Thursday, January 16, 2020

त्यांची ही संक्रांत

त्यांची ही संक्रांत 
नेहमीप्रमाणे नेहमीच्या स्टेशनवर तो माझ्या डब्यात शिरला. ती विशिष्ट टाळी ऐकून मी पुस्तकात घातलेली   मान वर केली.त्याचवेळी आमची नजरानजर झाली आणि तो ओळखीचे हसला.माझ्याही चेहऱ्यावर ओळखीचे हास्य पसरले.
आज तो संक्रांतीची काळी साडी नेसुनच आला होता . हलव्याचे दागिने म्हणून पांढरे दागिने अंगावर होते . सर्वांजवळ फिरून झाल्यावर माझ्या शेजारी येऊन बसला.
"संक्रात जोरात आहे तुझी ..." मी हसत म्हणालो . "धंदा आहे भाऊ ... तो टाळी वाजवत हसत म्हणाला . जसा सण तसे राहावे लागते.तरच कोणतरी आपले मानून पैसे देईल.
" खरे आहे... मी म्हटले. यावेळी त्याच्या खांद्यावर पर्स ऐवजी पिशवी बघून मी चमकलो.
"यात काय आहे ....?? पैश्याऐवजी वस्तू ही घेतोस का...."?? मी नजर रोखून विचारले.
तसे त्याने पिशवी उघडून दाखवली.आतील वस्तूवर नजर जाताच मी चमकलो . पिशवीत दहा पंधरा सॅनिटरी पॅड होते.
"हे कशासाठी ...?? तुम्हाला याची गरज भासते का ...."?? मी अज्ञान प्रकट केले.
"हे माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी नाही भाऊ . पण संक्रातीला स्त्रिया वाण देतात.हळदीकुंकू करतात . त्या निमित्ताने चार स्त्रिया एकत्र येतात .. लेडीज डब्यातही हळदीकुंकू मोठ्या प्रमाणात साजरा होतो . मी कालपासून सगळ्या लेडीज डब्यात सांगून आलोय मला पैसे नकोत फक्त एक सॅनिटरी पॅड द्या . भाऊ आमच्या वस्तीत आणि आजूबाजूला खूप वयात येणाऱ्या मुली राहतात . गरिबीमुळे त्यांना ह्या वस्तू विकतही घेता येत नाहीत . काहीजणी ब्रिजखालीही राहतात . सर्वच जण पोटाच्या मागे . ह्या शारीरिक गोष्टीकडे कोण लक्ष देत नाही . म्हणून मी ठरवले यावेळी काही दिवस  कोणत्याही स्त्रीकडून पैसे घ्यायचे नाही तर एक पॅड घ्यायचे . आता दुपारी जेवायला जाईन तेव्हा जमतील तितके पॅड मुलींना वाटून टाकेन. भाऊ.....!!  समाजसेवा फक्त तुम्हालाच जमते का ....?? आम्ही ही याच समाजात राहतो . आमचाही काही हिस्सा असू दे ..तो हसत हसत म्हणाला.
मी भारावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले . काही न बोलता खिशातून शंभर रुपयांची नोट काढून त्याला दिली.
" अरे नको भाऊ.. ... !! तुमचा नियम तुमची तत्वे मोडू नका.भरपूर आहेत इथे पैसे देणारे...." तो माझा हात पकडत म्हणाला.
" हे तुझ्यासाठी नाही .यातून काही पॅड विकत घे आणि गरजवंतांना दे . या पैशाचा योग्य उपयोग तूच करशील याची खात्री आहे मला...."
आज त्यांच्यातील माणुसकीची वेगळीच ओळख झाली मला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment