Thursday, June 10, 2021

किमयागार..... अच्युत गोडबोले

किमयागार..... अच्युत गोडबोले 
राजहंस प्रकाशन 
विज्ञान म्हटले की फक्त शालांत आणि महाविद्यालयीन परीक्षेत जास्तीतजास्त मार्क मिळविण्यासाठी उपयोग हेच ध्येय असते.आपण विज्ञान जगत नाही तर फक्त शिकतोअसे लेखक म्हणतो.
डॉक्टर ..,इंजिनियर ..,बनण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा हीच बऱ्याचजणांची वृत्ती असते. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र ,जीवशास्त्र अश्या विज्ञानाच्या तीन शाखा . यात भौतिकशास्त्र सगळ्यात श्रेष्ठ पण बर्याचजणाना याचाच कंटाळा येतो . अंतराळ.. पृथ्वी.. तारे ..नक्षत्र यांचा अभ्यास करण्यासाठी खूपच सहनशक्ती चिकाटी लागते .
लेखकाने या पुस्तकात अश्या शास्त्रज्ञांची माहिती दिली  आहे ज्यांनी या विश्वात बरेच बदल घडवून आणले आहेत ,बरेच शोध लावले आहेत.आपल्याला ह्या शास्त्रज्ञांनी काय शोध लावले आहेत याची माहिती आहे . पण ते कसे होते ,त्यांचा स्वभाव त्यांचे राहणीमान... त्यांच्या आयुष्यातील चढउतार याबद्दल फार काही माहीत नसते . ती माहिती यातून आपल्याला मिळते .
इसवी सन पूर्व पासून विज्ञानाचा वापर चालू आहे .थोर खगोलशास्त्रज्ञ आर्यभट याने पृथ्वीचा परीघ मोजला होता तर एका वर्षात 365 दिवस 6 तास 12 मिन आणि 30 सेकंद असतात हेही काढलं होत.
पृथ्वी कशी निर्माण झाली...?? मानवाची निर्मिती कशी झाली..?? जीव कसे निर्माण झाले .?? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे हजारो वर्षांपासून शास्त्रज्ञ शोधतायत .प्रत्येकवेळी नवीन नवीन अनुमान काढले जातात .
अँरिस्टोटल हा ग्रीक तत्वज्ञ ख्रिस्तपूर्व 384 साली जन्मला .त्याने पृथ्वी आणि सजीव यांच्याबाबत अनेक सिद्धांत मांडले पण कालांतराने बरेचसे चुकीचे ठरविले गेले .
दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ हा नेहमीच बायबल आणि चर्चच्या विरुद्ध होता. त्यासाठी त्याने तुरुंगवास ही भोगला .चर्चची मते किती चुकीची आहेत हे गॅलिलिओने प्रयोगाद्वारे सिद्ध केले . 
गतीचे नियम मांडणाऱ्या आयझॅक न्यूटनने विज्ञानाचे स्वरूपच पालटून टाकले. गुरुत्वाकर्षण हा न्यूटनचा जगप्रसिद्ध शोध .
इलेट्रोमॅग्नेटिझम शोधणारा मॅक्सवेल. तर केवळ खिशातील फाउंटन पेन हीच माझी प्रयोगशाळा असे म्हणणारा आईन्स्टाईन यांच्याविषयी सर्व काही जाणून घेण्यात गंमत वाटते .
क्ष किरण शोधणारा रंटजेन..रेडिएशन शोधणारी मेरी क्युरी ,इलेक्ट्रॉन शोधणारा जे.जे.थॉम्पसन..अणू-रेणू वर संशोधन करणारा रदरफोर्ड तर क्वांटम मेकानिझमची सुरवात करणारा प्लॅक याची मेहनत चिकाटी सहनशीलता पाहून आपण थक्क होतो.
खरेच यांनी खिश्यात पैसे नसताना,जन विरोधात जाऊन वर्षानुवर्षे प्रयोग करून नवनवीन कल्पना सत्यात आणून त्याचा मानवी जीवनाला कसा उपयोग होईल याचाच विचार केला .
लेखकांनी यात जवळजवळ सर्वच प्रसिद्ध शास्त्रज्ञांची माहिती दिलीय . त्यात त्यांचे खाजगी जीवन कसे होते... त्यांची शिकविण्याची पद्धत.. सर्व काही मनोरंजक पद्धतीने लिहिले आहे . त्यामुळे वैज्ञानिक क्लिष्ट शब्द असूनही आपल्याला कंटाळा येत नाही .
पुस्तकाच्या शेवटी आपल्याला यात  भारतीय शास्त्रज्ञ नाहीत हे लक्षात येते .पण त्याचे स्पष्टीकरणही  ही लेखक करतो .
न कंटाळता विज्ञानाची बेसिक माहिती हवी असेल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरात हवे .

No comments:

Post a Comment