Tuesday, January 30, 2018

पाळी

"काय ग....! नक्की कशाची जाहिरात आहे ही.... ?? आजीने सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहून आरोहीला प्रश्न विचारला.तशी आरोही चपापली.काहीच न सुचल्यामुळे तिने आईकडे पाहिले .शुभदाही नेमकी तिच्याकडे पाहत होती.हसून तिने खुणेनेच सांगितले दे उत्तर .. लाजून आरोहीने मान वळवली.
तशी शुभदा आईकडे वळून म्हणाली "अग….. पाळीच्यावेळी वापरायचे पॅड आहेत ते.हल्ली कापड वापरणे बंद झालंय.हेच वापरतात सगळीकडे".इतके बोलून आत गेली आणि एक नॅपकिन आणून आईच्या हातात दिला.
"अग्गो बाई...! किती छान ग.. किती सुधारणा झालीय.तरीच हल्ली गावात कोणाच्या मागच्या अंगणात छोटे कपडे वाळताना दिसत नाहीत".आजी कौतुकाने म्हणाली.
त्यांचा हा संवाद ऐकून आरोही बेडरूममध्ये जाण्यास निघाली.तसे शुभदाने तिला रोखले आणि बसण्यास सांगितले.
"खरच ग ..खूप बदल झालेत".
शुभदाची आई आता 85 वर्षाची होती.संपूर्ण आयुष्य गावी गेलेले.तेही छोट्या खेडयात.वडील आणि नवरा दोघेही स्वातंत्रसैनिक.त्यामुळे ही पहिल्यापासून कणखर .
"अग आरोही ...! तुला माहीत आहे का आमच्या वेळी असे काही नव्हते ग.मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा मी नदीवर कपडे धुवायला गेली होती आईबरोबर .अचानक रक्त पाहून आई लगबगीने घरी घेऊन आली . मग अंगणातले गवत एकत्र बांधून ते माझ्या मांड्यांमध्ये ठेवले आणि कोपऱ्यात बसवून ठेवले . वर ओरडली आता इथून कुठे बाहेर जायचे नाही. देवाला स्पर्श करायचा नाही .रोज हे बदलायचे.असे बोलून गवताच्या जुड्या कश्या करायच्या ते शिकवले.मला कळेना काय अपराध झाला माझा.. ?? रोज जवळ घेऊन जेवण भरवणारी आई आज अशी का वागते..?? मग तिने सांगितले यापूढे दर महिन्यात चार दिवस असेच येणार तेव्हा असेच लावायचे आणि लोकांना टाळायचे. पुढे लग्न झाले नशिबाने नवरा चांगला मिळाला.त्याने खूप सवलत दिली मला.शिकण्यासाठी मदत केली . माझ्या कोणत्याही गोष्टीस विरोध केला नाही . शुभदा झाली तेव्हा नातेवाईकांची खूप टोमणा खावे लागले.मुलगी झाली ना...? पण त्यांनी खूप आधार दिला".
"हो ..खरे आहे .." शुभदा बोलू लागली." लहान असताना त्या दिवसात आई बाहेर बसायची नाही म्हणून इतर बायका खूप बोलायच्या तिला. पण बाबा खंबीर होते .त्यांनी या गोष्टीला विरोध केला.जेव्हा मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा मी शाळेत होते.बाईने ताबडतोब मला घरी पाठविले. भर रस्त्यातून रक्ताने भिजलेल्या परकरवर मी घरी आले.तेव्हा आईने धीर दिला अग... हे होणारच. मोठी झालीस तू असे म्हणत कपडे बदलले मग वहीवर छान चित्र काढून हे असे का होते ते समजावले.जुन्या सुती साडीचे  चौकोनी तुकडे फाडून ते कसे वापरायचे हे शिकवले.या दिवसात जास्त काम करू नकोस असे समजावले . इतरजण रागावतील म्हणून देवघरात जाऊ नकोस असे सांगितले . तिने कधीही मला पाळी येणे म्हणजे काही विचित्र आहे असे भासू दिले नाही .हा एक स्त्रियांचा शरीरधर्म आहे ती एक नॉर्मल प्रोसेस आहे हेच मनावर बिंबविले. पुढे माझे लग्न झाले तेव्हाही तिने माझी मुलगी मासिक पाळीचा फार बाऊ करणार नाही असे सासरच्याना स्पष्ट सांगितले . तुझ्या बाबांनीही नेहमी मला साथ दिली . हळू हळू कपड्याच्या जागी पॅड आले.आरोही.. तू भाग्यवान आहेस की यागोष्टीची भीषणता ,मानहानीचा  त्रास तू भोगला नाहीस . शाळेत आणि नेटवरच या गोष्टीची कल्पना आधीच तुम्हाला दिली गेली होती.अत्याधुनिक गोष्टी तुमच्यासाठी आहेत.पाळीत तुम्ही नॉर्मल वागू शकता.आणि तरीही अजून यागोष्टीची चर्चा करायला तुम्हाला लाज वाटते ?? आज बरेच बदल घडलेत. आजीला या गोष्टीची उत्सुकता आहे .तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकविल्या पाहिजेत."
हे ऐकून आरोही भानावर आली तिने ताबडतोब आजीला सॉरी म्हटले आणि तिच्या बाजूला बसून टीव्ही पाहू लागली .

© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment