Sunday, June 27, 2021

सर्व्हिस

सर्व्हिस 
केके उर्फ कमलाकर कदम मला त्या हॉस्पिटलच्या गेटजवळ दिसला तेव्हा मुळीच आश्चर्य वाटले नाही.तो कुठेही संचार करू शकतो . प्रत्येक ठिकाणी त्याची माणसे हजर असतात.तो तुम्हाला कोणतीही सेवा देऊ शकतो. त्यासाठी तुमच्या खिश्यात कमीतकमी एक रुपया तरी हवा. हो... कोणतेही काम फुकट करायचे नाही हा त्याचा नियम.
मी त्या दिवशी एक औषध आणायला हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये गेलो. तिथे हा समोर आला.
" भाऊ ...आज इथे ...?? कोणाला भेटायला आलास ...." ?? मी त्याला औषध दाखविले.
"आयला ...!! ह्यासाठी तू इथे. अरे.. फोन करायचा. घरी आणून दिले असते .. "तो ओरडला.
मी मुकाटपणे हात जोडले आणि खांद्यावर हात टाकून समोरच्या हॉटेलात शिरलो.
" सध्या काय चालू तुझे ..."?? मी त्याला नेहमीचा प्रश्न विचारला.अर्थात त्याची कामे जगावेगळी असतात म्हणून मला उत्सुकता .
" नेहमीचेच रे ...पण सध्या एक ब्युरो चालू केले आहे .मेम्बर कमी आहेत... पण आहेत ती पैसेवाले आहेत.."
"म्हणजे.... तू आता लग्न वगैरे जुळवतोस का दुसऱ्यांची ....." मी डोळे मिचकावत विचारले.
" नाही रे ... त्या भानगडीत कोण पडेल .उगाच नंतर दोघांचे बिनसले तर मध्यस्थी करणाऱ्याला शिव्या..तो हसत म्हणाला." पण असेच काही समज. मी जोड्या जुळवतो पण बीन लग्नाच्या ".
" म्हणजे ..."?? मी आश्चर्यचकित 
" हे बघ भाऊ .. हल्ली बरेचजण लग्न न करता एकत्र राहतात. त्यांना फक्त एकमेकांची कंपनी हवी असते. गप्पा..एकत्र फिरणे...पिकनिक आणि शारीरिक सुख यासाठीच एकत्र असतात .एकमेकांवर हक्क गाजवायचा नाही. भावविन गुंतणे नाही.तसेच एकमेकांवर जास्त खर्चही करायचा नाही .पुन्हा जॉब बदलला.दुसरीकडे पोस्टिंग झाली की सगळे सोडून नवीन ठिकाणी नवीन आयुष्य सुरू करायचे हा फंडा जोरात चालू आहे .मी अश्या जोड्या जुळवतो...."केके चहाचा घोट म्हणाला.
" ए बाबा ..नीट सांग समजावून ..." मी पुन्हा हात जोडत म्हटले .
"थांब.... मी तुला उदाहरण देतो. समजा एक मुलगा आणि  एक मुलगी आहे. त्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही .दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरीत आहेत. स्वतंत्र वृत्तीचे आहे .त्यानी माझ्याकडे नावे नोंदवली आणि त्यांना पार्टनर हवे आहेत .मग मी त्यांना एकत्र आणतो . त्यांनी एकमेकांसोबत राहायचे ठरविले की मी कायदेशीर ऍग्रिमेंट करतो .दोघांकडून दर महिना ठराविक रक्कम घेतो . त्यांना सर्व प्रकारची सर्व्हिस देतो .अगदी जेवणापासून...बिल भरणे...लौंड्रि ...मेडिकल ...जे ते म्हणतील ते .... आपले मीटर चालू...आपली पोर आहेतच यासाठी " तो हसत म्हणाला .
"मग त्यांची भांडणे ही सोडवत असशील तू .त्याचाही चार्ज घेतोस ना ... " मी छद्मीपणे विचारले.
"भाऊ .... त्यांची भांडणेच होत नाहीत.एकमेकांवर हक्कच नाही ना....स्वतःचीच जबाबदारी घेतात. म्हणजे बघ... सकाळी एकमेकांना गुड मॉर्निंग करून बाहेर पडतात ते रात्रीच घरी येतात. इतका उशीर का ...??कोणाबरोबर होतास..?? जेवलास का.. ??? आता जेवणार का... ?? मी भेंड्याची भाजी केलीय गरम करून घे .... हे असले प्रश्नच नसतात .उलट दोघे छान गप्पा मारतात .आपल्या कामाची चर्चा करतात .कधी कधी बाहेर जाऊन जेवतात . आपापले बिल भरतात आणि येऊन झोपतात .."
"एकत्र ...."?? माझे कुतूहल
"असतील ही नसतील ही ...इतकं खोलवर मी विचारत नाही ...." केके सिगारेट शिलगावत म्हणाला .
"पण त्यातील कोण आजारी पडले तर ....?? काही अपघात झाला तर ....." मी अजून एक प्रश्न मारला.
"त्यासाठीच हा केके आहे ....तो मान ताठ करीत म्हणाला . ऍग्रिमेंट करतानाच मी दोघांच्या मेडिक्लेम पॉलिसी नंबर माझ्याकडे मागून घेतो. दोघांचीही फिटनेस सर्टिफिकेट एकमेकांना देतो .त्यात दोघांपैकी कोणाला काही झाले की मी त्यांची काळजी घेतो .अरे आताच बघ ना....मी एकाला ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आलोय. सकाळी त्याच्या पार्टनरचा फोन आला हा बाथरूममध्ये पडलाय .तिला अर्जंट मिटिंग होती .तिने मला फोन केला . मी येईपर्यंत त्याच्यासोबत होती . मी दहा मिनिटात तिथे पोचलो त्याला उचलले आणि इथे ऍडमिट केले.आता बरा होईपर्यंत मीच काळजी घेणार त्याची आणि नंतर माझा सर्व्हिस चार्ज लावणार ....." केके टाळी देत म्हणाला .
" पण केके... खरच असे असते....?? .इतकी भावनाशून्य माणसे आहेत या जगात ..".मी थोडया विषादाने विचारले.
"आहेत रे भाऊ ...हल्ली जगात चांगली माणसे कमी आणि वाईट स्वार्थी माणसे जास्त झालीत.सगळेच चांगले असते तर हे अनाथाश्रम.. वृद्धाश्रम असते का ..?? घटस्फोट झाले असते का ...?? हल्ली कोणाला दुसऱ्याची जबाबदारी घ्यायची इच्छा नाही . भरमसाठ पैसे असले की सर्व काही मिळते असेच वाटते त्यांना .मुख्य म्हणजे सर्वप्रकारची सेवा देणारे आमच्यासारखे आहेत . हातातील फोनमधील एका अँपवर जे हवे ते मिळते .मग दुसऱ्याचे लोढणे का अंगावर घ्यावे ...?? मान्य आहे हे आपल्यासारख्या जुन्या लोकांना पटत नाही. पण जो बदल आहे त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे .... यांच्यामुळेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या मुलांचे पोट भरतोय मी.. "केके माझ्या खांद्यावर थाप मारीत म्हणाला .
" पण यातून काही वाईट घडले तर ...."?? मी पेचात टाकणारा प्रश्न विचारला .
"काय वाईट घडणार ... ?? शारीरिक संबंध..??? शारीरिक इजा...?? मारहाण...?? अपघात...?? आर्थिक व्यवहार ..?? अरे हे सर्व आधीच त्या ऍग्रिमेंटमध्ये क्लिअर केलेले असते .त्यांना कुठे थांबायचे ते कळतेच आणि अजूनपर्यंत तरी मला विचित्र अनुभव आला नाही.उलट वेगळे होतानाही फार त्रास होतो असे कधीच दिसले नाही मला . कोणालाही असले रिलेशन संपवायचे असेल ते एका फोनवर संपवू शकतात .चोवीस तासात कधीही ....."
"यात तूझा रोल काय..."?? मी विचारले.
" भाऊ ....मी ते सांगतील ती कामे करतो .अगदी लाईट बिल भरण्यापासून ते किराणा आणून देण्यापर्यंत .आपली पोर यात एक्सपर्ट आहेत. प्रत्येक सर्व्हिसवर भरमसाठ चार्ज लावतो..." असे म्हणून जोरात हसला .
"धन्य आहेस तू केके..." असे म्हणून मी पुन्हा हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment