Wednesday, July 31, 2019

पाण्याची भीक

पाण्याची भीक
दरवर्षीप्रमाणे यंदाही गटारी आली. पण यावेळी विक्रम रिकाम्या हाताने घरात शिरताना पाहून मी चक्रावलो. तसेही सदा..बंड्या..आशु..अजून आले नव्हते.
नेहमीप्रमाणे विक्रमवर सामान आणायची जबाबदारी होती.पण त्याचे रिकामे हात पाहून मी घाबरलो.च्यायला.....!! झालेला पगार संपत आला होता.त्यामुळे सौ हात वर करणार हे नक्की.. विक्रमही दरवर्षी विदेशी माल घेऊन यायचा त्यामुळे त्याची सवय लागलीच होती.
"अरे विकी हे काय ...?? तू रिकामाच ..."??  मी काळजीने विचारले.तसा आतून छद्मीपणे हसण्याचा आवाज ऐकू आला आणि सौ बाहेर येऊन म्हणाली "आहो आम्ही बाहेर जातोय जेवायला. तुमचे तुम्ही बघून घ्या. घरात काही बनवले नाही."मी हताशपणे विक्रमकडे पाहिले.तसे त्यानेही होकारार्थी मान डोलावली.
"खरे आहे भाऊ ....वहिनी ..वनिता आणि इतर बायका आज गटारीसाठी बाहेर चालल्या आहेत . वनिताने मला हेच कारण सांगितले. तुला माहितीय मी तिच्यासमोर काही बोलत नाही .मला वाटले तूच काही रस्ता काढशील वहिनीला समजावशील.." विक्रम हसत म्हणाला.
"अरे हिला मी समजावणार....?? असे म्हणून विक्रमला हात जोडले .
"काळजी करू नकोस ..शेट्टीला फोन करून एक टेबल बुक केलंय.चल निघू .." मग आम्ही दोघे शेट्टीच्या नटरंग कडे निघालो.
आज गटारी असल्यामुळे नटरंग फुल होता. पण आमचे टेबल खाली होते . थोड्यावेळाने सर्व गॅंग जमा झाली . वेटरने प्राथमिक भाग म्हणून सर्वाच्या पुढ्यात पाण्याचे ग्लास ठेवले." अरे पाणी थोडेच प्यायला आलोय इथे...?? तरीही तुझा मान ठेवतो बाबा.." असे म्हणत सदाने ग्लास तोंडाला लावून दोन घोट पाणी प्यायला. प्रत्येकाने मग त्याचेच अनुसरण केले .ऑर्डर घेऊन वेटर निघाला तितक्यात एक तरुण मुलगा आमच्यापाशी आला."साहेब ... माझ्याकडे बघून त्याने आवाज दिला"आता हे पाणी तुम्ही पिणार नाही ना ...."?? टेबलावरील पाण्याच्या ग्लासकडे बोट दाखवून त्याने विचारले ."नाही ..."मी तुटक आवाजात म्हणालो . त्याने ताबडतोब त्या सहा ग्लासातील पाणी एका रिकाम्या बाटलीत जमा केले . ती बाटली भरताच तो लगबगीने बाहेर पडला आणि दुसरी रिकामी बाटली घेऊन आला ."धन्यवाद साहेब ..असे बोलून तो दुसऱ्या  नुकत्याच रिकाम्या होणाऱ्या एका टेबलकडे वळला . तिकडचा गिऱ्हाईक नुकताच बिल देऊन उठत होता . त्याच्या टेबलवर अर्धी भरलेली बिसलरीची बाटली होती . त्याने पुन्हा नम्रपणे ही बाटली घेऊ का असा प्रश्न त्याला विचारला . गिऱ्हाईक फुल तट्टू होते त्यामुळे त्याने एखाद्याला फार मोठे इनाम देतोय अश्या प्रकारे ती बाटली त्याला दिली उलट पाठीवर हात मारून शाबासकी ही दिली.
आमची ऑर्डर आली तसे आम्ही सुरू झालो . बंड्याला नेहमी बिसलरी लागते त्यामुळे बिसलरीचा ओघ आमच्या टेबलवर सुरू झाला . मध्येच आमचे त्या तरुणांकडे लक्ष जायचे .आता त्या तरुणांच्या जोडीला दुसरा तरुण आला.दोघेही सर्व टेबलवर जाऊन ग्लासातील उरलेले पाणी बाटलीत  जमा करत होते.दोन तासात आमचे आटपले आणि आमच्या टेबलवर अर्धी बाटली बिसरली शिल्लक राहिली. आमचे आटपतेय पाहून तोच तरुण पुढे आला तसे विक्रमने काही न बोलता त्याच्या हातात बाटली दिली. तो वळतात मी म्हणालो" मित्रा... पाच मिनिटे देशील का आम्हाला .... ?? तसा तो हसला" का नाही साहेब.....?? मी त्याला समोर बसविले." काही घेणार का.... ??? विक्रमने अंगठा ओठाजवळ नेऊन खूण केली."नाही हो ....मी घेत नाही.." तो हसून म्हणाला."च्यायला....!! तीन तास बारमध्ये राहून दारूला स्पर्श नाही ...?? ग्रेट आहेस . बंड्या हसून म्हणाला . हे तू काय करतोस ...? हातातील बाटलीकडे बोट दाखवीत मी विचारले "मी भीक मागतोय ..... पाण्याची .. तो हसून म्हणाला . पण डोळ्यातील वेदना काही लपली नाही "तुमच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न तुम्ही भिकार्यांना देता तसेच आम्ही तुमच्याकडील उरलेल्या शिल्लक राहिलेल्या पाण्याची भीक मागतो"
"मित्रा ..सर्व काही नीट समजावून सांग"  विक्रम सहज स्वरात म्हणाला .
"मुंबईत सर्व समस्यांवर पर्याय मिळतो असे म्हणतात  ही तुम्हाला कधीच उपाशी ठेवत नाही . म्हणून आम्ही गावातून काही तरुण मुंबईत आलो .आता इथे आमच्या मेहनती आणि शिक्षणानुसार पैसे कमावतो . पण आमच्या गावात भीषण दुष्काळ आहे. शासनानेही आमचा जिल्हा आणि गाव गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर केला आहे .आमच्या घरातील सर्वाना रोज प्रत्येकी किमान एक भांडे पाणी आणावे लागते मग तो लहान असो की मोठा . आज माझी आई बहीण.. लहान भाऊ ..बाबा सकाळी उठून डोक्यावर कळशी घेऊन पाणी आणतात .आता ते कसे आणतात..?? त्यासाठी किती कष्ट पडतात ..??ते विचारू नका . प्रत्येकाला व्हाट्स अप फेसबुक मार्फत डोक्यावरून पाणी आणणाऱ्यांचे फोटो येतच असतात.त्यात एखादा फोटो आमच्या कुटुंबातील व्यक्तीचाही असू शकतो. पण मग इथे राहून आम्ही काय करतो ..?? आम्ही पैसे पाठवितो. पण त्याने पाणी विकत घेता येत नाही .आहो पाणीच नाही तर विकणार काय ...?? एखादं दुसरा टँकर ग्रामपंचायत आणते .पण तो किती जणांना पुरणार ..??  प्रत्येक माणसाने दिवसा किमान तीन लिटर पाणी प्यावे असे मी ऐकले आहे . पण आमच्याकडे एक लिटरच पाणी प्रत्येकजण पीत असेल.शेतीचा आणि गुरांचा आम्ही विचारच सोडून दिला आहे .."असे बोलून त्याने कोणाच्या लक्षात न येईल अशा प्रकारे डोळे पुसले .
"मुंबई प्रत्येकाला खूप काही देते.फक्त ते कसे घ्यायचे याची अक्कल हवी.इथे पाणी वाचवा अशी बोंब मारणारा दिवसातून दोनवेळा शॉवर घेतो . तर  मी बिसलरीशिवाय पीत नाही असे बोलणारा अर्धी बाटली फेकून देतो तेव्हा जीव तुटतो. इथे वडील ..मुलगा ..आई एकमेकांच्या उष्ट्याचे पाणी प्यायला आवडत नाही म्हणून सेपरेट बाटली घेतात. तर काळोखी गल्लीत तोंडात तोंड घालणारी  प्रेमी युगल मला तुझ्या उष्ट्याचे पाणी नको असे बोलत स्वतःच्या बाटलीतले पाणी पितात.ते पाहून आम्ही ठरविले हे पाणी गोळा करायचे . बिसलरीचे पंचवीस  लिटरचे कॅन गोळा केले आम्ही . रोज कामावरून सुटल्यावर आम्ही आमच्या विभागातील बार ,रेल्वे स्टेशन ,एस टी डेपोत फिरतो.लोकांनी फेकलेल्या अर्धवट भरलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा करतो .लोकलमध्ये प्रवास करताना कोण पाण्याची अर्धी बाटली तशीच ठेवून जातो.ती जमा करतो .हे सर्व पाणी त्या मोठ्या बाटलीत गोळा केले जाते . आणि त्या बाटल्या आम्ही आमच्या गावी जाणाऱ्या ट्रेन ,एसटी ,प्रायव्हेट बसेस यातून पाठवतो .."तो हसत म्हणाला
"त्याने कितीसा फरक पडणार ..."?? सदाचा प्रश्न
"ते माहीत नाही पण आमच्या कुटुंबियांना पाणी मिळते हे महत्वाचे .त्यांच्या पाणी मिळविण्याच्या कष्टात आमचाही सहभाग आहे हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे . आहो काही नसण्यापेक्षा हे बरे नाही का ...?? आमचे नातेवाईक सकाळी बस स्टॅण्ड ,रेल्वे स्टेशनवर जातात आणि पाण्याच्या बाटल्या ताब्यात घेतात .  कमीत कमी पन्नास ते शंभर लिटर पाणी गावात रोज पोचते . ते तीन ते चार कुटुंबाला पिण्यासाठी पुरते ..त्यातच आनंद आहे . राहता राहिला प्रश्न ट्रान्स्पोर्टचा ..आहो प्रत्येकाला आपल्याकडून काहीतरी समाजकार्य ..कोणाला तरी मदत करावी ..असे नेहमीच वाटत असते .रेल्वेचा गार्ड ड्रायव्हर...एसटी.. प्रायव्हेट गाडीचे ड्रायव्हर हे आम्हाला मदत करायला तत्पर असतात.त्यांनाही आमच्या जिल्ह्यातील दुष्काळाची  कल्पना आहे . रोजचा प्रवास असतो त्यांचा .  पंचवीसलिटरच्या दोन बाटल्या घेऊन जायला त्यांची काहीच हरकत नसते . त्यांना काहीच त्रास नसतो .एका कोपऱ्यात ह्या बाटल्या उभ्या असतात .."हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम होते .
"पण अशी पाण्याची भीक मागताना तुम्हाला खूप त्रास होत असेल ...."?? बंड्याने विचारले
"नाही हो .. मुंबईत पाणी नुसते वाहते आहे . जिथे जाल तिथे पाणी आहे .फक्त तुमची जमा करण्याची तयारी हवी . आता या बारच्या टॉयलेटमध्ये जा तुम्ही .. हात पुढे केला की पाणी सुरू ...?? तुम्ही हात धुता तोपर्यंत पाणी सुरू किती छान आयडिया पण तुमचे हात धुवून झाले तरी पाणी काहीवेळ सुरूच असते ,त्याचा फोर्स ही मोठा असतो . एकदा मी सहज चेक केले तर अर्धी बाटली भरली म्हणजे जवळजवळ पाचशे मिली  पाणी फुकट जात होते . अर्ध्या तासात आठ जण टॉयलेट ला गेले म्हणजे चार लिटर पाणी फुकट गेले ...त्याने हिशोब सांगितला .
"ह्या....!! इतका हिशोब कोण करतोय ..??आशु मध्येच टपकला.
"बरोबर आहे ..ज्यांना मिळते ते करीत नाहीत. एक वृद्ध माणूस घरोघरी जाऊन एक एक थेंब गळत असलेला नळ दुरुस्त करतो त्याचा हिशोब तुम्ही ठेवता आणि त्याचे कौतुक करता पण आम्ही असे केले की हिशोब कोण ठेवतो असेही म्हणता . लग्नात किंवा एखाद्या सेमिनारमध्ये पाण्याच्या छोट्या बाटल्या किंवा सील कप देतात . पण त्यात रिकामे कप ..रिकाम्या बॉटल किती..?? याचा हिशोब कोणी ठेवतो का ..?? एकदा त्या कॅटरर्सला विचारा तो सांगेल किती पाणी वाया जाते ते . ते सोडून द्या . उद्यापासून तुम्हीच घरातील किती जण पाणी कसे वापरतात किती फुकट घालवततात यावकडे लक्ष द्या . जास्त नाही दोन दिवसाचा सर्व्हे करा .तुम्हालाच कळेल आपण किती पाणी वाया घालवतोय . आम्ही तुमच्या हक्काचे पाणी मागत नाही तर जे वाया घालावीता आहात ते पाणी मागतोय . एकही पैसा खर्च न करता आम्ही गावाला चांगले पाणी देतोय याचा आनंद आहे आम्हाला ." असे बोलून हात जोडून तो  उठला.
बिल देताना शेट्टीला विक्रमने सहजपणे त्या युवकांबद्दल  विचारले .. जाने दो ना विकीभाई पागल लडके है वो... बोलते है हमे पानी की भीक चाहीये . यहा वेस्ट जानेवाला पानी हमे दे दो .. मेरा क्या जाता है .  लेके जाव ,वैसेही मै फेकही देने वाला हूं ..
मी आणि विक्रमने कीव भरल्या नजरेने एकमेकांकडे आणि शेट्टीकडे पाहिले आणि एक नवीन धडा शिकून बारबाहेर पडलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
      दादर मुंबई
8286837133

No comments:

Post a Comment