Wednesday, January 8, 2020

ती कुठे काय करते ...??

ती  कुठे काय करते ....
पहाटे पाचचा गजर होताच तिचे डोळे खाडकन उघडले.दुसऱ्या मिनिटाला ती बाथरूममध्ये घुसली होती.नंतर अर्धा तास घरातल्याच ट्रेंडमिलवर धावून शरीर मोकळे केले आणि  मग ती किचनमध्ये घुसली.
 घरातील सर्व नेहमीप्रमाणे झोपले होते.आज टिफिन काय...??  असा नेहमीचाच प्रश्न स्वतःला विचारला आणि मग स्वतःशी हसत चहाचे आधण ठेवून पुन्हा बाथरूममध्ये घुसली.आंघोळ करून बाहेर येईपर्यंत चहा उकळला होता . स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी चहा घेऊन तिने बेडरूममध्ये प्रवेश केला.घोरत पडलेल्या नवऱ्याकडे पाहत ती प्रेमाने हसली आणि त्याचे बोट हातात घेऊन चहात बुडविले. टुणकन उडी मारूनच तो जागा झाला.रागाची एक ठिणगी डोळ्यात दिसली पण तिचा हसरा चेहरा पाहून तो शांत झाला.
" तू सरळ हलवून उठवू शकत नाहीस का ...?? रोज उठवायचे नवीन प्रकार असतात तुझ्याकडे ..." तो चिडून म्हणाला.
"तू सरळ उठणार आहेस का ....?? मला वेळ नाही तुझे लाड करायला....  रोज सकाळी एकत्र चहा पितोय ते पुरे..." ती चहाचा कप हातात देऊन म्हणाली.चहा संपताच ती परत किचनमध्ये घुसली आणि तो बाथरूममध्ये . तिने भाजी फोडणीला टाकली आणि पिल्लूच्या बेडरूममध्ये धावली. बेडवर ती शांतपणे झोपली होती. मध्येच मंद हसत होती . बहुतेक छानसे स्वप्न पाहत असावी . तिला अश्या वेळी उठवायचे तिच्या जीवावरच आले होते . पण शाळा बुडवून चालणार नव्हते . तिने अलगद झुकून तिच्या गालावर ओठ ठेवले." गुड मार्निंग बेटा .. उठ उठ शाळेत जायचे आहे ना .....??  तसे तिने नाराजीने कुस बदलली.हिने पुन्हा गालावर ओठ ठेवून गुड मॉर्निंग म्हटले तशी ती जागी झाली.
" ममा... तू दुष्ट आहेस .. तिने गाल फुगवून म्हटले  आणि तिच्या गळ्यात हात टाकून छान पप्पी घेतली. "हो ..आहेच दुष्ट पण चल तयारी कर पटकन .. शाळेत उशीर नको..... 
"मम्मी आज खायला काय आहे ....??? आणि डबा ...."?? तिने टूथब्रश तोंडात कोंबून विचारले.
" तुझ्या आवडीची मॅगी आणि डब्यात भाजी चपाती.."तिचे उत्तर तयार होते .
"शी बाबा... तू डब्यात मॅगी का देत नाहीस ...?? ती कुरकरली.
"कारण तुझ्या शाळेत त्याची परवानगी नाही .."
ती आंघोळीला गेल्यावर तिने नाश्ता ,टिफिन तयार केला . तोपर्यंत सासूबाई आल्या.
"आई ..पिलू बाहेर आल्यावर नाश्ता द्या .तोपर्यंत मी माझी तयारी करते ."असे बोलून बेडरूममध्ये पळाली.
 ती फ्रेश होऊन बाहेर आली तोपर्यंत पिलूची तयारी झाली होती.तितक्यात नवरा ही तयार होऊन आला होता. तिने पिलूची बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली तशी सासू ओरडली " तिची बॅग तिलाच घेऊ दे ..फार लाडवून ठेवू नकोस .
"राहू द्या हो आई .... गेटपर्यंतच तर जायचंय.बसमध्ये तीच घेणार आहे .."असे बोलून तिने मुलीला जवळ घेतले. अचानक तिच्या नाकाला परफ्यूमचा सुगंध आला." हे काय ....?? कोणता परफ्यूम लावलास .. मला हा वास आवडत नाही माहितीय ना तुला ...?? तिने थोडे  रागानेच म्हटले.
"पण मला आवडतो ... तिने ही गाल फुगवून म्हटले.
" बरे बाबा ....उगाच गाल फुगवू नकोस ."तिने हात जोडले आणि बाहेर घेऊन गेली. बसमध्ये बसवून ती परत आली तेव्हा सासूबाई नवरा तिची वाट पाहत होते . तिघांनी मिळून नाश्ता केला. ही पुन्हा तयारी करायला बेडरूम मध्ये घुसली नवऱ्याने तिला जातो अशी आरोळी दिली .तिने आतूनच ओ म्हटले .
काही वेळाने ती ऑफिसच्या ड्रेस मध्ये बाहेर आली . ब्लॅक पॅन्ट..,व्हाईट शर्ट ..वर ब्लॅक ब्लेझरमुळे तिचे रूप पूर्ण पालटून गेले होते . बिल्डिंगच्या गेटवर उभी राहिली पण तिची कार अजून आली नव्हती .पाच मिनिटाने तिची कार आली  आणि दरवाजा उघडताच शोफरवर ती डाफरली .. इतका उशीर कसा ....?? पाच मिनिटे उभी आहे मी इथे ..."कारमध्ये बसताच एअर फ्रेशनरने तिचे तोंड वाकडे झाले ."खबरदार यापुढे हा एअर फ्रेशनर गाडीत मारलास तर ....."
काही मिनिटाने तिने आपल्या ऑफिसमध्ये झोकात प्रवेश केला . त्या कंपनीची ती व्हाईस प्रेसिडन्ट होती . आल्या आल्या तिच्या मिटिंग चालू झाल्या . व्हिडीओ कॉल ,कॉन्फरन्स यात ती पूर्ण बुडून गेली . काही करोडोचे डिल तिने फायनल केले .
संध्याकाळी थकून ती घरी निघाली . बिल्डिंग जवळ येताच तिने गाडी सोडून दिली .गेटमधून आत शिरताना  तिला फोन आला . "अग..येताना एक किलो कांदे आणि कोथिंबीर घेऊन ये ... आणि सकाळच्या नाश्त्याला अंडी .. तुझ्या पोरीने कांदा भजीची फर्माईश केलीय आणि बाप बनवून देणार आहे . उद्या नाश्त्याला ऑम्लेट हवेय .  घेऊन ये ... फोनवरूनच सासूबाईनी ऑर्डर सोडली .
अरे बापरे ...!! उद्याचे राहिलेच .तिने होय म्हटले आणि आल्या पावली परत बाजाराच्या दिशेने निघाली .
ती कुठे काय करते ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment