Monday, July 8, 2019

वारकरी

वारकरी
"या वर्षीच्या वारीचे संपूर्ण कव्हरेज तुला करायचंय..."संपादकसाहेबानी सत्यप्रकाशला ऑर्डर दिली तसा तो मनातून संतापला.
"च्यायला.... त्या गर्दीत ..गावंढळ वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांची बातमी बनवायला मीच बरा सापडलो याना". शेवटी बॉसचा हुकूम मानलाच पाहिजे असे म्हणत त्याने वारीकडे प्रस्थान केले.
सत्यप्रसाद तसा नास्तिक. त्यामुळे देवाविषयी काही लिहिणे त्याला आवडत नसे . प्रयत्न करीत राहणे आणि मनाला जे पटते ते करणे म्हणजेच भक्ती हेच त्यांचे तत्व . त्यामुळे हे वारी,पालखी ,गर्दी महाआरती वैगरे गोष्टीपासून तो दूरच राही.सत्य शोधून लोकांसमोर ठेवायचे या विचारानेच तो पत्रकार बनला होता . पण पत्रकारीतेत अश्या गोष्टी ही येतात हे बहुदा अजून कळायचे बाकी  होते .
रिक्षातून जात असताना त्याला रस्त्याच्याकडेला एक वृद्ध जोडपे बसलेले दिसले .चेहऱ्यावरच्या त्यांच्या सुरकुत्या त्यांनी बरेच काही जीवनात अनुभवले आहे हे दाखवीत होते . म्हाताऱ्याने मळके धोतर ,गुरुशर्ट ,खांद्यावर उपरणे,डोक्यावर पांढरी टोपी तर म्हातारी नऊवारी लुगड्यात  गळ्यात एक काळी पोत हातात चार हिरव्या बांगड्या अश्या अवतारात होते.पेपरमध्ये गुंडाळून आणलेली भाकरी ,शेंगदाण्याची चटणी ,कांदा  अगदी मन लावून खात होते . मध्येच एक भाकरीचा तुकडा कावळ्याला घालत होते .बहुतेक तेही वारीलाच चालले असावेत असे समजून सत्यप्रकाशने त्यांच्या बाजूला रिक्षा उभी केली.
" बाबा .... !! त्याने जोरात हाक मारून त्यांचे लक्ष वेधून घेतले ..वारीला का ....?? दोघांनीही हसून होकारार्थी माना डोलावल्या.
"चला मग माझ्याबरोबर …..एकत्रच जाऊ ...
"त्यापेक्षा तूच आमच्याबरोबर चल की माऊलीचे नामस्मरण करीत.."त्या म्हाताऱ्यानेच हसत त्याला विचारले. मनाशी काही विचार करीत तो खाली उतरला आणि त्यांच्यात जाऊन बसला .तो बसताच आजीने त्याच्यासमोर कागदी डिशमध्ये भाकरी चटणी ठेवली . खाऊन होताच त्याने डिशचा गोळा करून फेकण्यासाठी हात उगारला इतक्यात आजोबांनी त्याला थांबिवले 'अरे पोरा ....आन तो कागद इकडे .त्या कोपऱ्यावर डस्टबीन ठेवले असेल तिकडे फेकू आपण .."असे म्हणून कागद आपल्या पिशवीत ठेवला आणि  माऊली माऊली म्हणत दोघेही चालू लागले.भारावल्यागत तोही त्याच्यामागून चालू लागला.
काही वेळानेच त्यांना लांबवर चालत जाणारे वारकरी दिसू लागले . "बाबा... खरेच हे देव वगैरे असते का हो ....?? इतकी लोक काही सेकंदाच्या दर्शनासाठी इतके लांब चालत येतात ...?? इतका देवावर विश्वास..."?? तो आश्चर्याने म्हणाला.
"अरे देव आहेच कुठे ...??? ही श्रद्धा आहे ... जी प्रत्येकात असते आणि ती वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर पडते . फक्त त्या श्रद्धेला शिस्त असावी इतकीच अपेक्षा असते .या वारीच्या कालावधीत जेव्हढी शिस्तबद्धता... संस्कार ... शिकायला मिळते ते आपल्याला वर्षभर पुरतात .परत पुन्हा वारी आहेच म्हणून एकदा वारीला आलेला परत परत माऊलीचा गजर करीत वारीत येतो. चल आता कळेलच तुला . असे म्हणून त्याच्या खांदयवर हात ठेवून चालू लागले .
त्या वारीत सामील होताच एक नवे चैत्यन सत्यप्रकाशच्या शरीरात खेळू लागले .इतकी प्रचंड गर्दी असूनही सगळे कसे शिस्तबद्ध चालू होते . कुठे गडबड गोंधळ नाही . प्रत्येकाच्या मुखी माऊली माऊलीचा जप . आपल्या परीने जो तो आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करीत होता . नियोजनानुसार अन्न पाण्याचे वाटप . प्रत्येकजण आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत होता . लाखोचा समुदाय निव्वळ एका जपावर कंट्रोल होत होता .
"यात कुठे तुला देव दिसतो का ...?? बघ की असेल कोणतरी काळा कमरेवर हात ठेवून उभा असलेला .. आजोबा हसत हसत म्हणाले.
" देव नसतो असे आताच तुम्ही म्हणालात.."
" पण या सर्वांच्या मनात तर आहे ना ....?? अर्थात नाव वेगवेगळे असेल ...?? प्रकट करायच्या पद्धती वेगळ्या असतील ..आता  पाहिले रिंगण ,दुसरे रिंगण ,पालखी फिरवणे याला आम्ही रिवाज प्रथा म्हणतो तर तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट भाषेत टास्क म्हणतात . असे टास्क खेळल्याने तुमच्यात सकारात्मकता येते . आणि आमच्यात भक्ती श्रद्धा निर्माण होते . तुम्ही रिफ्रेश होण्यासाठी पाच मिनिटे समूहाईक नृत्य करता आम्ही विठूनामाचा जप करीत तल्लीन होऊन नाचतो .हेतू एकाच रिफ्रेश होणे.प्रत्येक धर्माने आपल्या श्रद्धेनुसार देवाला नाव आणि ठिकाण दिलंय. पण खरे स्थान आहे आपल्या मनात आपल्या आचरणात ."काही न बोलता सत्यप्रकाशने मान डोलावली .आणि त्या दोघांसोबत तो माऊली माऊली करीत वारीत सामील झाला . त्यानंतरचे वारीचे दिवस कसे गेले ते त्यालाही कळले नाही . तोही वारीतलाच एक भाग  बनून गेला .
वारी संपली आणि सगळे आपापल्या मार्गाने निघाले . सत्यप्रकाश ही निघाला . त्या आजीआजोबांसोबत तो पहिल्यांदा जिथे भेटला तिथपर्यंत आला.
" आजोबा खूप आनंद झाला. तुमच्यासोबत राहून खूप काही शिकायला मिळाले.बरेचसे गैरसमज दूर झाले .. चला कुठे जायचे आहे ...?? मी सोडतो तुम्हाला घरी.."त्यांचा हात हाती घेऊन म्हणाला. तसा तो वृद्ध हसला "अरे बाळा ...!! त्याची काही गरज नाही. उलट मीच तुला पाहिजे तिथे सोडतो". तोपर्यंत एक पांढरी मर्सिडीज त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली . कडक इस्त्रीचे कपडे घातलेला शोफर त्यातून बाहेर पडला त्या वृद्धाला कडक सॅल्युट मारून कारचा दरवाजा उघडून धरला.
"ही गाडी तुमची आहे ...???? तोंडाचा मोठा आ वासून सत्यप्रकाश ओरडला.
" ही गाडीच नाही तर देशातील काही प्रमुख उद्योग माझ्या मालकीचे आहेत .या देशातील अर्थव्यवस्थेचा छोटासा हिस्सा आहे मी.आता हे विचारू नकोस तरीही तुम्ही वारीला सामान्य वारकऱ्यांसारखे चालत कसे येतात ...?? या प्रश्नांची उत्तरे तुला वारीत मिळाली आहेत .चल बस ...."पाठीवर थाप मारीत त्याला गाडीत ढकलत तो वृद्ध प्रेमाने हसला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment