Saturday, March 30, 2019

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस.

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस... ले. जन. के.एस. ब्रार
अनुवाद....भगवान दातार
रोहन प्रकाशन
मुळात सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाईची खरोखर गरज होती......? तर त्याचे उत्तर होय असेच होते. पंतप्रधान इंदिरा गांधींनी शेवटच्या क्षणापर्यंत ही कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले.
ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त लष्करी कारवाई होती.त्याचे नेतृत्व करणारे ले. जन. ब्रार आजही शीख अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत . इतकेच नव्हे तर 30 सप्टेंबर 2012 मध्ये लंडन येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला.
या कारवाईचे प्रमुख पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या झाल्या . तर त्यांच्या हत्येस जबाबदार असणारे आणि हत्या करणारे हुतात्मा म्हणून गौरवले गेले.
लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे यासाठी ले .जन. ब्रार यांनी स्वतः अनुभव  लिहायचे ठरविले . त्यांनी या कारवाईचे अचूक आणि तपशीलवार वर्णन केले आहे .
प्रमुख अतिरेकी संत भिद्रानवाले यांनी घेतलेला सुवर्ण मंदिराचा ताबा . त्यात दडवलेली प्रचंड शस्त्रास्त्रे यावर सरकारने नरमाईचे धोरण घेतले . जातीय तणाव वाढून हिंसाचार होऊ नये ही यामागची भूमिका होती .पण पुढे गोष्टी इतक्या थराला गेल्या की 26 जानेवारी 1984 च्या प्रजासत्ताकदिनी स्वतंत्र खलिस्तानचा झेंडा मंदिर परिसरातील एका इमारतीवर फडकविण्यात आला . अतिरेक्यांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या हत्या करण्यात आल्या .
सरकारशी संघर्ष उडालाच तरी आपल्याविरुद्ध लष्करी कारवाई होणार नाही असे भिद्रानवाले याना खात्री होती . जास्तीतजास्त निमलष्करी दलाचा वापर होईल असे त्यांना वाटत होते .
पण पंजाबमधील राष्ट्रपती राजवट पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोसळली .
अतिरेक्यांनी पंजाब पोलीसदलात शिरकाव केला त्यामुळे पोलिसदलाने आपली आपली शक्ती आणि अधिकार गमावले तसेच त्याचे मनोधैर्यही खचले .
भिद्रानवाले यांनी अकाल तख्तातून बाहेर यावे यासाठी सर्वांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले .
राज्यातील अन्नधान्याची वाहतूक रोखण्याचे आंदोलन 3 जून 1984 पासून सुरू होणार होते आणि मग राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती आणि म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाई करायची परवानगी दिली . पण त्यासाठी काही अटी घातल्या
कमीत कमी बळाचा वापर
सुवर्ण मंदिराचे कमीतकमी नुकसान
हर मंदिरसाहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायच्या नाहीत .
कारवाईत भाग घेणाऱ्या सर्व सैनिकांनी मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे . भाविकांना बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे .
या अटींवरच कारवाई झाली पाहिजे असा त्यांचा स्पष्ट आदेश होता आणि प्रत्येक जवानाने तो काशोशीने पाळला . यात भारतीय लष्कराची फार मोठी हानी झाली.
1 जून 1984 ला ऑपरेशन ब्लू स्टार ला मान्यता मिळाली आणि 5 जून 1984 ला रात्री 9.30 वाजता ऑपरेशन ब्लू स्टार सुरू झाले . जास्तीत जास्त दोन रात्रीमध्ये हे ऑपरेशन संपेल असा अंदाज होता पण ते पूर्ण व्हायला 4 रात्री लागल्या .
अपुरी माहिती ..अपुरा वेळ ..मोजकेच मनुष्यबळ . प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी चुकलेले अंदाज  तर काही ठिकाणी घ्यावी लागलेली अनपेक्षित माघार याचा भारतीय लष्कराला मोठा फटका बसला.प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग...अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार पाहून आपण थक्क होतो .
केवळ शीखांच्या नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतात.
आपल्या प्राणांची पर्वा न करता आणि दिलेल्या हुकुमाचे तंतोतंत पालन करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम.
© श्री . किरण कृष्णा बोरकर
मुंबई
8286837133

No comments:

Post a Comment