Sunday, August 29, 2021

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी
अनुवाद....आरती देशपांडे
एका प्रकाशन 
गेल्या वर्षभरात जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्या होत होत्या. त्यात ब्रिटिश परराष्ट्र सचिव ,जर्मन चॅन्सलर, अमेरिकेचे अटर्नि जनरल,जपानचे पंतप्रधान यांचा समावेश होता .त्या चारही घटनांमध्ये मारेकऱ्यांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा भेदली नव्हती. त्यांच्या अंगावर कोणतीही जखमेची खूण नव्हती. त्यांच्या पोटात ही काही सापडले नव्हते . पण त्यांचा मृत्यू एकाच पद्धतीने झाला होता.अंगाला खाज सुटणे,चेहरा सुजणे . घाम येणे.शेवटी सापाच्या विषाने मृत्यू.त्यांच्यात दुसरा एक समान दुवा होता ..ते उदारमतवादी होते. मुस्लिम समुदायाविषयी त्यांच्या मनात सॉफ्टकॉर्नर होता.
माईलेशियन लॅबने विजय सुंदरमला नोकरीची ऑफर दिली. विजयने दिल्ली आयआयटी मधून पीएचडी केली होती. माईलेशियन लॅब ही  प्युयर सायन्स क्षेत्रात गुप्त संशोधन करणारी कंपनी होती. तिचा प्रमुख प्रकल्प उत्तराखंड मध्ये आहे.हजार एकरच्या प्रकल्पात पन्नास एकरवर  इमारत आणि प्रयोगशाळा होती तर बाकीचे घनदाट जंगल होते.विजयने क्वांटम थियरीवर पीएचडी केली होती. त्याच्या संशोधनाचा फायदा लॅबला होणार होता.माईलेशियन लॅब अतिशय गुप्तता पाळणारी कंपनी आहे. तिथे केवळ दहा संशोधक आणि पंचवीस कर्मचारी काम करतात..तिथे काम करणारी व्यक्ती बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकत नाही .तिथे अतिशय अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असून प्रत्येकावर पाळत ठेवली जाते.
आयजी 4 ही चीन रशिया भारत अमेरिका या देशातील गुप्तचर प्रमुखांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संस्था आहे .यात फक्त चारच देशाचे प्रमुख गुप्तहेर अधिकारी आहेत. जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्येमागे माईलेशियन लॅबचा हात आहे असा त्यांना संशय आहे.त्यानी विजयला माईलेशियन लॅबमध्ये नोकरी स्वीकारण्यास भाग पाडले .
अबू अहमद अल-मफराकी हा कट्टर मुस्लिमवादाचा पुरस्कर्ता. त्यानेच जगातील प्रमुख देशात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत . अमेरिकेने त्याच्यावर पाच कोटी डॉलरचे बक्षीस लावले आहे .
आता विजयला त्या अभेद्य सुरक्षा यंत्रणेचा भेद करून खरा प्रकार समजून घ्यायचा आहे . असे कोणते संशोधन करतात ज्याचा संबंध प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्येशी आहे...??  कोणते देश आणि कोण व्यक्ती यात सामील आहेत...?? जगातील काही देशात अचानक भूकंप का होतात...?? हवामानात कोणतेही बदल नसताना रस्ते का खचतात.…?? बुद्धांनी कलचक्राचे कोणते रहस्य सांगितले आहे ..?? आणि आता ते रहस्य कोण वापरते आहे ...?? स्वामी ब्रम्हांनंद कोण आहेत...?? त्यांचे खरे वय किती आहे ..?? अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध ते कसे जोडतात ....?? या प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास हे पुस्तक वाचायलाच हवे.
अश्विन सांघी पौराणिक घटना ,इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सुंदर मिलाफ आपल्याला रंजकपणे समजावतात. हिंदू ,मुस्लिम,बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचंड अभ्यास केलाय हे  लिखाणात दिसून येतो. त्याचसोबत त्यांनी या सर्वांना विज्ञानाची जोड दिली आहे .

No comments:

Post a Comment