Thursday, April 25, 2019

फरक

फरक
स्थळ... दुर्गम भागातील एक छोटे खेडे
ठिकाण ... गावाचा पार
वेळ... सकाळी 10
आज गावातील एक तरुण डॉक्टर बनून आला आहे . ग्रामस्थांनी त्याच्या सत्कार करायचे ठरविले आहे . आता तो त्याचे मनोगत व्यक्त करतोय
"सर्वप्रथम गावकऱ्यांचे आभार . त्यांनी वेळात वेळ काढून.घरातील ...शेतातील ..कामे सोडून माझे कौतुक करायला इथे हजर राहिले . पण खरे तर हे तुमच्यामुळेच शक्य झाले आहे .आज मी डॉक्टर बनून इथे आलोय त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. आपल्या वेदना ..आजार.. विसरून तुम्हाला फक्त पोटासाठी कष्ट करणेच माहिती आहे . मुलगा झाला की काही वर्षांनी शेताला मजूर लाभला म्हणून आनंद व्यक्त करायचा आणि मुलगी झाली तर केव्हा एकदा वयात येतेय आणि तिचे लग्न करून परघरी पाठवतोय असे व्हायचे तुम्हाला .गावात बरीच वर्षे वीज फक्त नावालाच आहे .धड सरळ रस्ता नाही ...सरकारी वाहन  दिवसातून स्वतःच्या वेळेप्रमाणे कधीतरी येणार .डॉक्टर हा प्रकार आम्हाला माहितीच नव्हता . मी दहा वर्षाचा असताना माझी चार वर्षाची बहीण वारली. ती का वारली....???कशी वारली ....??हे माहीत नव्हते . सकाळी उठलो तेव्हा आई तिला मांडीवर घेऊन रडत होती .काही दिवसांनी मला म्हणाली तिला डॉक्टरकडे नेले असते तर वाचली असती. कालपर्यंत माझ्या बरोबर  खेळणारा माझ्या वयाचा मित्र सकाळी खेळायला आलाच नाही तेव्हा कळले रात्री ताप येऊन तो देवाघरी गेला ..डॉक्टर असते तर वाचला असता म्हणजे आज डॉक्टर असते तर हे सर्व वाचले असते. मग आपण का डॉक्टर होऊ नये . असा विचार करून मी अभ्यासाला सुरवात केली . ज्या ज्या वेळी नाउमेद व्हायचो त्यावेळी तो मित्र आणि बहीण आठवायची . आणि पुन्हा झपाटून गेल्यासारखे अभ्यासाला लागायचो . मिळेल त्या शिक्षवृत्ती ....मिळेल तशी मदत घेत पुढे जात राहिलो . प्रसंगी लोकांच्या पाया ही पडलो.मेरिटवर प्रवेश मिळावला. डॉक्टर व्हायचे हे पक्के डोक्यात बसले होते . मला माहितीय मी डॉक्टर होऊनही तुमचे प्राण वाचवीनच याची हमी देऊ शकत नाही पण प्राण वाचवायचे प्रयत्न करीन याची हमी देऊ शकतो . माझ्या ज्ञानाचा वापर मी गावसाठीच करेन हा माझा शब्द आहे .धन्यवाद ......
स्थळ.... मुंबई
ठिकाण ... उच्चभ्रू वस्तीतील पॉश हॉटेल
वेळ... रात्री नऊ
आज सोसायटीतील एक मुलगा डॉक्टर झाला होता . त्या यशाची पार्टी त्याने आयोजित केली होती .सोसायटीतील मित्रमैत्रीनिणा त्याने बोलावले होते . टेबलवर उंची दारू ,आणि इतर पेय तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ होते.
"चियर्स फॉर सक्सेस .....असे म्हणत सर्वांनी ग्लास एकमेकांना भिडवले आणि तोंडाला लावले . मग तो उठून उभा राहिला .
"च्यायला ....झालो एकदाचा डॉक्टर ...!!  आई बापाची खूप इच्छा होती पोरगा डॉक्टर व्हावा . आयुष्यभर दोघांनीही नोकरी करून पैसे कमावले .आम्ही काय करतोय...???कसे राहतोय ..?? याकडे लक्ष दिले नाही . फक्त जे पाहिजे ते आणायला पैसे देत राहिले.गरज आहे त्यापेक्षा जास्त दिले . सोसायटीतील मुले डॉक्टर किंवा इंजिनियर बनतात नाहीतर एमबीए .म्हणून मला डॉक्टर बनायला सांगितले . पाहिल्यावर्षी मार्क कमी पडले म्हणून दुसर्यावर्षी नवीन जोमाने प्रयत्न करायला सांगितले . डबल क्लास लावला .शेवटी डोनेशन भरून ऍडमिशन घेतले .वर्षाला दोन दोन लाख फी भरली . त्यासाठी वडिलांनी ओव्हर टाईम केला . आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हीच अपेक्षा . तरच चार लोकांत ताठ मानेने जगता येईल असे त्यांना वाटले. मला काय वाटते कोणी विचारलेच नाही . एकदा विचारले बाबांना खरेच डॉक्टर होऊन मी लोकांची सेवा करू शकेन का ....??? तर बाबा म्हणतो "हल्ली मुंबईत कोण डॉक्टर सेवा करतो ..?? आणि 70 % लोकांना एकसारखेच आजार सर्दी खोकला ताप .Bp आणि शुगर  आणि ताप चेक करायला मशीन निघाल्यात . जास्त काही समजले नाही तर स्पेशालिस्टची चिट्ठी देऊन पुढे पाठवायचे . आपण शिक्षणासाठी केलेला सर्व खर्च लवकरात लवकर वासून केला पाहिजे .उद्या आम्हाला अभिमानाने सांगता आले पाहिजे आमचा मुलगा डॉक्टर आहे .च्यायला..... मला तर व्हायोलिन शिकायचे होते . संगीत मला प्रिय आहे . बासरी शिकायची आहे . त्याचे कार्यक्रम करायचे आहेत . मागे रात्री बासरी वाजवताना बाबांनी पाहिले सकाळी त्याचे दोन तुकडे  डस्टबिन मध्ये सापडले .हे असे वाजवून काही मिळणार नाही आयुष्यात . असा दमही वर मिळाला . उद्यापासून आता रोज माझी जाहिरात होईल मुलगा डॉक्टर झालाय . दोन वर्षांनी स्वतःचा दवाखाना उघडेन आणि सुरवातीची फी 200 रु घेऊन धंद्याला सुरवात करेन . आज पोटभर पिऊन घ्या चियर्स ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, April 12, 2019

सरमिसळ .. जयवंत दळवी

सरमिसळ ..... जयवंत दळवी
साकेत प्रकाशन
गंभीर लेखनासोबत दळवींनी विनोदी कथा ही लिहिल्या.त्यातीलच एक म्हणजे ही सरमिसळ. हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या या कथा वाचताना आपण गुंतून जातो. दळवींचा मानवी मनाचा अभ्यास खूप आहे . त्यावर त्यांनी मार्मिक आणि गंभीर अश्या दोन्ही प्रकाराने लिहिले आहे . एकूण 14 विनोदी कथा आहेत.काही निव्वळ हसवणूक करतात.तर काहींना कारुण्याची झालर आहे . तर काही कथांमध्ये दळवी स्वतःवरच विनोद करतात. अर्थात जयवंत दळवी म्हणजे पुस्तक वाचायलाच हवे.

Tuesday, April 2, 2019

आज आत्ता इथे ( पर्मनंट प्रेझेंट टेन्स )

आज आत्ता इथे ( पर्मनंट प्रेझेंट टेन्स ) सूझन कॉर्किंन
अनुवाद ..... डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
सायन पब्लिकेशन प्रा लि.
एक माणूस फक्त वर्तमानकाळ लक्षात ठेवतो . त्याला एका मिनिटापूर्वी काय घडले ते आठवत नसेल तर काय होईल ..?? कसा राहील तो ..?? होय हे खरे झालेय हेन्री मोलेसनच्या बाबतीत . सत्तावीस वर्षाचा असताना त्याला अपस्मारचे झटके येऊ लागले म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली .  पण तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा वेगळीच समस्या घेऊन आला . त्याची स्मृती तयार करण्याची क्षमताच नष्ट झाली होती .त्याला मागचे काहीच आठवत नव्हते इतकंच नाही तर काही वेळापूर्वीही घडलेले त्याला आठवत नव्हते .आता त्याला फक्त वर्तमानकाळातच जगावे लागणार होते . प्रसिद्ध मज्जाशास्त्रज्ञ डॉ. सूझन कॉर्किंन यांनी साधारण पन्नास वर्षे त्याच्यावर उपचार केले . हेन्री डॉ .च्या जीवनातील एक भागच बनला होता .जगातील सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या रुग्णाची हेलावून टाकणारी कहाणी .

Saturday, March 30, 2019

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस.

ऑपरेशन ब्लू स्टार  जस घडलं तस... ले. जन. के.एस. ब्रार
अनुवाद....भगवान दातार
रोहन प्रकाशन
मुळात सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाईची खरोखर गरज होती......? तर त्याचे उत्तर होय असेच होते. पंतप्रधान इंदिरा गांधींनी शेवटच्या क्षणापर्यंत ही कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले.
ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त लष्करी कारवाई होती.त्याचे नेतृत्व करणारे ले. जन. ब्रार आजही शीख अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत . इतकेच नव्हे तर 30 सप्टेंबर 2012 मध्ये लंडन येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला.
या कारवाईचे प्रमुख पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या हत्या झाल्या . तर त्यांच्या हत्येस जबाबदार असणारे आणि हत्या करणारे हुतात्मा म्हणून गौरवले गेले.
लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे यासाठी ले .जन. ब्रार यांनी स्वतः अनुभव  लिहायचे ठरविले . त्यांनी या कारवाईचे अचूक आणि तपशीलवार वर्णन केले आहे .
प्रमुख अतिरेकी संत भिद्रानवाले यांनी घेतलेला सुवर्ण मंदिराचा ताबा . त्यात दडवलेली प्रचंड शस्त्रास्त्रे यावर सरकारने नरमाईचे धोरण घेतले . जातीय तणाव वाढून हिंसाचार होऊ नये ही यामागची भूमिका होती .पण पुढे गोष्टी इतक्या थराला गेल्या की 26 जानेवारी 1984 च्या प्रजासत्ताकदिनी स्वतंत्र खलिस्तानचा झेंडा मंदिर परिसरातील एका इमारतीवर फडकविण्यात आला . अतिरेक्यांना अटक करणाऱ्या पोलिसांच्या हत्या करण्यात आल्या .
सरकारशी संघर्ष उडालाच तरी आपल्याविरुद्ध लष्करी कारवाई होणार नाही असे भिद्रानवाले याना खात्री होती . जास्तीतजास्त निमलष्करी दलाचा वापर होईल असे त्यांना वाटत होते .
पण पंजाबमधील राष्ट्रपती राजवट पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोसळली .
अतिरेक्यांनी पंजाब पोलीसदलात शिरकाव केला त्यामुळे पोलिसदलाने आपली आपली शक्ती आणि अधिकार गमावले तसेच त्याचे मनोधैर्यही खचले .
भिद्रानवाले यांनी अकाल तख्तातून बाहेर यावे यासाठी सर्वांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले .
राज्यातील अन्नधान्याची वाहतूक रोखण्याचे आंदोलन 3 जून 1984 पासून सुरू होणार होते आणि मग राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असती आणि म्हणूनच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाई करायची परवानगी दिली . पण त्यासाठी काही अटी घातल्या
कमीत कमी बळाचा वापर
सुवर्ण मंदिराचे कमीतकमी नुकसान
हर मंदिरसाहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायच्या नाहीत .
कारवाईत भाग घेणाऱ्या सर्व सैनिकांनी मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे . भाविकांना बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे .
या अटींवरच कारवाई झाली पाहिजे असा त्यांचा स्पष्ट आदेश होता आणि प्रत्येक जवानाने तो काशोशीने पाळला . यात भारतीय लष्कराची फार मोठी हानी झाली.
1 जून 1984 ला ऑपरेशन ब्लू स्टार ला मान्यता मिळाली आणि 5 जून 1984 ला रात्री 9.30 वाजता ऑपरेशन ब्लू स्टार सुरू झाले . जास्तीत जास्त दोन रात्रीमध्ये हे ऑपरेशन संपेल असा अंदाज होता पण ते पूर्ण व्हायला 4 रात्री लागल्या .
अपुरी माहिती ..अपुरा वेळ ..मोजकेच मनुष्यबळ . प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी चुकलेले अंदाज  तर काही ठिकाणी घ्यावी लागलेली अनपेक्षित माघार याचा भारतीय लष्कराला मोठा फटका बसला.प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग...अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार पाहून आपण थक्क होतो .
केवळ शीखांच्या नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतात.
आपल्या प्राणांची पर्वा न करता आणि दिलेल्या हुकुमाचे तंतोतंत पालन करणाऱ्या भारतीय लष्कराला सलाम.
© श्री . किरण कृष्णा बोरकर
मुंबई
8286837133

Tuesday, March 26, 2019

द बेस्ट लेड प्लॅन्स ... सिडने शेल्डन

द बेस्ट लेड प्लॅन्स ... सिडने शेल्डन
अनुवाद...अनिल काळे
श्रीराम बुक एजन्सी
स्त्रीचा सूड किती योजनाबद्ध आणि भयानक असू शकतो हे आपल्याला  लेस्ली स्टुअर्ट या युवतीमुळे कळते.ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केले त्याच्यासाठी केंटूकीच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत प्रचार मोहीम राबवली. त्याने लग्नाच्या पंधरा दिवस आधी आपल्या जुन्या मैत्रिणीशी लग्न केले तेही हिला कोणतीही पूर्वसूचना न देता......???
ऑलिव्हर रसेल हा तिचा प्रियकर साधा वकील आहे पण एका बलाढ्य सिनेटरच्या मुलीशी लग्न करून तो भविष्यात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनायची स्वप्ने पाहतोय . त्यासाठी त्याला त्याचा सासरा मदत करतोय. त्याचे सासरे एक बलाढ्य उद्योगपती आणि सिनेटर आहेत . आपल्या मुलींसाठी ते काहीही करू शकतात .
  त्याने केलेल्या विश्वासघाताने लेस्ली अंतर्बाह्य पेटून उठली आणि तिने योजना आखून ह्याचा सूड घ्यायचे ठरवले . त्यासाठी काही ठराविक गोष्टींची तिला आवश्यकता होती . त्या तिने कशा मिळवल्या..?? एका साध्या पण हुशार मुलीने शांतपणे हळू हळू त्याच्या मानेभोवती पाश कसे आवळले ..?? ते पुस्तक वाचूनच कळेल .मुळात या कादंबरीत केवळ चारच मुख्य पात्रे आहेत त्यामुळे कादंबरी वाचताना गोंधळ उडत नाही .

Sunday, March 24, 2019

पालखी

पालखी
"ह्या वर्षी तरी पालखीक नेतयस ना.....?? थरथरत्या आवाजात भिकू पेडणेकरानी दशरथला विचारले . तसा तो वैतागला."ओ तात्यानु पडून रवा हो ..?? या वयात खय पालखी ….पालखी करताव. ..हयसूर  वेळ कोणाक हा ...?? तुमचो  नातू दोन वर्षांनी घरी इलोय . त्याच्याबरोबर राहू की चार दिवस... गेलो  की पुन्हा दोन वर्षा येऊचो नाय…."
भिकू तात्यांच्या डोळ्यात पाणी आले . "तसा नाय रे झिला .... पण बरीच वर्षे झाली पालखी खांद्यावर घेऊन . आता लय वाटता रे जाण्यापूर्वी बघूची."  बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले ते कळलेच नाही.
भिकू पेडणेकर वय वर्षे 85 .. सध्या सर्व काही बिछान्यावर . बाहेर पडले तर व्हीलचेयरवरच . मुलगा दशरथ पेडणेकर सध्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर...पण आता निवृत्तीच्या वाटेवर . तर नातू निशिकांत  पेडणेकर इंजिनियर ...सध्या परदेशात वास्तव्य . आला तरी केवळ दहा दिवसासाठी भारतात.
भिकू तात्या कोकणातून मुंबईत कामासाठी आले आणि पक्के चाकरमानी बनले .पण सणासुदीला कोकणात जाणे काही थांबले नाही . दरवर्षी होळीला जायचे.... पालखी नाचावयाची….. कुटुंबासाठी नवस बोलायचं आणि तो फेडण्यासाठी पुन्हा पालखीला हजर राहायचे. दशरथ लहानपणी त्यांच्याबरोबर जायचा पण लग्न झाल्यावर बायकोला घेऊन गेला आणि त्यानंतर गावाचे तोंड पाहिले नाही.
पुढे पत्नी गेल्या नंतर त्यांनीही गावी जाणे सोडले . गेल्या चार वर्षांपासून ते अंथरुणावर खिळून आहेत . दरवर्षी होळी आली की केविलवाण्या चेहऱ्याने दशरथला पालखीला नेण्यासाठी विनवतात. पण कोणालाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुकाटपणे डोळे पुसत ते शांतपणे बसले .इतक्यात निशी आत आला .."काय झाले पपा..?? आजोबा का असे बसलेत ...??
"अरे काही नाही रे ...?? गावी जाऊ म्हणतात पालखीला .. बरीच वर्षे गेलो नाही म्हणतात. आता घेऊन चल ... पण आता जमेल का ह्यांना प्रवास .. ती धावपळ ... त्यात कोकणातले रस्ते खराब ..."
निशीने नुसतीच हम्म...!!  करीत मान डोलावली . "पालखीबद्दल बरेच काही ऐकलं आहे मी .. त्यांची इच्छा असेल तर चार दिवस जाऊया पपा ... "तो सहज स्वरात म्हणाला.
"अरे काय ....?? सोपे वाटते का तुला गावी जाणे . तिथे प्रवास बारा तासाचा ...पाण्याचा प्रॉब्लेम.टॉयलेटचा प्रॉब्लेम.." दशरथ चिडून बोलले.
"तरीही माणसे राहतात ना तिथे ...?? पपा जगात इथल्यापेक्षाही भयानक परिस्थितीत लोक राहतात . मलाही काम करताना मनासारखे काही मिळत नाही . चला यावर्षी जाऊच सगळे चार दिवस .. मी गाडीची सोय करतो "असे बोलून वळला पण नजरेच्या कोपऱ्यातून आजोबांच्या डोळ्यातील चमक त्याला सुखावून गेलीच.
नातवाच्या तोंडातून सर्व ऐकताना भिकू तात्याचे  मन प्रसन्न होत होते . अंगात नवचैतन्य आले .दुसऱ्या दिवशी पहाटे ते निघाले . आपल्या मुलाचे आणि नातवाचे मन पालटू नये म्हणून भिकूतात्या स्वतःला फिट दाखविण्याचा प्रयत्न करीत होता . दशरथलाही वडिलांचे हे रूप नवीनच होते . जसजसे गाव जवळ येऊ लागले तसतसे भिकुतात्याच्या  चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला .एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने तो सारा गाव नजरेत साठवून घेत होता . मध्येच नातवाला जुन्या आठवणी सांगत होता . निशीही कौतुकाने सगळे ऐकत होता.
घरी पोचताच एखाद्या राजप्रमाणे त्याचे स्वागत झाले . चुलतभावाने  मिठी मारून त्याचे स्वागत केले . दोघांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते . रात्री दशरथ आणि निशी होळी पेटवायला गेले तेव्हा सर्वजण त्यांची मायेने विचारपूस करीत होते.
निशीने वडिलांना विचारलेही ..की ओळख नसताना देखील ही माणसे कशी आपलेपणाने बोलतात ….??दशरथ हसून म्हणाला "अरे ...हीच तर खरी कोकणाची ओळख आहे . परक्याशी देखील आपलेपणाने वागतात . आज ती आपल्याला भिकूची पोर म्हणजेच आपली माणसे म्हणून ओळखतात.
दुसऱ्या दिवशी पालखी येणार म्हणून रात्रभर भिकू झोपलाच नाही . सकाळी लवकर उठून ठेवणीतले कपडे घालून तो पालखीची वाट पाहत बसला . चुलत भावाला जवळ बोलावून त्याने कानात काही सांगितले तसे त्याने हसत मान डोलावली . मग दशरथ जवळ येऊन म्हणाला "तात्या बोलतत पालखी तुझ्या खांद्यावरून घरात घेऊन ये ."काही न बोलता दशरथने मान डोलावली . पालखी घराजवळ आली आणि दशरथने ती एक बाजूने खांद्यावर घेतली त्याच क्षणी त्याला भरून आले . एक वेगळीच सुखाची  अनुभूती त्याच्या शरीरातून वाहू लागली.त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले . प्रत्यक्ष देवाला घेऊन आपल्या घरी चाललोय ही भावनाच त्याचा उर भरून येण्यास पुरेशी होती . दाटल्या डोळ्यांनी त्याने अंगणात प्रवेश केला . समोर व्हीलचेय वर वडील बसले होते . त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला कळले आपण आयुष्यात कोणते सुख कमाविले आहे . वडील आश्चर्याने मागे का पाहताय..?? म्हणून त्याने मागे नजर वळवली आणि आश्चर्याचा अजून एक धक्का त्याला मिळाला .दुसऱ्या बाजूने निशी पालखी घेऊन उभा होता . अतीव आनंदाने सर्वांनी पालखीची पूजा केली आणि निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले . प्रवासात दशरथ थट्टेत भिकूतात्याला म्हणाला .."ओ तात्यानु.. देवाकडे काय मागीतलाव ...??
"अरे ..त्या देवाकडे काय सारखासारखा मागूचा .. आपला काय ता आपल्या नशिबात .. उगाच देवावर लोड कित्याक ..? काय मागूचा हवा म्हणून खांद्यावरून घेवून येताव की काय ..?? सर्व हसले.
दुसऱ्या दिवशी सर्व मुबंईला माघारी निघाले .रात्री घरी येऊन सर्व झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी भिकूतात्या उठलाच नाही . मेल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते . बातमी कळविण्यासाठी दशरथने गावी फोन केला .फोनवर रडत रडत म्हणाला "पालखीला जायची त्यांची अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने गेले..
पलीकडून चुलते म्हणाले "शेवटची पालखी त्यांनी खांद्यावर घेऊन घरात आणली तेव्हाच म्हणाले होते जो पर्यंत माझा मुलगा पालखी स्वतःच्या खांद्यावर घेत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नकोस.त्यांनी तुला खांद्यावर घेतलेले बघायचे आहे मला . काल तुम्ही दोघांनी पालखी खांद्यावर घेतलीत तेव्हाच त्याचे जाणे नक्की झाले होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, March 19, 2019

मांदार्य...राजेंद्र खेर

मांदार्य.....राजेंद्र खेर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
अगस्त्य ऋषींच्या कार्याचा आढावा घेणारी ही कादंबरी.देवानी अतिशय काळजीपूर्वक राजकारण करून अगस्त्य ऋषीना देशात कार्य करण्यास निवडले होते . आदिवासी रानटी जमातीत कुटुंबव्यवस्था निर्माण करणे . त्यांना समाजात आणण्यास मदत करणे . नरमांसभक्षणापासून दूर करणे ,शेती आणि इतर उदरनिर्वाहच्या गोष्टी शिकवणे. त्यांनी मेहनतीने संपूर्ण देशात क्रूर दानवांचा विनाश करून एक ठराविक आचारसंहिता आणली.दक्षिणेकडून त्रासदायक ठरलेल्या रावणाचे उच्चाटन कसे करायचे याची योजना आखली गेली. दशरथ राजा आयोध्येतून रामाला बाहेर सोडणार नाही पण रामच रावणाचा नाश करू शकतो त्यासाठी रामाला आयोध्येतून बाहेर काढायची योजना आखली गेली .अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला म्हणजे नक्की काय केले ..?? रावणाला दहा तोंडे होती म्हणजे काय होते ...?? ब्रम्हदेव म्हणजे नक्की कोण ..???अहिल्येला मिळालेला शाप काय होता ..?? जटायू ..वानर ..हे कोण होते....?? त्यांनी रामाला कशी मदत केली..??  या सर्वांची उत्तरे आपल्याला या कादंबरीत मिळतात .