Tuesday, May 21, 2024

जन गण मन

जन गण मन
Jana Gana Mana
कॉलेजची लाडकी  तरुण प्रोफेसर  साबा मरियमचे जळलेले प्रेत सुनसान रस्त्यावर आढळले आणि सगळे कॉलेज हादरले.पोलिस आणि मीडियाने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झालाय असेही जाहीर केले. संपूर्ण कॉलेज त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गांधी चौकात जमले पण तिथेही पोलिसांनी निर्दयपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला.आता तर देशच पेटला .राज्य सरकारने  एसीपी सज्जनकुमार सारखा हुशार अधिकारी या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी नियुक्त केला .
सज्जनकुमारने तीस दिवसात आरोपींना कोर्टात हजर केले जाईल असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आणि दिवसरात्र मेहनत करून त्याने चार आरोपींना पकडले .
पण राजकीय हस्तक्षेपामुळे ऐनवेळी त्याच्याकडून केस काढून घेण्यात आली . आरोपींनाही दुसऱ्या कस्टडीत हलवा असा आदेश दिला गेला.सज्जनकुमारला वेगळीच शंका आली आणि त्यातच आरोपींना पकडले गेले ही बातमी मीडियात लिक झाली.
सज्जनकुमार स्वतः आरोपींना दुसऱ्या कस्टडीत घेऊन जायला निघाला आणि मध्येच त्यांचे एन्काऊंटर केले. आरोपींचे एन्काऊंटर झालेले ऐकून संपूर्ण राज्य खुश झाले.एसीपी सज्जनकुमारच्या मागे राज्यातील स्त्री वर्ग आणि समाज उभा राहिला .संपूर्ण पोलीस दल ही सज्जनकुमारच्या पाठीशी होता. पण केंद्रीय मानवअधिकारकडून कोर्टात  नकली एन्काऊंटरची केस उभी राहिली आणि सज्जनकुमारला आरोपी म्हणून उभे केले गेले.पण....
 तिथेच चित्रपटाचा मध्यंतर झाला .
मध्यंतरानंतर  कोर्टात आरोपी सज्जनकुमार विरुद्ध खटला सुरू झाला.एक अनोळखी, एका पायाने लंगडत चालणारा अरविंद स्वामी  नावाचा वकील सज्जनकुमार विरुद्ध खटला लढतोय.
पण हे इतके सरळ साधेसोपे नाही .खरा चित्रपट तर मध्यंतरानंतर सुरू होतो .आपल्याला अनपेक्षित धक्क्यावर धक्के मिळत जातात आणि हे धक्के चित्रपटाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आहेत.
एक श्वास रोखून ठेवणारा हा चित्रपट मल्याळम भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पण हिंदी सबटायटल्समुळे आपल्याला समजण्यात कोणतीही अडचण येत नाही.एका बैठकीत पाहता येईल असा हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment