Tuesday, October 17, 2017

दिवाळी

"अरे ..!! वा..!!  सावंत कुटुंबीय आज इथे.. ??? आहो बाईसाहेब ...बघा पाहुणे आले आपल्याकडे "??? आनंदाने हसत वसंतराव नीतीन सावंत कुटुंबाकडे पाहत म्हणाले.
"या ...!!!.शुभ दीपावली" काकूंही हसत बाहेर आल्या आणि सावंतांना शुभेच्छा दिल्या.
"कसे आहात बाबा ..?? आई तुम्ही कश्या " ?? नीताने विचारले.
"आम्ही मजेत.मस्त चाललंय आमचं .घे फराळ घे". काकूंनी फराळाचे ताट समोर ठेवले .
"अय्या तुम्ही केलात.. ?? कसे जमते हो तुम्हाला .?? नीता कौतुकाने विचारले.
"अग त्यात काय ?? समोरच्या चाळीतली एक गरीब बाई आहे . तिला बोलावले घरी आणि तिला मदतीला घेऊन केले .अर्धा फराळ तिला दिला .अर्धा आमच्यासाठी ठेवला." काकूंनी सहज म्हटले .
" हो ..अरे !! आम्हाला कितीसा पैसा हवाय जगायला . माझी पेन्शन येते त्यात भागते आमचे .शिवाय राहायला हे छप्पर आहे .तुला सांगतो आम्ही दोघेच राहिलो तेव्हा जाणवले आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो . अरे आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहूनच गेले बघ.सकाळी आरामात उठतो मस्तपैकी फिरायला जातो . मनात येईल ते खातो .आणि ही बघ... दिवसभर पाहिजे त्या सिरीयल पाहत बसते". वसंतराव हसत म्हणाले .
"हो ...का ..!! काकू लटक्या रागात म्हणाल्या ",आणि तुम्ही समोरच्या चाळीतील मुलांना गोळा करता त्यांना शिकवता .तर कधी कधी बैठे खेळ ही चालू असतात.दिवस कसा संपतो तेच कळत नाही "आणि दोघेही हसू लागले.
नितीन आणि नीताने एकमेकांकडे पाहिले आणि म्हणाले ",चला निघतो आम्ही .येऊ पुन्हा."
"हो ..ये ..ना पुढच्या दिवाळीला डायरेक्ट "वसंतराव हसून म्हणाले.
ते त्यांना लिफ्टपर्यंत सोडायला आले .नितीनने त्यांचे हात हातात घेतले आणि भावनाविवश होऊन म्हणाला "बाबा चला ना घरी आपल्या ??? खूप सुखात राहू सर्व.झाले गेले विसरून जा ??? मी परत माफी मागतो तुमची"
तसे वसंतराव गंभीर झाले . त्यांच्या डोळ्यात कठोरपणा आला.
"सॉरी मूला... तुम्हाला मी इतर बापासारखा वाटलो असेन तर ते चुकीचे आहे.असे काही पुढे घडेल याची कल्पना करूनच मी घर माझ्याच नावावर ठेवले आणि तुम्हाला घराबाहेर काढले .माझा संसार वेगळा तुझा संसार वेगळा .दोन जनरेशनची माणसे आपण . एकमेकांशी कधीच पटणार नाही हे माहीत होते मला . सासू सुनेची मते पटणार नाहीत याचीही कल्पना होती . म्हणून आधीच सर्व तयारी केली आम्ही .एका कंपनीला आम्ही पैसे भरले ते आमच्या तब्बेतीची वेळोवेळी काळजी घेतात .जेवण करायला बाई येतेच .तिच्या मुलाला आम्ही सांभाळतो .त्याला शिकवतो .कोण म्हणतो म्हातारपणी मुलाची गरज भासते . आम्हाला तुझी गरज नाही .आहे तिथे तुम्ही सुखी राहा आणि आम्हालाही सुखी राहू दे .आज तुमच्यामुळे आम्ही प्रेमाचे दिवस पाहू शकलो.एकमेकांना समजून घेण्याइतका वेळ मिळतो आम्हाला.पाहुणा म्हणून कधीही ये .मुलगा म्हणून येऊ नकोस". वसंतरावानी हात जोडून नमस्कार केला आणि घराकडे वळले .
© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment