Friday, June 25, 2021

चाणक्य .....भा.द. खेर

चाणक्य .....भा.द. खेर
मेहता पब्लिशिंग हाऊस
 विष्णू मगध राज्यात आचार्य असणाऱ्या कपिलदेव यांचा मुलगा. लहानपणापासूनच हुशार..कुशाग्र बुद्धीचा .
मगधचा राजा धनानंद नंद वंशाचा आहे. अतिशय जुलमी , ऐशआरामात राहणारा .राज्यात विविध कर लावून त्याने नागरिकांना त्रस्त केले आहे.
शकदाल हा राज्याचा महामंत्री कपिलदेवाचा मित्र . शकदाल नेहमीच राज्याच्या भल्याचा आणि विकासाचा विचार करतो. तो राज्याशी एकनिष्ठ आहे.पण एका अवैध संपत्ती घोटाळ्यात तो राजाविरुद्ध उभा राहतो.धनानंद त्याला तुरुंगात टाकतो त्यानंतर कपिलदेवावर ही तीच पाळी येते.कपिलदेव तुरुंगात जातात आणि विष्णूची आई प्राण सोडते .राज्यात विष्णूला वाळीत टाकण्याची आज्ञा होते . 
विष्णू तक्षशिला विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्याचे ठरवितो .तिथे तो वैद्यकशास्त्र आणि राजनीतीशास्त्रात पारंगत होतो .तक्षशिला विद्यापीठात प्रवेश घेताना तो आपले नाव चाणक्य आहे असे सांगतो.चाणक्यची कीर्ती एक हुशार आचार्य म्हणून सगळीकडे पसरली जाते तेव्हा राजा धनानंद आपल्याकडे दानाध्यक्ष म्हणून आमंत्रित करतो आणि चाणक्य पुन्हा मगध राज्यात परततो.
ग्रीक राजा सिकंदर जगज्जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून भारताच्या सीमेवर उभा ठाकलाय. चाणक्यच्या मते ही चिंतेची गोष्ट आहे. त्याला संपूर्ण भारत एकसंघ करायचा आहे. हेच त्यांचे स्वप्न आहे. तो धनानंद राजाला भरसभेत सिकंदरच्या आक्रमणाची कल्पना देतो पण धनानंद त्याचा अपमान करतो . तुला  सिंहासनावरून  पायउतार केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करून चाणक्य दरबारातून बाहेर पडतो .
पुढचा इतिहास सर्वांना माहीतच आहे .पुस्तक अतिशय साधे सरळ आहे . सर्वसामान्य वाचकांच्या लक्षात येईल अशातऱ्हेने पुस्तकाची मांडणी केली आहे .
चाणक्य हे कुशल राजनीतीतज्ञ म्हणून ओळखले जातात. राजकारण कसे करावे ...?? राज्य कसे चालवावे ...?? हे चाणक्यनीतीत लिहिले आहे .पण यात कुठेही चाणक्यचे राजकारण दिसून येत नाही .पण चाणक्यचा इतिहास समजण्यासाठी हे पुस्तक पुरेसे आहे .

No comments:

Post a Comment