Friday, August 13, 2021

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी
अनुवाद…..संकेत दि. लाड
वेस्टलँड पब्लिकेशन लिमिटेड 
श्रीनगर ,काश्मीर 2012
जुन्या श्रीनगर मधील कान्यार जिल्ह्यात असलेल्या रोझाबल कबरीमध्ये युझ असफ नावाच्या इसमाचे शव असल्याची माहिती त्या माहिती फलकावर होती. स्थानिक कागदपत्रात ही कबर इसवी सन ११२ पासून असल्याचे दाखले होते. रोझाबलचा अर्थ प्रेषितांची कबर असा होतो. ज्यू प्रथेनुसार युझ असफची शवपेटी पूर्व पश्चिम अक्षांवर ठेवलेली होती.शवपेटीजवळच असफच्या पावलांचे ठसे होते.त्यावर काही खुणा होत्या.क्रुसावर चढविताना ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांच्या त्या खुणा असाव्यात.असे वाटते की असफला क्रुसावर चढवून ठार मारले होते.संपूर्ण आशियात अशी पद्धत कधीच वापरली गेली नव्हती.कदाचित असफला दूरच्या देशातून इथे आणले असावे.
मक्का सौदी अरेबिया 2012
गालिबने दुसऱ्यांदा मक्केला आला होता. दोन्ही वेळा त्याने सर्व विधी पूर्ण केले होते. लष्कर- ए-तोयबा अर्थात पवित्रांचे सैन्य नावाची संघटना काश्मीरमध्ये जिहाद लढत होती.जगभरातील गुप्तचर संघटना यावर लक्ष ठेवून होत्या .पण त्यांना माहीत नसलेली एक गोष्ट लष्करकडे होती.त्यांनी एक अंतर्गत अतिविशिष्ट गट निर्माण केला होता .लष्कर-ए-तलतशार नावाचा हा गट म्हणजे फक्त तेरा जणांचे सैन्य होते. गालिब या गटाचा नेता होता.
येशू ख्रिस्ताचेही बारा अनुयायी होते आणि येशू त्यांचा नेता होता.
लंडन 2012
लंडन विद्यापीठाच्या ग्रंथालयात बार्बरा पॉलसन भगवतगीता  ग्रंथ शोधत होती.प्राध्यापक टेरी ऍक्टन याना तो हवा होता.नेहमीच्या जागेवर त्या पुस्तकाच्या जागी एक खोके ठेवले होते. आश्चर्यचकित होऊन तिने ते खोके उघडले तेव्हा त्यात प्राध्यापक टेरी ऍक्टनचे शीर होते .
वझिरीस्थान अफगाणिस्थान 2012
त्या डोंगराळ प्रदेशातील एका गुहेत सुंदर गालिच्यावर तो बसला होता. सफेद पगडी,पांढरी लांब दाढी,लष्करी जॅकेट आणि चालताना आधारासाठी वेताची  छडी असा त्याचा अवतार . त्याचे बोलणे सौम्य होते. वर्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी त्याच्या संघटनेने स्वीकारली होती. आता त्याही पेक्षा भयानक योजना त्याच्या डोक्यात आकार घेत होती. ती योजना अविश्वसनीय आणि भयंकर होती. त्या व्यक्तीचे नाव होते ओसामा बीन लादेन .
व्हॅटिकन सिटीतील अल्बर्टो कार्डिनल व्हॅलेरिओ यांच्या सुचनेनुसार ओडिपस ट्रस्ट मधून  इझाबेल मडोना ट्रस्टमध्ये एक कोटी डॉलर ट्रान्सफर केले गेले. इझाबेल ट्रस्टचा प्रमुख लाभधारक होता ओसामा बीन लादेन
2012 तील प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला जगातील वेगवेगळ्या शहरात भयानक दहशदवादी हल्ले झाले . हे हल्ले जैविक ,रासायनिक, स्वरूपाचे होते . याहून ही मोठा हल्ला 21 डिसेंबर ला होणार होता . त्यासाठी लागणारा अणुबॉम्ब गालिबच्या नेतृवाखाली प्रवास विविध देशांच्या सीमा ओलांडून प्रवास करत होता .
लेखकाने या पुस्तकात अनेक पात्रे निर्माण केली आहे. हे पुस्तक आपल्याला विविध देशात आणि विविध काळात घेऊन जाते . येशूच्या क्रुसावर चढविण्याच्या प्रसंगाचे वर्णन करते. इसवीसन 12 ते 2012 या कालखंडात ही कादंबरी फिरते.येशू पुनर्जन्मानंतर भारतात आला आणि त्याची वंशावळी आजही अस्तित्वात आहे याचा शोध काहीजण घेत आहेत.
सुरवातीपासूनच कादंबरी वेगवेगळ्या प्रसंगात विखुरली जाते मग ती हळू हळू एका तुकड्यात एकत्र होत जाते. शेवट च्या काही पानांमध्ये कादंबरीची कथा स्पष्ट होते सर्व शंकांचे निरसन होते . पण तो पर्यंत आपण श्वास रोखून ,उत्कंठा मनात ठेवून वाचत जातो.

No comments:

Post a Comment