिटी .दोन इलेक्ट्रिशियन ,दोन ऑपरेटर आणि अमित चौगुले असे मोजकेच लोक होते .हळू हळू रात्र चढत गेली . गप्पा मारता मारता सर्वाना डुलक्या येऊ लागल्या . शेवटचा राऊंड मारून आता झोपून जावे या विचाराने अमित चौगुले निघाला.बॅक गेटजवळ येताच अचानक टँकरमधून अण्णाने खाली उडी मारली आणि धावत धावत सिक्युरिटीपाशी आला आणि जोरजोरात सिक्युरिटीला बडबडू लागला . "साला...! तुम लोग बिनधास्त सो जाते हो और वो दो लोग एक औरंत को लेकर अंदर आ गये. मुझे गाली देकर नीचे बुला रहे है. नीचे उतर... नहीं तो मार दालुंगा ऐसें बोल रहे है . मै घबरकार यहा आया. वो देखो अंदर जा रहे है...!!
त्याचा अवतार आणि आवाज ऐकून अमित आणि सिक्युरिटी समजला याला धक्का बसला आहे . त्यांनी शांतपणे त्याला समजावत मेन गेटपाशी आणले . गरम चहा पाजून तिथेच झोपायला जागा दिली . आता टँकरमध्ये स्वतः अमित देवाचा धावा करीत बसला . त्यात त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही.
सकाळी उठून अमित घरी गेला.जाताना पाहिले तर अण्णा शांतपणे झोपला होता . दुसऱ्या दिवशी अमित कामावर सकाळीच हजर झाला . आल्या आल्या सर्व जण त्याला अण्णाबद्दल विचारू लागले . त्याने होती ती माहिती साहेबांना दिली.पण त्याला धक्कादायक बातमी कळली.त्यादिवशी अण्णा उठून टँकर घेऊन मालकाच्या घरी गेला आणि मालकाला शिवीगाळ केली . परत टँकर घेऊन गेला तो अजून सापडला नाही . संध्याकाळी टँकर एक रस्त्यावर आढळला पण त्यात अण्णा नव्हता .तोही दिवस असाच निघून गेला.
दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक बातमी आली अण्णा सापडला पण मृत.... बापरे .....अमित हादरून गेला . एका बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीत अण्णाचा फुगलेला देह सापडला.बरे त्या बिल्डिंगचा आणि अण्णाचा काहीही संबंध नव्हता . पाण्याला विचित्र वास येऊ लागला म्हणून काही जण पाण्याची टाकी चेक करायला गेले आणि टाकीचे झाकण उघडताच अण्णाचा फुगलेला मुडदा दिसून आला . टाकीचे झाकण फोडून त्याला बाहेर काढावे लागले .अमितच्या दृष्टीने खरेच ही अतिशय धक्कादायक घटना होती . आणि ही घटना तो कधीही विसरणार नाही .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment