Thursday, August 25, 2016

कोकण आणि गणपती

आज परत एकदा शंकर माझ्यासमोर उभा होता. "साहेब, गणपतीला गावी जायचे आहे, सुट्टी हवीय." यावेळी त्याचा स्वर मवाळ होता आणि नजरही खाली झुकली होती. "अरे ,आताच तर  काविळीच्या आजारात 20 दिवस सुट्टी घेतलीस ना तू, सर्व सुट्ट्या संपल्या तुझ्या कुठून देऊ तुला सुट्टी? मी थोडा रागातच बोललो."काय करू साहेब, एकट्यालाच करावे लागते सर्व. गणपती तर आलाच पाहिजे ना.... सर्व काही इथूनच घेऊन जावे लागते." "मग इथेच का नाही आणत गणपती ??" मी विचारले "शक्य नाही साहेब, गणपती मूळ घरातच आला पाहिजे असाच रिवाज आहे "

खरेच कोकण आणि गणपती यांचे नाते अजूनही मला समजले नाही. प्रत्येक कोकणी माणसाच्या अंगात होळी आणि गणपती भिनलेले असतात त्यासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असते. मी कधीही कोकणात माझ्या गावी गणपतीसाठी गेलो नाही पण होळीला मात्र दरवर्षी जातो. ज्या दिवशी माझे स्वतःचे घर बांधले त्याच दिवशी गावकर्यांनी सांगितले आता पालखी घरी येणार.  त्यावेळी मला झालेला आनंद मी कधीच विसरू शकत नाही. देवाना स्वतःच्या खांद्यावरून, डोक्यावरून वाजत गाजत घरी आणायचा आनंद काय असतो हे मी समजू शकतो, आणि म्हणूनच वाटेल ते झाले तरी शंकर गावी जाणारच हे माहित होते मला.

अजूनही कोकणात पारंपरिक पद्धतीनेच गणपती उत्सव साजरा केला जातो. घराची झाडलोट, दारासमोर सुबक रांगोळी, मखर आणि सजावटीसाठी रात्रभर जागरण, संपूर्ण घर शेणाने सारवलेले, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वहात असतो. गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा करणे हे केवळ कोकणातच अनुभवू शकतो .सर्व स्रीवर्ग नऊवारी नेसून,नाकात नथ आणि दागिने घालून हातात ओवाळणी तबक घेऊन गणरायाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभ्या राहतात. यजमानांचे पाय धुवून गणेशाचे स्वागत करतात, तेव्हा एका क्षणात त्यांच्या चेहर्यावरचे भाव टिपावेत. आपला लाडका लेक खूप दिवसांनी घरी आल्यावर जो आनंद त्या माऊलीला होईल तितकाच आनंद लाडक्या गणरायाचे स्वागत करताना असतो आणि आनंदानी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.

असे दुर्मिळ क्षण अनुभवायची संधी कोण वाया घालवेल?? हे सारे शहरात अनुभवता येत नाही. अजूनही कोकणात आपली संस्कृती, जुन्या रीती, परंपरा टिकून आहेत. त्या 10 दिवसात सर्व नातेवाईक, मित्र परिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.रात्री मोजक्याच आरत्या, मग मनोरंजनाचे कार्यक्रम आणि शांतपणे लवकर झोपून परत भल्या पहाटे उठून बाप्पाची सेवा करण्यात कोकणवासीय धन्यता मानतात. मी शंकरची सुट्टी रद्द करून त्याचा हा आनंद हिरावून घेऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment