Sunday, October 22, 2017

भाऊबीज

सुप्रसिद्ध सुपरस्टार अमितकुमार आज खुश होता . दरवर्षी दिवाळी आली की तो खुश असायचा .जवळच्या नातेवाईकांना,मित्रमंडळींना महागडी गिफ्ट देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तो खुश व्हायचा. आपल्या महागड्या गिफ्ट्समुळे लोक खुश होताना पाहून त्याचा अहंकार सुखायचा.आज भाऊबीज म्हणून बहिणीला उंची घड्याळ घेतले होते आणि महागडा ड्रेस घेतला होता.बहिणीच्या चेहऱ्यावरील भाव बघून त्याला आनंद होणार होता . आणि झालेही तसेच.
त्या आनंदातच तो परत निघाला.पैसा असला की आनंद विकत घेऊ शकतो अशीच त्याची समजूत होती.रस्त्यात त्याला देवा भेटला.देवा ..त्याचा लहानपणापासूनचा मित्र . त्यालाही आपली श्रीमंती दाखवू आज या विचाराने त्याने गाडी थांबवली. त्याला पाहून देवा खुश झाला.
"सायबा ..!! कुठे ?? अमितकुमारने ऐटीत विचारले.
"बहिणीकडे... भाऊबीजेला.".  देवा उत्तराला.
"चल बस सोडतो तुला.आज भरपूर वेळ आहे "देवा त्याच्या बाजूला बसला . गाडीत बसताना देवाचे चकाकलेले डोळे पाहून अमितकुमार सुखावला . ते दोघेही देवाच्या बहिणीकडे आले . आता शिरताच त्याला पाहून त्या छोट्या खोलीत गडबड उडाली . काही वेळातच देवा ओवाळणीसाठी बसला . ओवाळणी करताना दोघांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अमित कुमार चमकला . अरे हेच भाव आता आम्हा भाऊ बहिणीच्या चेहऱ्यावर होते . ओवाळणी म्हणून देवाने बहिणीला छानसे घड्याळ गिफ्ट दिले . ते पाहून बहिणीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले . अगदी असेच भाव त्याने आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर पाहिले होते.अमितकुमार थोडा गंभीर झाला .तो आणि देवा परत निघाले.
रस्त्यात एके ठिकाणी ते मिठाई घ्यायला थांबले . मिठाईवाल्याच्या बाजूला एक छोट्या खोलीत त्याचे लक्ष गेले . एक पंधरा  वर्षाची मुलगी आपल्या आठ वर्षाच्या भावाला ओवाळत होती .छोटा भाऊ ऐटीत डोक्यावर टोपी घालून बसला होता आणि बहीण कौतुकाने त्याला ओवाळते होती .अमितकुमार पुन्हा चमकला . हेच भाव त्याने बहिणीच्या चेहऱ्यासर पाहिले होते .ओवाळणी संपताच त्या लहान भावाने आपल्याकडील मिठाईचा छोटा बॉक्स बहिणीला दिला आणि तिच्या गालावर ओठ टेकविले .  आनंदाने बहिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले . अमितकुमार भारावून ते दृश्य पाहत होता .हा अनुभव थोड्याच वेळापूर्वी त्यानेही घेतला होता.
दोघेही पुढे निघाले तोच त्यांच्या गाडीवर एक दारुडा येऊन धडकला.चिडून अमितकुमार काही बोलणार इतक्यात तोच हात जोडून म्हणाला ",साहेब खिश्यात पैसे नाहीत.सगळे पैसे दारूत गेले .बहिणीकडे जायचे आहे सोडाल का" ?? अमितकुमारला दया आली.त्याने त्याला आत घेतले आणि त्याच्या घरी सोडायला गेला . आपला भाऊ एका किमती आलिशान गाडीतून उतरताना पाहून ती बहीण धावत बाहेर आली.आणि दारू पियालेल्या भावाला पाहून तोंडाचा पट्टा चालू केला.भाऊ मुकाट्याने तिच्या शिव्या ऐकत होता . शेवटी तिने अमितकुमार आणि देवाचे आभार मानले आणि त्यांना आत बोलावले. त्या छोट्याश्या खोपटात ती भावासोबत राहत होती . पण घर टापटीप होते . घाईघाईने तिने ओवाळणीची तयारी  केली. भाऊ स्वतःला सावरत पाटावर बसला .तिने डोळ्यातील अश्रू थोपवीत त्याला ओवाळणी केली . त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून परत अमितकुमार चमकला . अरे हेच भाव आज आपण सर्व भाऊबहिणींच्या चेहऱ्यावर पाहतोय.
ओवाळणी होताच भाऊ अडखळत्या स्वरात म्हणाला "आज ओवाळणी द्यायला काहीच नाही माझ्याकडे.पण तू सांग काय मागशील ते या वर्षभरात देईन तुला.त्याचे हे बोलणे ऐकून सर्व हसू लागले . बहिणीने सहज म्हटले ",देणार असशील तर एक वचन दे ?? आतापासून ही दारू सोड. माझ्यासाठी हीच मोठी भाऊबीज असेल."एका क्षणात तो भाऊ म्हणाला दिले वचन आतापासून ही दारू सोडतो मी . आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला . आतापर्यंत थोपविलेले अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर आले ,ते पाहून भावानेही आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली . अमितकुमार मनात म्हणाला अरे हेच भाव हाच आनंद आज सगळीकडे पाहतोय मी . बाहेर पडताच देवाला म्हणाला",खरेच यार ....!आतापर्यंत पैश्याने सगळे विकत घेता येते असे वाटत होते मला ,पण भाऊ बहिणीच्या प्रेमाची किंमत होऊच शकत नाही .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment