Sunday, December 16, 2018

आंतरराष्ट्रीय चहा दिन

आंतरराष्ट्रीय चहादिन
खरेतर आज मूड आला होता बसायचा. सौ नेही मोठ्या मनाने परवानगी दिली होती. आता फक्त विक्रम यायची खोटी की निघालोच आम्ही शेट्टीकडे ......टेलिपथी जुळल्याप्रमाणे विक्रम दारात हजर .."काही म्हणा सख्खे मित्र शोभतात ..."सौच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही बाहेर पडलो.
नेहमीच्या गप्पागोष्टी करत आम्ही गार्डनजवळ आलो . मुलांची अभ्यासाला येण्याची सुरवात झाली होती .त्यातील काही ओळखीच्या मुलांनी आम्हाला पाहून हात हलविला.अण्णांच्या टपरीजवळ येताच विक्रम थबकला"कटिंग पिवूनच जाऊ .."त्याने मला म्हटले.अर्थात चहा कुठेही ..कधीही ..पिण्यास नाही म्हणायचे नाही हे ठरलेले असल्याप्रमाणे मी मुकाट्याने बाकड्यावर बसलो.
"अण्णा किती धंदा असतो रोजचा तुझा ...?? विक्रमच्या या प्रश्नाने मी चमकलो तसा अण्णा ही चमकला.
"होतो साहेब पोटापुरता ... "अण्णा हसत हसत म्हणाला.
"म्हणजे बघ हा...!! तू सकाळी पाचला धंदा सुरू करत असशील ते रात्री अकराला बंद करतोस .."आता मात्र अण्णा संशयाने आमच्याकडे पाहू लागला.
"म्हणजे बघ हा ...हजार कटिंग तरी रोजचे..सध्या सात रुपये कटिंग म्हणजे सात हजाराचा गल्ला..हप्ता,मटेरियल घरखर्चवगैरे जाऊन तीन हजार तरी तुझ्या हातात .म्हणजे महिन्याला नव्वद हजार तुझी कमाई ."आता मात्र अण्णा खरोखर गंभीर झाला.
" पण भाऊ मेहनतही आहे ना ..?? अण्णा माझ्याकडे पाहून म्हणाला.आम्ही दोघांनी मान डोलावली.
"हो रे ....ते नाकारीत नाही आम्ही .म्हणूनच आज आम्ही तुला चहा बनवून देणार . तसाही आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे आणि दिवसभरात कधीही चहा हजर करणाऱ्या माणसाला आम्ही विसरू शकत नाही . तेव्हा बाजूला हो आणि समोर बस मी चहा बनवतो.."विक्रम सहजपणे म्हणाला.
"काहीतरी काय साहेब ..."तो कसानुसा हसत म्हणाला. "अरे बस ....बघ विकी किती छान चहा बनवतो.मी हसत म्हणालो.
विक्रम काही न बोलता त्याच्या जागेवर गेला आणि सराईत असल्याप्रमाणे चहा बनवला . तीन कटिंग बनवून त्याने आमच्या हाती दिला . चहाचा पहिला घोट घेताच अण्णा खुश झाला.
"साहेब... आज इतक्या वर्षात कोणीतरी पहिल्यांदा मला चहा पाजला.... बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. इतक्यात गार्डनमधील दोन मुले टपरीवर आली. "काका... दोन कटिंग... मस्त कडक बनवा.आज रात्रभर बसायचे आहे अभ्यासाला" विक्रमने काही न बोलता दोन कटिंग त्यांनाही दिल्या. पैसे पुढे करताच त्याने घ्यायला नकार दिला.
"अरे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे आणि तुमच्यासारख्या गार्डनमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या मुलांकडून मी आजतरी पैसे घेणार नाही . चहा प्या आणि अभ्यासाला पळा.."  त्या मुलांनी हसत हसत माना डोलावल्या आणि गार्डनकडे वळले.
सवयीप्रमाणे मी खिश्यातून पाकीट काढले" किती झाले अण्णा सर्व कटिंगचे ..."??
"कशाला लाजवताय भाऊ... इतकी वर्षे इथे धंदा करतोय पण असा अनुभव पहिल्यांदाच आला आणि हो आयुष्यात फक्त माझेच पाहिले मी दुसऱ्यांचा विचारच नाही केला. हा चहा दिवस असतो हेही माहीत नव्हते मला . पण आतापासून आजचा दिवस लक्षात ठेवीन आणि या दिवशी गार्डनमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना फुकट चहा पाजेन.."अण्णांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारीत आम्ही निघालो.
नटराजजवळ येताच मी विक्रमला विचारले "आंतरराष्ट्रीय अल्कोहोल डे कधी आहे ते शेट्टीला विचारायला हवे ...."आणि हसत हसत आत शिरलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment