Saturday, March 7, 2020

तिचा महिला दिवस

तिचा महिला दिवस 
आज त्या वस्तीत खूप लगबग सुरू होती.कारणही तसेच होते.वस्तीतील एका चाळीत...दुसऱ्या मजल्यावरील चंदा आज निवृत्त होणार होती.
खरेतर भर जवानीत निवृत्त होणारी चंदा ही पहिलीच स्त्री .एका सेवाभावी संघटनेने खूप प्रयत्न करून अश्या मुलींना या वस्तीतून बाहेर काढण्याचे ठरविले होते.फार कठीण काम होते म्हणा.... ..एखादी तरुणी या वस्तीत आली की तिचे प्रेतच बाहेर पडायचे.
पण यावेळी असे झाले नाही.चंदा ही बाहेर पडणारी पहिली स्त्री ठरणार होती . ती संस्था तिचे लग्न लावून पुढील सर्व संसाराची तजवीज ही करणार होती.हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण वस्ती जमा झाली होती.
 तसाही आज जागतिक महिलादिन होता .यादिवशी एक स्त्री एका जगातून दुसऱ्या चांगल्या जगात प्रवेश करतेय याचा आनंद प्रत्येकाला होत होता.
चंदाही खुश होती. तिचे नशीब थोर की या दलदलीतून लवकर बाहेर पडत होती. तिचा होणारा नवरा तर तिचा नेहमीचा गिऱ्हाईक . आठवड्यातून एकदा यायचा तिच्याकडे .बोलता बोलता बरीच माहिती एकमेकांना शेयर केली . शेवटी एकमेकांच्या कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही.
 तिला इथून सहजासहजी बाहेर पडणे शक्य होणार नाही हे तो जाणून होताच.म्हणून त्याने या सेवाभावी संस्थेची मदत घेतली .त्या संस्थेच्या अथक प्रयत्नाने आज हा सुदिन चंदाच्या आयुष्यात उजाडला होता . आज सर्वांच्या समक्ष त्यांचे लग्न होणार होते आणि ते नव्या आयुष्याला सुरवात करणार होते.
ठरल्याप्रमाणे काही वेळातच दोघांचे लग्न लागले . चाळीतील मालकीणबाईचा आणि संस्थेच्या संचालिका मॅडमचा निरोप घेऊन ते बाहेर पडले . 
तासाभरात त्यांची टॅक्सी एका देखण्या इमारतीसमोर थांबली.आपले नवीन घर याच इमारतीत आहे पाहून चंदा मनोमन खुश झाली .सहाव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता . दोन बेडरूम हॉल किचन .. हरखून जात ती संपूर्ण घर फिरली . तो भान हरपून तिच्याकडे पाहत होता .  त्याच्याकडे लक्ष जाताच ती लाजली आणि धावत येऊन त्याच्या कुशीत शिरली .भर दुपारीच त्या फ्लॅटमध्ये मधुचंद्र साजरा झाला .प्रणयाच्या नव्या धुंदीत ती कधी झोपली ते तिलाच कळले नाही.
जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती . तो खुर्चीवर बसून एकटक तिच्याकडे पाहत होता.
" चल तयारी कर लवकर..पाहुणे येणार आहेत.फार नटू नकोस हलका मेकअप पुरे ...."तो हसत म्हणाला.
 तशी ती हसली.
हो.... तयार हो... म्हणजे भडक मेकअप करून खिडकीजवळ उभे राहणे हेच तिला माहीत. दुसरे काय जमत होते तिला.ती चेहऱ्यावर हलकी पावडर आणि लिपस्टिक लावून तयार झाली . थोड्याश्या मेकअपमध्येही ती सुंदर दिसत होती.
इतक्यात बेल वाजली.नवऱ्याने दार उघडले तेव्हा एक माणूस आत आला . चेहऱ्यावरून अतिशय सभ्य आणि मोठ्या पदावर असणारा वाटत होता. नवऱ्याने ही माझी पत्नी अशी ओळख करून दिली आणि बेडरूमकडे इशारा केला.तो बेडरूममध्ये गेला आणि ही हादरली .
"हे काय ....."?? तिने चिडून विचारले 
"तुझे प्रमोशन ...महिलादिनानिमित्त ...." तो छद्मीपणे म्हणाला.
"पण आपण सुखाने संसार करणार होतो...हे सगळे सोडून देणार होतो ...." तिने हताशपणे विचारले.
"संसार सुखाचा करणारच आहोत...पण उपजीविकेसाठी हे करावेच  लागेल तुला आणि यातून येणारा पैसा आपणच वापरणार आहोत.आजपासून तुझे खिडकीत उभे राहून गिऱ्हाईक बोलविण्याचे दिवस संपले . आता मोजकीच ..उत्तम.. स्वच्छ गिऱ्हाईक तुझ्याकडे येणार . महिन्यातील काही दिवसच काम करावे लागेल तुला.दर महिना मेडिकल चेकअप होईल. जिममध्ये जावे लागेल . भरमसाठ पैसा मिळेल . बाहेर ताठ मानेने वावरू शकशील . आता तुझा उच्चभ्रू वर्गात प्रवेश झालाय..मग हे प्रमोशनच नाही का ...."?? त्याने थंडपणे विचारले.
"मी निघून जाईन ...सगळ्यांना सांगेन ... "ती ओरडली.
"जा.. पण नंतर काय करणार ....??? त्या खिडकीत पुन्हा भडक चेहरा करून  उभी राहणार ..?? गुटका खाणाऱ्या ..दारू पिणाऱ्याना अंगावर घेणार ...आणि एक दिवस रोगाने मरणार... जा.. यातच आनंद मिळत असेल तर नक्की जा.... मी दुसरी शोधेन ... आणि हो त्या संस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करू नकोस .त्यांना त्यांचा हिस्सा पोचला आहे ... असे बोलून तो दुसऱ्या बेडरूममध्ये निघून गेला.
ती हताश होऊन त्या बंद दरवाजाकडे पाहत बसली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment