Sunday, August 7, 2016

मैत्री दिन

ते दिवसच छान होते. सकाळी 8.30  ला ठाणे स्टेशन ला सर्व एकत्र S.T. स्टँड वर एकत्र भेटायचो. आणि Bus मध्ये रिकामी सीट मिळविण्यासाठी पळापळ करायची. शेवटी मोठ्या कष्टाने पकडलेली सीट शेजारी उभ्या राहिलेल्या सराना किंवा मॅडमना द्यायची. कधी सर किंवा मॅडम नसायचे Bus मधे. त्या दिवशी वाटायचं.... चला, एवढ्या कष्टाने मिळविलेल्या जागेवर आज आपणच बसणार तर...! पणं..... एवढ्यातच कॉलेजमधील एखादी गोड मुलगी येऊन उभी रहायची आणि जास्तच गोड हसून प्रेमाने पहायची. झालं.....  गेली परत आमची सीट. एकाला जागा मिळाली कि सर्वांच्या बॅग्ज त्याच्या मांडीवर विराजमान व्हायच्या आणि नंतर चालू व्हायचा खरा प्रवास. नुसता धिंगाणा, गाणी गात, शिट्या फुंकत कॉलेजपर्यंतचा तो प्रवास अविस्मरणीय.

कॉलेज मध्ये तसे फारसे lecture अटेंड केले नाहीच. मागचा डोंगर,तलाव आणि धान्यांची गोदामेच आम्हाला खुणवत असायची. मित्र तर सगळेच त्यामुळे दिवस कसा जायचा हेच कळायचेच नाही. त्या दिवसात सर्व समविचारी, उद्दिष्ट्य नसलेले ,निरागस असे सर्व मित्र आम्ही.कदाचित त्यामुळेच आजही एकत्र आहोत आम्ही. आज जो तो आपापल्या उद्दिष्टा पर्यंत पोचला आहे पण मैत्रीचा तो नाजूक धागा अजूनही आम्ही घट्ट धरून आहेत. कधीही नुसती हाक जरी मारली तरी ओ देतात.

तीच गोष्ट गार्डन मधील दगड ग्रुपची. कॉलेज संपले किंवा नसले कि सकाळपासून आमचा मुक्काम गार्डन मध्ये असायचा. इथे पुस्तक घेऊन आला नाहीत तरी चालते कारण आमच्या दगडावर तुम्हाला पाहिजे ते पुस्तक मिळेल हि खात्री....! शिवाय ग्रुपमधील कोणीतरी असायचाच. मग भेळ चणे फुटाणे  खात दिवस चालू व्हायचा. एकमेकांची थट्टा करीत अभ्यासाच्या नावाने दिवसभर गार्डनमध्ये पडून राहायचे. सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यास करणारे पण परिस्थिती कमी-अधीक प्रमाणात सारखीच. घरी जागा नाही, पुरेशी पुस्तके नाहीत, तर क्लासला जायला पैसे नाहीत. मग काय ????? गार्डन झिंदाबाद !!!! तीथे सर्वकाही मिळे.कोणतेही पुस्तक मिळे. प्रत्येकाची प्रत्येक  अडचण सिनियर्सकडून सोडविली जाई. मग त्या कोणत्याही असोत, सर्वच एकमेकांना सांभाळून घ्यायचे. खरेच मी खूप भाग्यवान आहे. असे मित्र मला मिळाले आणि आजही ते माझ्या बरोबर आहेत.

No comments:

Post a Comment