Sunday, July 21, 2019

तिचे काय चुकतेय ....??

तिचे काय चुकतेय ....??

सिंड्रेलाच्या रिंगटोनने वाजणाऱ्या मोबाइलकडे ती धडधडत्या अंतःकरणाने पाहत होती . मोबाइलवर स्पष्टपणे दिसत होते फोन कोणाचा आहे. तिला फोन करणारी व्यक्ती माहीत होती म्हणून फोन उचलायची हिम्मत होत नव्हती . तरीही शेवटी नाईलाजाने फोन उचलला आणि तो परिचित आवाज तिच्या कानात शिरला.
"आहेस का अजून तू ...?? माझ्या नवऱ्याला नादी लावू नकोस नाहीतर भर रस्त्यात धिंड काढीन तुझी ..?? तुला माझाच नवरा मिळाला का या जगात फिरवायला ...."?? बापरे काय ही भाषा ... ती शहारली.
"आहो पण ......असे  बोलेपर्यंत फोन कट झाला . ती हताशपणे सोफ्यावर मान टेकवून बसली . हळू हळू तिचे मन भूतकाळात गेले.
ती एका सुखवस्तू घरातून लग्न होऊन आलेली . दिसायला सुंदर  आणि उच्च शिक्षणामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसायची . साहित्याची आणि कालाक्षेत्राची आवड.त्यानुसार नवराही उत्तम मिळाला होता . तो ही उच्चशिक्षित ,मोठ्या कंपनीत उच्च पदावर कामाला..देखणा... लग्नानंतर काही वर्षे छान गेली .  त्याचे काम जोरात सुरू होते.अधेमधे परदेशवारी ही व्हायची . तर ती घरच्या जबाबदारीत रमली.दिवस कसे गेले ते कळलेच नाहीत.हळू हळू मुले मोठी झालीत. सासू सासरे वर गेले.तर नवऱ्याचे परदेश दौरे वाढले. जबाबदारी अशी कोणतीच राहिली नव्हती. उलट मुलेच बोलू लागली तू तुझे बघ आता . हल्ली तिचा बराचसा वेळ रिकामाच जात होता . मोबाईलवर खेळ, मैत्रिणीशी चॅटिंग कितीवेळ करणार...???
त्यातच तिला तो भेटला . फेसबुकवर कोणाचातरी मित्र होता त्यावरून हिला रिक्वेस्ट आली आणि हिनेही सहज स्वीकारली . मेसेंजरवरून बोलता बोलता फोन नंबर कधी एक्सचेंज झाले हे कळलेच नाही . तो तिच्यासाठी कधीही अव्हेलेबल होता. मुंबईत नोकरी करत होता .इथे एकटाच राहत होता.बाकी कुटुंब गावाला होते . शनिवार रविवार गावी जात होता .बाकीच्या वेळी रिकामाच होता. घराची जबाबदारी अशी काही नव्हतीच . नोकरी आणि तो.व्हाट्स अपचे चाट हळू हळू वाढत गेले .त्याचे बोलणे तिला आवडू लागले . मुख्य म्हणजे तिला पाहिजे तेव्हा तो तिच्यासाठी हजर होता . मग सहज एकदा कॉफी प्यायला एकत्र भेटले.त्याचे  पुढे पुढे करणे तिला आवडत होते . न कळत आपल्या नवऱ्याच्या स्वभावाशी त्याची तुलना होऊ लागली . तिचा प्रत्येक शब्द झेलायला तो तयार होता . एकदा सहजच म्हणाली मला अमीरखान चे चित्रपट आवडतात तेव्हा आठवणीने तिला त्याच्या नवीन चित्रपटाच्या तिकीट्स घेऊन आला. पहिल्यांदाच एका परपुरषासोबत चित्रपट पाहताना ती थरारून गेली . हे काही चांगले नाही असे एक मन सांगत होते तर दुसरे काय हरकत आहे ?? आनंद तर मिळतोय ना ??? असे समजावत होते . तिच्या वाढदिवसाला आठवणीने रात्री बारा वाजता फोन केला आणि तिच्या आवडीचा परफ्यूम गिफ्ट दिला . किती काळजी आहे याला माझी ..?? हळू हळू ती त्याच्यात गुंतत गेली .
त्याचीही अवस्था तशीच होती. दोन दिवस फक्त कुटुंबाचा सहवास त्याला लाभायचा.त्यातही घरात शिरला की बायको अडचणींचा पाढा वाचायची . अडलेली कामे पूर्ण करताना दिवस कसे संपायचे तेच कळायचे नाही. एक दिवस सहजच तिचा फोटो पाहून रिक्वेस्ट पाठवली आणि तिने स्वीकारली . मग हळू हळू चॅटिंग सुरू केले . ती बराच वेळ ऑनलाईन असायची . त्याच्याकडे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या .त्यामुळे तिच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि प्रॉब्लेमचे उत्तर होते. हळू हळू गोष्टी कॉफी आणि चित्रपटांपर्यंत गेल्या. स्त्रिया खूप लवकर गुंततात हे त्याला पटू लागले . खरेच खूप छान चालू होते त्यांचे . पण अश्या गोष्टी फार काळ लपून राहणार नाहीत .
हल्ली त्याच्या बायकोला काही काही गोष्टी खटकू लागल्या होत्या. त्याचे मोबाईलवर कुजबुजत बोलणे . सतत चॅटिंग . रात्री फारसा जवळही येत नव्हता . स्त्रियांना म्हणे सिक्स सेंथ असतो .तिने भावाची मदत घेतली आणि काही दिवसातच सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. नवऱ्याला बोलून काही उपयोग नाही . तो दूर झाला तर आपलेच नुकसान इतके ओळखण्याइतपात चाणाक्ष होती ती . तिने तिचा फोन नंबर मिळवला आणि ठरावीक दिवसाच्या अंतराने तिला धमकीचे फोन करू लागली .
त्याच्या बायकोचा फोन यायला सुरुवात झाल्यापासून तिचे आयुष्यच बदलून गेले . तिला तो हवाय त्याची मैत्री हवीय . पण तितकाच नवरा ही प्रिय आहे .त्यालाही ती हवीय पण बायकोशी सामना करण्याची त्यांची हिम्मत नाही . आता तो तिला टाळू लागलाय . तिचे आयुष्य मात्र वादळात सापडलंय.काय उपाय आहे तिच्याकडे यावर ....???

© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment