Sunday, January 26, 2020

वंदे मातरम

वंदे मातरम 
"आंदोलन करतायत साले .... अरे.. दिवस.. वेळकाळ तरी बघा .. ..उद्या सव्वीस जानेवारी आहे .आधीच जादा बंदोबस्त... जास्त त्यात तुमची भर..."कोठडीचा दरवाजा उघडून त्याला आत ढकलत तो पोलीस ओरडत होता.
तो तरुण मागून ढकलताच आत धडपडला.पंचवीस सव्वीस वर्षाचा कोवळा तरुण होता तो. पण चेहऱ्यावरचे गंभीर भाव बरेच काही सांगून जात होते.
पोलिसांकडे पाहत तो नुसताच हसला.
"च्यायला.... आंदोलन ही वेळ..काळ.. दिवस ..पाहून केली जातात का .....?? मनात म्हणत तो कोपऱ्यात शांतपणे बसला . बाहेर बरीच गडबड चालू होती .
काही वेळाने पुन्हा कोठडीचा दरवाजा उघडला गेला आणि आतमध्ये ते दोघे आले.एकतर स्थानिक नेता होता.त्याच विभागातील होता बहुतेक . याने बऱ्याचवेळा त्याचे पोस्टर चौकात पाहिले होते.
 एक जून वाढदिवस .... लक्षात येताच तो हसला. सरकारने पूर्वीपासून काही गोष्टी चांगल्या केल्या होत्या .जन्म दाखला नाही तर  एक जून टाकून पुढे जा ... त्याच्याबरोबर दुसरा त्याचा उजवा हात असावा . आल्याआल्या त्याने खिश्यातील रुमाल काढून फरशी साफ केली.पण काय उपयोग..?? मगाशी त्याला ढकलून देणाऱ्या शिपायाने खुर्ची आणूनही ठेवली . त्याचबरोबर बिसलरी बाटली . 
" हे लवकर आटपा.. उद्या सव्वीस जानेवारी आहे . बरीच तयारी करायची आहे ..संध्याकाळ फ्री पाहिजे . तो नेता आपल्या उजव्या हाताला म्हणाला.
"साहेब बाहेर कार्यकर्ते बसूनच आहेत .तुम्हाला घेऊनच बाहेर पडतील ...."उजवा हात ताबडतोब म्हणाला . 
अचानक त्याच्याकडे त्यांचे लक्ष गेले ."तू आमच्यातला आहेस का ....?? त्या नेत्याने त्याला विचारले .त्याने मान हलवून नकार दिला . 
"मग इथे कसा ...."?? 
"एक आंदोलन केले. जिल्हा अधिकार्यासमोर . आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून .... ."त्याने शांतपणे उत्तर दिले .
" तू एकटाच .... ?? बाकीचे कुठेय ....?? उजव्या हाताने आश्चर्याने विचारले .
 "मी एकटाच होतो .बरोबर त्या शेतकऱ्याची विधवा बायको ,सासू सासरे ,दोन मुले .... जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे धरले . काहीवेळाने पोलिसांनी अटक केली. त्या बाई.. वृद्ध मुलांना सोडून दिले आणि मला घेऊन आले .."तो हसत म्हणाला .
"अरे त्याने काय होणार आहे का ...?? आमच्याकडे यायचे .. आम्ही केले असते काहीतरी .. .."??तो नेता म्हणाला .
"ती विधवा बाई चारपाच वेळा तुमच्याकडे येऊन गेली.तुम्ही दरवेळी दोन दिवसानी या असे म्हणत होतात..." चेहऱ्यावरची रेषा न हलवता तो म्हणाला .
 "भाऊ बरीच कामे असतात आम्हाला.पूर्ण विभागाचा विकास करायचा असतो . एकेकट्याकडे लक्ष देता येत नाही..."कपाळावर आठ्या आणून तो नेता म्हणाला . 
इतक्यात तो शिपाई  हातात दोन कप चहा घेऊन आला .  
"हे काय दोनच कप ... ?? इथे आम्ही तीनजण आहोत.."तो नेता चिडून म्हणाला .
"ओ साहेब... हा पहिल्यांदाच येत नाही इथे ... सतत काहींना काही चालू असते याचे.कधी मोर्चा ..तर कधी धरणे  .. पुढच्या वेळी देईन..आता उद्याची गडबड चालू आहे . तुम्ही पुन्हा कधी येणार नाही इथे म्हणून तुम्हाला खास आणलाय ...."तो शिपाई हसत म्हणाला.यानेही बरोबर आहे अश्या अर्थाने मान डोलावली.पण उजव्या हाताने आपला कप त्याच्या पुढे केला . त्याने ही न बोलता घेतला . 
"मग हे आंदोलन ...मोर्चे तुझे काम आहे तर..?? नेत्याने विचारले आणि त्याला ठसका लागला.
"काम ...?? आतापर्यंत इतके मोर्चे काढले ,आंदोलने केली पण पैसे कधी मिळाले याची आठवण नाही आली त्याला . हो पण हातापायावर ,पाठीवर पोलिसांच्या लाठीचा बराच प्रसाद मिळालाय हे नक्की....त्याने नकारार्थी मान हलवली .
"मग हे सर्व फुकट करतोस का ...?? पुन्हा तो उजवा हात आश्चर्याने म्हणाला .
तो "हो..." म्हणाला .
"माझ्याबरोबर राहा ..खूप पुढे येशील ..भविष्य बनेल . तो नेता म्हणाला.आज मी ही आंदोलन केले . महागाई विरुद्ध ,बेकारी विरुद्ध . सरकार झोपले आहे त्याला जाग आणायला नको . पुढच्या वेळी आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हाला आंदोलन करायची गरज भासणार नाही . एकेकाला वठणीवर आणू .आज आपल्या विभाग बंद आहे ,रस्त्यावर एक वाहन दिसणार नाही . मगाशी देशातील प्रमुख नेत्यांचे पुतळे जाळले .काही कार्यकर्त्यांनी दोन तीन गाड्या जाळल्या.आता सर्व न्यूज चॅनलमध्ये आपल्या विभागातील ब्रेकिंग न्यूज आहे . बाहेर काही पत्रकार माझ्या बाईट्स साठी उभे आहेत...." नेता आवेशात बोलू लागला .
अच्छा म्हणजे हा विरोधी पक्षात आहे तर .अरे पण मागच्या वेळी सत्ताधारी पक्षात होता.
बाहेर सर्व बंद आहे असे कळताच तो हादरला . वडिलांची आजच डॉक्टरची अँपॉईमेंट होती .
ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला  आता जायला जमेल का ...?? बरे फोन करावा तर मोबाईलही पोलिसांनी काढून घेतला . चालत जातील ते पण मध्येच काही घडले तर पळापळ जमेल का त्याला.......... 
शेजारच्या छोट्या निखिलची आज पिकनिक होती .गेले  कित्येक दिवस तो आपण पिकनिकला किती मज्जा करणार हेच सर्वाना सांगत होता . पिकनिक कॅन्सल झाली ऐकून त्याची काय अवस्था होईल.
 त्याला आता घराची काळजी वाटू लागली आणि हे सर्व घडविणारा त्याच्यासमोर बसून बरोबरीने चहा पीत होता . किळस येऊन त्याने चहा बाजूला ठेवला .
इतक्यात तो शिपाई आत येऊन त्या दोघांनाही बाहेर घेऊन गेला.
" याला आज आतच ठेवा...बाहेर आल्यावर गडबड करेल ...असे पुटपुटताना त्याने ऐकले आणि पुन्हा तो काळजीत पडला.
सकाळी पोलीस चौकीत झेंडावंदन होताच त्याला बाहेर सोडण्यात आले .बाहेर  शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाहताच त्याला धक्का बसला.
" साहेब... खूप वाईट वाटलं बघा ..आम्हाला सोडून ते तुम्हाला घेऊन गेले .कालपासून इथे बसून आहे . तुमच्या जामीनाची व्यवस्था करायला खूप फिरलो .शेवटी चौकीतला मोठा साहेब म्हणाला सकाळी सोडतो.सुनबाई घरून चहा चपाती घेऊन आलीय . खाऊन घ्या थोडं .."त्या विधवेचा सासरा हात जोडून म्हणाला "आणि हो...तुम्ही गेल्यावर तहसीलदारांच्या ऑफिसात आम्हाला बोलावून सांगितले लवकरात लवकर तुमचे काम होईल .लय आनंद झाला साहेब .. म्हाताऱ्याला डोळ्यातील अश्रू थांबविता येत नव्हते . त्याने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवित चहाचा घोट घेतला .  कालच्या चहा पेक्षा आताच गुळाचा चहा खूप छान लागत होता .
घरी आला तेव्हा बाप त्याची वाट पाहत होता.
"या चिरंजीव ...लवकर आटपा ...,झेंडावंदन करायचे आहे ना ....??  
"होय पण काल डॉक्टरकडे गेलेला का ... ??त्याने विचारले.
"हो तर .. अरे बाहेर शुकशुकाट.. म्हटले अचानक काय झाले ..बस बंद रिक्षा बंद ..शेवटी नाक्यावरच्या काही मुलांनी विचारले कुठे जायचंय ...??? डॉक्टरकडे म्हणताच आपल्या बाईकवरून घेऊन गेले आणि इथे आणून सोडले सुद्धा ..तुला सांगतो आजचा तरुण खूप सेन्सिटिव्ह आहे . देशाचे भविष्य उज्ज्वल आहे बघ आपल्या ... बाप खुश होऊन बोलत होता .
 काही न बोलता  तो हसला आणि बाथरूममध्ये शिरला .बाहेर येताच वडिलांनी इस्त्री केलेला खाकी युनिफॉर्म त्याचा हातात दिला .
अनेक वर्षे जुना असलेला तो युनिफॉर्म आता विरत चालला होता .
"हे काय ... ..?? दरवर्षी तुम्ही घालता हे ..आज मला का ....??  त्याने आश्चर्याने विचारले.
"कारण आजपासून हा हक्क तुला दिलाय ...तुझ्या आजोबांचा आझाद हिंद सेनेचा हा युनिफॉर्म मी दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला घालतो.आम्ही दोघांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला . आझाद हिंद सेनेत तुझ्या  आजोबांना वीरमरण आले.स्वातंत्र्यानंतर काही काळ सर्व ठीक चालले होते . आम्ही ही शांत बसून राहिलो .पण आता तू लढा चालू केलायस . अन्यायाविरुद्ध लढतोस ,आपल्यामागे कोण आहेत कितीजण आहेत याचा विचार न करता लढतोस . हाच विचार तेव्हा आम्ही करायचो आणि त्याच विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज हा युनिफॉर्म घालण्याचा मान तुला आहे."
त्याने थरथरत्या हाताने तो युनिफॉर्म उघडला.अनेक भोके पडून चाळण झालेला युनिफॉर्म पाहून तो भारावून गेला. लहानपणापासून तो ती भोके मोजायचा . एकूण चाळीस भोके त्या युनिफॉर्मला होती. छातीपासून ते पायापर्यंत.बंदुकीच्या गोळ्यांनी छळणी झालेले आजोबा त्याच्या डोळ्यासमोर यायचे .विशेष म्हणजे एकही गोळी पाठीमागे नव्हती . युनिफॉर्मची मागची बाजू पूर्ण चांगली प्लेन होती . मागच्या वर्षीपर्यंत वडील हा युनिफॉर्म चढवून त्याला घेऊन झेंडावंदनला जायचे.ह्या वर्षीपासून ही मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली होती . भारावलेल्या अवस्थेत त्याने तो युनिफॉम् अंगावर चढवला आणि त्याच आवेशात वंदे मातरम तोंडातून कधी निघून गेले हे कळलेच नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment