Sunday, August 21, 2016

ऑनलाइन मैत्री

अनिरुद्ध बापट आणि मी एकाच कंपनीत. त्याचे डिपार्टमेंट वेगळे. तो मला ज्युनियर. वयाने आणि अनुभवानेही. इथे तो भाड्याने राहायचा. एकटाच असल्याने कामावरून सुटल्यावर घरी जायची घाई हा प्रकार नाहीच. सतत मोबाईलवर असायचा. कधी गेम तर कधी चित्रपट. विचारले तर म्हणायचा " काय करू साहेब?? काहीतरी टाईमपास हवा ना??"

एक दिवस अचानक धावत माझ्या केबिनमध्ये शिरला आणि मोबाईल माझ्या हाती दिला म्हणाला "बघा भाऊ लॉटरी लागली". मीही उत्सुकतेने पाहिले तर मोबाईल मध्ये एका सुंदर बाईचा फोटो आणि खाली मोबाईल नंबर पण. "अरे हे काय? कोण हि?" एका सोशल साईट वर भेटली आताच फोन नं दिला वॉट्स  अॅपचा ". "मग", तू काय काय करणार ??" तसा हसून म्हणाला "अहो मिळाली ना शेवटी कोणतरी. बरेच दिवस प्रयत्न करत होतो शेवटी आज नं दिला. "छान, पण कोण कुठली?" म्हणाला "दिल्ली, गुङगावची आहे, पंजाबी. मैत्री करू, गप्पा मारू तेवढाच टाईमपास". मी हात जोडले म्हटले चालू द्या. त्यादिवासानंतर तो सतत ऑनलाइन राहू लागला. काही दिवसांनी मी बाहेरगावी गेलो त्यामुळे त्याच्याशी संपर्क तुटलाच.

2 महिन्यानी मी परत आलोब, बघतो तर हा चुपचाप कॉम्पुटर वर काम करत होता बऱ्याच वेळाने उठला आणि चहा घेऊन समोर बसला. मी म्हटलं "अरे हे काय? मोबाईल कुठे आहे? मैत्रीण काय  म्हणते ??" तर थोडा नाराज होऊन म्हणाल "हल्ली वाटत नाही चाट करावेसे" " का"?? मी आश्चर्याने विचारले "अहो किती बोलणार रोज रोज ? आणि काय बोलणार?"  एक तर आमची लेव्हल वेगळी " मी मिडल क्लास ती हाय फा.  पण तरीही ती छान बोलायची. कधीही वेगळेपणा दाखवला नाही. जेव्हा कधी मेसेज द्यायचो ती लगेच उत्तर द्यायची. खूप वेळ चाट करायचो आम्ही. तिची प्रत्येक विषयावर बोलायची तयारी. सुरवातीला जाम भारी वाटायचं. एकदम वेगळं, खूप छान. रोज ठराविक वेळी ती ऑनलाइन यायची आणि चाट करायची. पण एक ठराविक काळ लोटल्यावर काय बोलायचं रोज कळेनासं झालं. आणि परत एका अदृश्य बाईशी जी कधीही दिसत नाही तिच्याशी किती वेळ बोलणार "? मग मलाच कंटाळा यायला लागला. तिलाही जाणवू लागले ते. हल्ली तीही ऑनलाइन नसते, असली तरी gm आणि gn करतो आम्ही "मलाही सुचत नाही रोज रोज काय बोलावे?? आता तर मनात ठरावावे लागते काय बोलायचे. आम्हाला एकमेकांबद्दल पूर्ण माहिती आहे. आवडी निवडी ,घरची परिस्थिती, सर्व काही. एकवेळ अशी आली की वाटलं आमचा चाट आता फक्त सोपस्कार उरला की काय?? काय नवीन बोलू रोज??

हे सगळं रामायण मला ऐकवून तो गेला परत कामाला. पण मी मात्र विचारात पडलो खरेच हेच आहे का सोशल लाईफ?? अशी कशी ही ऑनलाइन मैत्री, कि बोलायलाही विषय सुचत नाहीत. मग आम्ही कसे 30 वर्षे मैत्री निभावतोय. भेटलो तर एक दिवस कसा जातो ते कळतसुद्धा  नाही. घरी आलो की फ्रेश होऊन बाहेर पडायचं मित्राला हाक मारून खाली बोलवायचे, टपरीवर चहा ढोसायचा. गप्पांना अंत नसायचा आणि आरामात घरी जायचो. आम्हाला कधीही ऑनलाइन मैत्रीची  गरज पडली नाही. आणि मित्रांचा कंटाळा आला नाही.

No comments:

Post a Comment