Wednesday, August 24, 2016

सण

"अरे भाई ,आपला सण आहे ,आपण आपल्या पद्धतीनेच साजरा करणार " बंड्या माझ्यासमोर गोविंदा ची बनियन नाचवत बोलत होता .मी ऐकून न ऐकल्यासारखे केले ,मला माझी कामे होती तर बंड्या नुसता भटकायचा ,मिळेल ते काम करायचा .माझा सण साजरे करण्यावर कधीच आक्षेप नव्हता आणि नसणार हि .पण बंड्याच्या विधानावर आक्षेप होता .कोणीही अडविले नाही कोणाला सण साजरे करायला पण ते कसे साजरे करावे यालाही बंधने असावी.
पूर्वी ठीक होते लोक जनजागृती आणि एकत्र येण्यासाठी सण साजरे करत पण आता दुसऱ्यांच्या वरचढ कसे व्हायचे याचा विचार जास्त होऊ लागला .९ थर लावून असा काय आनंद मिळणार कि जो ५ थर लावून मिळणार नाही ??आपला मुलगा सण साजरा करायला घराबाहेर पडलाय तो संध्याकाळी धडधाकट येईल का ?? याचीच आई वडिलांना काळजी .
तीच परिस्थिती इतर सणांची. गणपती पूजेसाठी आणायचा कि उंच दाखविण्यासाठी?? माझ्या गणपतीला सेलिब्रिटी येतात म्हणून तो गणपती पावणारा?? लोक स्वतःच्या घराचा गणपती सोडून आधी सार्वजनिक गणपतीला जातात आणि नंतर अभिमानाने सांगतात पहिल्या दिवशी दर्शन घेऊन आलो
.काळ बदलत गेला आणि लोकांची मानसिकता बदलत गेली .सण  हे धार्मिक न राहता प्रसिद्धीचे कारण बनले आहेत ,लोकांच्या भावनांशी खेळून अधिकाधिक कसे प्रसिद्ध होता येईल याचा अभ्यास चालू झाला .कधी सुधारणार आजची पिढी ,कधी डोळे उघडतील त्यांचे ?? आज सण कसे साजरे करायचे हे कोर्टाला सांगावे लागते यातच आपली हार आहे.

No comments:

Post a Comment