Sunday, December 16, 2018

एक आठवण

साल....१९९०
ठिकाण .... सिद्धिविनायक मंदिराशेजारी साने गुरुजी उद्यान
वेळ.....साधारण रात्री १०
घरी अभ्यास करायला जागा नाही म्हणून बरीच मुले साने गुरुजी उद्यानात अभ्यासाला यायचे. आठ वाजता गार्डन बंद झाले तरी होर्डिंगच्या हेडलाईट्सच्या उजेडात अभ्यास चालू असायचा. काहीजण दिवसभर काम करून रात्रभर अभ्यास करायचे.बाजूला सिद्धिविनायकसारखे प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे गर्दीही फार असायची . भिकाऱ्यांच्या लांबलचक रांगा गार्डनला लागून बसायच्या . मग काही श्रीमंत कुटुंब आपापल्या गाड्यामधून त्या भिकाऱ्यांसाठी जेवणाचे डबे घेऊन उतरायचे . आपल्या हाताने सर्व भिकाऱ्यांना वाढायचे . त्यांच्या चेहऱ्यावरचे तृप्तीचे भाव पाहून खुश व्हायचे.
काय नाही त्या भिकाऱ्यांना मिळायचे ....?? सकाळी उठल्यापासून त्यांच्या हातात कोणतरी चहाचा कप द्यायचा तर दुसरा लगेच बिस्किट्स वाटप चालू करायचा . ते संपत नाही तोवर कोणतरी इडली किंवा बटाटेवड्याचे पाकीट सोपवायचा . कधी कधी तर दोनतीन जण एकदम वाटायला यायचे . त्यांचा नाश्ता होत नाही तोपर्यंत लाडू चॉकलेट्स असे वाटप व्हायचे . आता जेवणाची वेळ झाली....?? काही काळजी नको येतीलच आता जेवण घेऊन .. ..हो आलेच आणि स्वतःच्या हाताने वाढायला सुरवात झाली .जेवणही छान असते . पुलाव ..भाजी ...पुऱ्या आणि त्यानंतर ही चहा असतो बरे .... सर्वजण भिकाऱ्यांना दानधर्म करून पुण्य कमवायला बघतात पण जाळीच्या मागे अभ्यास करणाऱ्या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही .त्यांना अभ्यासात उत्साह येण्यासाठी ..डोळ्यावर आलेली झोप उडविण्यासाठी ...गरम गरम चहाची आवश्यकता असते पण त्यांना कोणी विचारत नाही .
पण त्या दिवशी त्यातील एका मुलाने हिंमत केलीच आणि चहा वाटप करणाऱ्या त्या गृहस्थाला सरळ विचारले " आम्हाला चहा दिला तर तुमच्या पदरीचे पुण्य कमी होणार आहे का ..."??
तसा तो गृहस्थ चमकला ...." तुम्ही पिणार का असा चहा ......"?? त्यांच्या स्वरात आश्चर्य होते .."थांबा मी आणतो .."
आजूबाजूची मुले ते पाहून आश्चर्यचकित झाली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला "काय हरकत आहे चहा प्यायला...??,रात्रभर अभ्यास करणार आहोत खिश्यात दमडी नाही चहा प्यायला ..ते घरून आणून देत असतील तर पिवूया. तेव्हडे त्यांना ही पुण्य. थोडयावेळाने तो गृहस्थ चहा आणि कागदी पेले घेऊन आला . जवळजवळ वीस पंचवीस मुलांना त्याने चहा वाटला . त्यादिवशी खरेच त्याच्या पदरी पुण्य पडले .
आंतरराष्ट्रीय चहादिनानिमित्त एक आठवण
© श्री .किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment