Monday, August 15, 2016

स्वातंत्र्य

आज आपल्या भारताने स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्षात पदार्पण केले. मी कधीच हा विचार केला नाही की या देशाने ७० वर्षात काय केले ?? काय करायला पाहिजे? मी मला जे योग्य वाटेल तेच करत आलो. मला वाटते सर्वजण तेच करतात.

लहानपणी फक्त इतिहासात मार्क्स  मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास केला. मोठे झालो तेव्हा पैसे कमवून सुखी आयुष्य जगायचे या एकाच ध्येयाच्या मागे लागलो. देशभक्तीची गाणी फक्त या दिवशीच ऐकायची, तेव्हाच सर्वाना देशभक्ती सुचायची. कवी प्रदीप यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध गाणेही याच दिवशी ऐकायला मिळायचे. व्हाट्सअॅपमुळे एक फायदा झाला की, यादिवशी घरबसल्या सर्वांना देशप्रेमाचे गोडवे गाता येऊ लागले.

हळू हळू आयुष्यात सुख स्थिरावलं आणि तेव्हा कळू लागलं "अरे या देशानेच खूप काही दिले मला. आज मी जो काही आहे तो या देशामुळेच ना ? काय दिले नाही मला या देशाने?? शिक्षण दिले, उत्तम नोकरी दिली, छान कुटुंब दिले आणि मुख्य म्हणजे संस्कार दिले ज्यांनी मला खर्या अर्थाने माणूस बनवले. त्या संस्कारांनीच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची मला जाणीव करून दिली.

आज शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही "Start Giving Foundation" च्या माध्यमातून जे काही कार्य करतो आहोत ते सर्व या जाणिवेतूनच आले आहे. फूल ना फूलाची पाकळी पण काहीतरी आपण समाजाला  आणि पर्यायाने देशाला कृतज्ञतापूर्वक परत करतो हे समाधान घेऊन आम्ही रोज झोपतो. आमचं कार्य हे सागरातल्या एका थेंबासारखं जरी असलं, तरी ते आम्हाला आभाळाएवढं समाधान देतं. खरेच आज या देशाचा नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे .

No comments:

Post a Comment