Thursday, October 3, 2019

एक देवी अशीही

एक देवी अशीही
स्टेशनवरील ब्रिजच्या एका कोपऱ्यात ती बसायची. मांडीवर... डोक्याला आणि हाताला बँडेज बांधलेला छोटा मुलगा.दोघांच्याही चेहऱ्यावर केविलवाणे भाव. मुलगा तर कायम डोळे मिटून बसलेला.जणू काही बेशुद्ध.जाणारे येणारे नव्वद टक्के प्रवासी कितीही घाईत असले तरी तिथे थांबून चकचक करीत एक रुपया तरी पुढ्यात टाकणारच.
अर्थात नेहमीच्या प्रवाश्यांना त्यांची चिंता नव्हतीच. त्यांना नेहमीची ट्रेन पकडायची चिंता ...ती वेळेवर येईल का ...?? ही चिंता .. मग चढायला मिळेल का ..?? ही पुढची चिंता ... चढल्यावर  उभे राहायला जागा मिळेल का ....?? स्टेशन आल्यावर धडपणे उतरायला मिळेल का ...?? अश्या अनेक चिंता असताना तो त्या भिकाऱ्यांची चिंता का करेल??
त्या दिवशी सौ.देवीची ओटी भरायला मंदिरात गेली. जोडीला चार पाच मैत्रिणी. त्या बाईला पाहून या सर्वांच्या काळजात दयेचा पाझर फुटला. सर्वांनी देवीला अर्पण करायच्या साड्या तिला देऊन टाकल्या. त्यांचे पाहून बऱ्याच बायकांनी आपल्याकडील देवीला देण्याची भेटवस्तू तिला देऊन टाकल्या.
संध्याकाळी मी घरात शिरताच माझ्या पुढ्यात बसून हे सर्व पुराण मला सांगून झाले.आज खरे दान झाले हो ...सौचा समाधानाने फुललेला चेहरा पाहून आपल्याला चहा नाश्ता मिळणार नाही याची खात्री मला पटली.मी मुकाटपणे चपला घातल्या आणि नाक्यावरच्या टपरीवर आलो. थोड्याच वेळाने विक्रमही आला . त्याचा चेहरा पाहूनच काय झाले हे विचारायची हिंमत झाली नाही .  मी शांतपणे घरातून बाहेर पडलो होतो पण विक्रमने  चार शिव्या देऊनच बाहेर पडला याची खात्री झाली .
दोन दिवसांनी दसरा होता. आमच्या शेजारणीची कामवाली बाई नवीन साडी नेसुनच आज कामावर आली.तिला पाहताच सौ चमकली.काहीतरी गडबड आहे याचा अंदाज मला आला.मी हळूच कान टवकारून बसलो आणि माझा अंदाज खरा निघाला.
काही मिनिटाच सौ.कोणालातरी बडबडत घरात शिरली.मी धडधडत्या मनाने तिच्याकडे चहा मागितला.कारण तेच एकमेव कारण होते तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा.तिने रागारागात चहाचा कप माझ्या पुढ्यात ठेवला.मी भीतभीतच तिला कारण विचारले तेव्हा तिने कामवालीने घातलेली साडी तिचीच आहे हे मला सांगितले.ती ज्या ठिकाणी राहते तिथे एक बाई बऱ्याच साड्या घेऊन आली आणि शंभर रुपयाला एक अश्या सर्व साड्या विकून गेली .  यासर्व साड्या तिने  आणि तिच्या मैत्रिणीने देवीला न देता त्या स्टेशनवरच्या भिकरणीला दिल्या होत्या .आणि तीच भिकारीण सर्व साड्या विकून गेली. माझ्या डोळ्यासमोर विक्रमचा चेहरा आला त्याच्या घरीही ही बातमी पोचणार याची खात्री होती म्हणून मी हसू दाबून मुकाटपणे चहा पिऊ लागलो .
संध्याकाळी सौ.मला घेऊन त्या ब्रिजवर गेली . ती बाई नेहमीप्रमाणे जखमी मुलाला मांडीवर घेऊन बसली होती . दोघांच्या चेहऱ्यावर तेच केविलवाणे भाव . सौ तरातरा चालत तिच्याजवळ गेली" देवीला साडी देण्यापेक्षा गरजू बाईला साडी देणे पुण्याचं काम म्हणून तुला साडी दिली. तर तू ती विकून टाकलीस ..?? असे केलेस तर कोणाचा विश्वास बसेल तुमच्यावर ....?? तुम्ही ही फसवणारे निघालात .."?? सौ. तावातावाने भांडू लागली. तशी ती भिकारीण म्हणाली .. "रागावू नका ताई .. मी साधी भिकारीण. भीक मागणे हेच माझे काम .. तुम्ही दिलेली एक साडी वर्षभर पुरली असती मला . पण तुमच्यासारख्या बर्याचजणी इथे येऊन साडी देऊन गेल्या.आहो पन्नास तरी साड्या जमा झाल्या असतील माझ्याकडे . इतक्या साड्या घेऊन मी काय करू ...?? बरे.. त्या साड्या नेसून इथे बसले तर कोणी भीक देणार नाही . रोजचा पाच सहाशेचा धंदा बुडेल. मग घरात तरी नव्या कोऱ्या साड्या कश्या ठेवायच्या ..??  म्हणून त्या गरीब वस्तीत जाऊन साड्या विकल्या . मी गरीब भिकारीण त्यामुळे साड्या फुकट देणे मला परवडणार नाही. शिवाय जास्त किमतीत विकायला गेले तर लोक संशय घेतील म्हणून मी त्या वस्तीतील गरीब स्त्रियांना परवडतील अश्या किमतीत या साड्या विकल्या . त्याही खुश मीही खुश आणि त्याचा वापर होतोय म्हणून देणारे ही खुश.."
सौ.चा राग हळू हळू निवळत गेला आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ."चला... म्हणजे मी दिलेली साडी दोघींच्या उपयोगी पडली तर .."चेहऱ्यावर समाधान घेऊन आम्ही घरी निघालो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment