Saturday, February 12, 2022

एक हग डे

एक हग डे
घरात शिरताच मुलाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून त्याने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले . बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर पडला तेव्हा बायकोने चहा चपाती पुढ्यात आणून ठेवली होती.
 " काल रात्रीची आहे .."बायको म्हणाली. त्याने काही न बोलता मान डोलावली.अन्न वाया घालवू नये ही त्याचीच शिकवण होती. मुलाने टाकलेले अन्न तो आणि बायको पहिल्या पासूनच खात होते. 
"बाबा ...कॉलेजची आणि क्लासची फी भरायची आहे. पैसे हवे आहेत.."मुलाने लांबूनच सांगितले .त्याने मान डोलावली."उद्या आई कडून घे .."त्याने उत्तर दिले.
"बापाशी बोलतोयस तू ....जरा जवळ येऊन बोललास तर काटे लागणार नाहीत ..."आई चिडून म्हणाली.याने फक्त हात वर करून तिला थांबविले.
"कशाला अडवता तुम्ही मला.मोठा झाला  म्हणून पंख नाही फुटले त्याला.नशीब अजून शिकतोय. नोकरीला नाहीस....नाहीतर बापाला बाहेरच काढले असतेस .."तिचा पट्टा चालू झाले .
"जाऊ दे ग ...लहान आहे अजून . खूप काही शिकायचे त्याला ..."त्याने बायकोला चूप केले.
रात्री जेवण झाल्यावर अंथरुणावर पडला तेव्हा सर्व आवरून बायको जवळ आली .
"या वर्षी व्हॅलेंटाईन डे ला काय देणार मला ..."?? त्याच्या कुशीत शिरत तिने विचारले .
"अरे हो ..आपला व्हॅलेंटाईन विक सुरू आहे ना ..?? दरवर्षी प्रमाणे मोठा परफ्युम देतो .त्या निमित्ताने माझ्या अंगाचा वास तरी कमी येईल .."तो हसत म्हणाला .
"काहीतरी बोलू नका हो.तुमच्या वासाचे काहीच वाटत नाही मला .पण मुलाची चिंता वाटते .."ती म्हणाली.
"हम्मम .."तो पुटपुटला .
समजायला लागल्यापासून मुलगा याच्यापासून लांब पळत होता.सुरवातीला कारण कळले नाही पण नंतर आपल्या अंगाचा वास त्याला आवडत नाही हे कळले .काही दिवसांनी सवय होईल असा विचार करून तो शांत राहिला .अर्थात मुळातच  तो शांतच होता. 
मुलगा हळू हळू मोठा होत गेला तसं तसा त्याच्यापासून दूरच होत गेला .ह्यालाही त्याच्या अंगाला येणाऱ्या वासाची कारणे द्यायची गरज भासली नाही कधी.
सकाळ झाली तो लवकरच घराबाहेर पडला.मुलगा शांतपणे झोपला होता .आईच्या धपाट्याने त्याला जाग आली तेव्हा दहा वाजले होते. त्रासिक चेहऱ्याने त्याने मोबाईल हाती घेतला तेव्हा गुड मार्निंग आणि हगडे च्या मेसेजनी व्हाट्स अप भरून गेला होता . कोणी मैत्रिणीला तर कोणी आई वडिलांना तर काहीजणांनी कुत्र्याला मिठीत घेऊन फोटो काढले होते .याने ही स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईला मिठी मारली . हॅपी हग डे आई असे म्हणून दोनचार सेल्फी काढून स्टेटस अपडेट केले आणि बाथरूममध्ये घुसला .
सर्व तयारी करून नाश्त्याला बसणार इतक्यात मित्राचा फोन आला . हायवेवर  त्याचा कारचा अपघात होऊन तो जखमी झाला होता आणि त्याचे वडील जागीच गेले होते .तो तडक अपघात स्थळी गेला. 
संध्याकाळी मित्राच्या वडिलांची अंत्ययात्रा निघाली.मुलाची अंत्ययात्रेत सामील व्हायची पहिलीच वेळ.थोड्याश्या घाबरलेल्या अवस्थेत त्याने  स्मशानात प्रवेश केला आणि त्या वासाने तो हादरला .हा गंध त्याच्या परिचयाचा होता ,हाच गंध वडिलांच्या तिरस्काराला कारणीभूत ठरला होता .हाच गंध लहानपणापासून वडिलांच्या शरीराला अनुभवत होता. त्याची नजर आता काहीतरी शोधू लागली आणि अपेक्षित असे त्याला ते दिसले .
मित्राच्या वडिलांच्या शवावर त्याचे वडील लाकडे ठेवत होते.अतिशय शांतपणे मन लावून ते चिता रचत होते.चितेची राख त्यांच्या शरीरावर चिकटलेली होती.त्यांना पाहून मित्राने एकदम त्यांना मिठी मारली आणि मोठ्याने टाहो फोडला.तो ही अश्रू पुसत त्यांच्या जवळ गेला आणि कुशीत शिरला . आज खरोखरच हग डे साजरा झाला .

© श्री.किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment