Thursday, February 10, 2022

तंट्या ....बाबा भांड

तंट्या..... बाबा भांड 
साकेत प्रकाशन 
खांडव्यावरून इंदूरला जाताना जिथे मुखत्यारा बलवाडा घाटाची चढण सुरू होते त्या ठिकाणी प्रत्येक ट्रेन अचानक थांबते आणि हॉर्न वाजवून तंट्याला सलामी देते.तसे नाही केले तर पुढे अपघात होईल अशी दंतकथा आहे .तिथे तंट्याचा आत्मा अजूनही फिरतो आहे अशी समजूत आहे. कोण आहे हा तंट्या ...?? काय केले होते त्याने ...???
विंध्य सातपुडाच्यामध्ये निमाड भागात भिल्लांची वस्ती .हा काळ साधारण 1857 च्या उठवाच्या काळात .पाटील आणि मालगुजरांच्या ताब्यात या भिल्लांच्या जमीनी. एका कागदावर जमिनीच्या मालकांचा अंगठा घेऊन त्या जमिनी कायमच्या ताब्यात घेणे हे सर्रास चालत होते. तंट्याच्या वडिलांची एक जमीन अशीच पाटलाच्या ताब्यात गेली.तिच्याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या तंट्याला जेलमध्ये जावे लागले .तंट्याचे मूळ नाव तात्या पण जेलरला ते उच्चारता येत नव्हते म्हणून तंट्या झाले आणि पुढे त्याच नावाचा दरारा विध्य सातपुडा खांडवा येथे पसरला .
तंट्याने गरिबांना कधीच त्रास दिला नाही . त्याने पाटील मालगुजराना लुटले .तो पैसा गरिबांना वाटला. एकाच वेळी तो अनेक ठिकाणी दरोडे घालीत असे त्यामुळे इंग्रजांना त्याचा नक्की ठावठिकाणा कळत नसे .
भिल्ल मूळचे जंगलाचे राजे .जंगल त्यांच्या पायाखालचे होते.इंग्रजांना सहज चकमा देऊन तंट्या आणि त्याचे साथीदार पसार होत. जंगलात फिरणाऱ्या पोलिसांचे तो कपडे काढून नाकाचा शेंडा कापीत असे.
दुष्काळात त्याने धान्याची गोदामे ,मालगाडी लुटून सर्व धान्य गरीबात वाटले .तंट्या गरिबांसाठी रॉबिन हूडचा अवतार होता. त्याच्या पकडण्यासाठी दोनशे रुपयांपासून सुरू झालेली बक्षीसाची रक्कम पुढे पंचवीस हजारांपर्यंत गेली. दहावर्षे तो इंग्रजांविरुद्ध लढत होता .फितुरी दगा करून तंट्याला पकडणे हा एकच पर्याय इंग्रजांपुढे होता आणि शेवटी त्यात इंग्रज यशस्वी झाले .
तंट्याची ही अज्ञात कहाणी आज बाबा भांड या लेखकाने अतिशय अभ्यास आणि संशोधन करून आपल्यासमोर मांडली आहे .

No comments:

Post a Comment