Sunday, June 2, 2019

माझे आईबाबा

माझे आईबाबा
स्थळ ... परदेशातील एका युनिव्हर्सिटीच्या आवारातील कॉफीशॉप
ते दोन भारतीय तरुण एका कोपऱ्यातील टेबलवर बसून कॉफीचा आनंद घेत होते.
" शेवटी परदेशातील पदवी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आपले ...". पहिला त्या दुसऱ्याला म्हणाला.
" आपले नाही ...तुझे स्वप्न पूर्ण झाले.. मी तर माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले .."दुसरा थोडा विषादाने म्हणाला. उंची किमतीचे कपडे त्याच्याअंगावर खुलून दिसत होते आणि  जन्मजात श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती .तर पहिला एकदम साधा दिसत होता पण चेहऱ्यावरचे बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते.
"तसे समज... पण शेवटी परदेशी डीग्री मिळणे महत्वाचे आहे. तुला वडिलोपार्जित बिझनेससाठी गरज होती तर मला माझी गरिबी दूर करण्यासाठी". पहिला हसत म्हणाला.
"मान्य रे.....!!  पण माझी आवड ही नाही . मला संगीतक्षेत्रात काम करायचे आहे . संगीत माझी आवड आहे... माझे वेड आहे... मला त्यात नाव कमवायचे आहे . आता मी भारतात गेल्यावर संगीतक्षेत्रात घुसेन . आणि ते करता करता बिझनेसही सांभाळेन.."दुसरा तोऱ्यात म्हणाला .
"वा छानच ....मला मात्र दुसरा पर्याय नाही . ह्या पदवीचा उपयोग पैसे कमविण्यासाठी करेन .अरे त्यासाठीच तर इतकी वर्षे कष्ट केले . प्रत्येक शिष्यवृत्ती माझ्यासाठी आहे असे समजून त्या मिळवल्या आणि त्यांच्या जीवावर इथे पोचलो .आता सर्वांची देणी फेडायची वेळ आलीय..."पहिला अभिमानाने म्हणाला.
" छान ....पण काय रे परवाच्या पदवीदान समारंभाला तुझे आईवडीलही येणार आहेत ना ...?? त्यांना जमेल ना यायला ?? तूच म्हणत होतास की दोघेही अपंग आहेत ...?? दुसऱ्याने कौतुकाने विचारले
"हो रे ...येणार आहेत दोघे. मी तिकीट्स पाठवून दिल्या आहेत . पहिला सहजपणे उत्तरला.
" बस इतकेच ....बाकीचे काय ...?? पहिल्या परदेश प्रवासात भले भले घाबरतात . त्यात तुझे वडील अंध तर आई अधू . कसे जमेल त्यांना .....??.दुसरा थोडा वैतागून म्हणाला.
"अरे सगळे जमेल त्यांना ..आतापर्यंत माझ्यासारख्या धडधाकट मुलाला सांभाळले. मोठे केले.. त्याला परदेशात जायची प्रेरणा दिली. त्यांना काहीच अशक्य नाही . तुला एक गंमत सांगू माझी आई म्हणते तू बाबांवर गेलास तेव्हा बाबा म्हणतात पण माझा चेहरा कुठे मला माहित आहे .....?? असे म्हणून जोरात हसू लागला. दुसऱ्याचा चेहरा पडला.
" खरेच ...कसे मॅनेज केले असेल रे तुला इतकी वर्षे ..??
"माहीत नाही पण असे म्हणतात मला आई आपल्याजवळ ठेवायची आणि बाबा दुकानावर बसायचे . आई मला सांभाळत जमतील ती कामे करायची . पुढे मला महानगरपालिकेच्या शाळेत घातले . त्यामुळे सातवीपर्यंत शिक्षण सहज . मग आई बाबांचे कष्ट पाहून त्यांना मदत करू लागलो . बाबांसोबत दुकानात बसू लागलो म्हणून  पुढचे शिक्षण रात्रशाळेत . माझी शाळेतील उपस्थिती आणि वर्तणूक पाहून आईबाबांना कधीही शाळेत यावे लागले नाही. पण दहावीला माझे गुण पाहून प्रिंसिपलनी वडिलांना भेटायला बोलावले आणि समोर अंध व्यक्तीला पाहून ते उडालेच. मग माझी हुशारी पाहून त्यांनी मला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली. मग आमचा प्रवास चालू झाला ते वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर . तुला सांगतो मुंबईतील एकही संस्था नसेल जिथली मी शिष्यवृत्ती घेतली नाही...." असे बोलून तो मोठ्याने हसला . दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य नव्हते तर एक कौतुक दिसत होते .
" पुढे ...?? दुसऱ्याने उत्साहाने विचारले.
" पुढे काय.... ??? पदवीधर झालो आणि सरांनी विचारले" परदेशी जाणार का ...?? मला तर केव्हा एकदा नोकरी करतो असे झाले होते. आई बाबांचा त्रास पाहवत नव्हता रे ....मी सरळ नाही म्हटले आणि ती गोष्ट बाबांपर्यंत कशी गेली माहीत नाही. रात्री त्या पांढऱ्या लाल छडीचे दोन तडाखे पाठीवर पडले आणि ऑर्डर आली बॅग भर आणि जा सर सांगतील तिथे त्यांना साथ द्यायला आई ही होतीच . किती समजावले त्यांना म्हटले इथे मिळेल नोकरी राहू तिघे आरामात .  तुम्हाला संभाळण्यापूरते नक्की कमावीन मी. तर म्हणतात तू नसताना ही आमचे चालले होते की छान .. आमच्यापुरते आम्ही कमवत होतो .  अजून दोन वर्षे कमवू पण तू संधी सोडू नकोस . आम्ही शरीराने अपंग असलो तरी मनाने अपंग नाहीत .त्यांचा निर्धार पाहून मीही पुढे शिकण्याचे ठरविले .आणि खरेच दोन वर्षे हा हा म्हणता गेलीत . विडिओ कॉल करतो तेव्हा मी कसा दिसतो ते आई बाबांना सांगते ते ऐकण्यासारखे असते आणि बाबांचा चेहरा पाहण्यासारखा असतो".असे बोलून पाहिल्याने हळूच डोळे पुसले .दुसर्याने त्याचा हात हाती घेऊन हळूच दाबला . त्या स्पर्शात मित्रत्वाची भावना होती .
"खरे आहे मित्रा... परवाच्या पदवीदान समारंभात हजर  राहणारे तुझे आईवडील सर्वात भाग्यवान असतील . त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद किती महत्वाचा आहे याची कल्पना तुम्हा तिघांनाच असेल..." .बोलता बोलता दुसर्यानेही आपल्या डोळ्यातील अश्रू हळूच पुसले .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment