Sunday, March 8, 2020

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
प्रसाद उकेचा फोन आला आणि मी उडालोच.हा संसारी नवरा मला का फोन करतोय अचानक ...??
" भाऊ  फ्री आहेस का आता....??
 तसाही रविवार असल्यामुळे मी फ्री होतोच.मी हो म्हटले.
मग बसूया का ..?? विक्रमला बोलव.. 
त्याने आज मला धक्केच द्यायचे ठरविले होते.
सौने खुणा करून कोण...?? विचारले..मी फोनवर हात ठेवून प्रसाद सांगितले .मग त्याला म्हटले ठीक आहे नटराजला भेटू आणि फोन ठेवला .
"प्रसाद भाऊजी का ...?? आज बऱ्याच महिन्यांनी तुमची आठवण काढली ...?? ते ही महिलादिनी..?? घरची कामे करून कंटाळले असतील ....?? आता कळले असेल बायकांना किती त्रास असतो संसाराचा गाडा ओढताना ...."?? तिने तोंडाचा पट्टा सुरू केला .
"आम्ही बाहेर जाणार आहोत .. जेवायला नाहीय मी ....."शांतपणे तिला सांगितले .
"बाहेर जाण्याची गरज नाहीय ...इथेच काय तो धिंगाणा घाला..प्रसाद आणि विक्रम भाऊजीना इथेच बोलवा आणि सोबत बंड्याला ही घ्या...."तीने हुकूम सोडला 
"आयला हे काय .."?? यावर्षीचा महिलादिन मला इतका फायद्याचा पडेल वाटले नव्हते .
"अग नको.. कशाला तुला त्रास...?? आम्ही बाहेर जाऊ ...."मी साळसूदपणे म्हणालो.
"बाहेर तुम्ही नाही... तर आम्ही चाललोय आज.ते ही महिलादिनाचे निमित्त काढून. मी.. वनिता..बंड्याची आई आणि अजून दोघी .कुठेतरी सेल लागला असेल त्यातून काही खरेदी करू आणि मग तुमच्याच नटराजमध्ये जेवायला जाऊ . आमचे टेबल राखून ठेवले आहे त्याने. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट ही देणार आहे तुमचा शेट्टी.. आणि प्रसाद भाऊजी इथे आले की त्यांच्याकडून भेंडीच्या दोन तीन रेसिपी शिकून घेते मी . मेली भेंडी नेहमीच बुळबुळीत राहतात.ते काहीतरी टिप्स देतील...."सौ ठसक्यात म्हणाली .
फारच प्लॅनिंग झालेले दिसतेय.मी मनात म्हणालो. ह्याच्या मागे कोणाचे डोके आहे ते शोधून काढले पाहिजे.असा निश्चय करून मी विक्रमला फोन लावला  आता तो नक्की माझ्या फोनची वाट पाहत असणार याची खात्री होती मला.
अरे हो.....तुम्हाला प्रसाद उकेबद्दल सांगायचे राहिलेच . प्रसाद आमचा वर्ग मित्र . लहानपणापासून थोडा संथ भित्रा आणि आळशी .पण आमच्याशी फार जमायचे. कदाचित विक्रमने पाठबळ म्हणून असेल . लग्न झाल्यावर तो संसारी नवरा बनला . म्हणजे त्याची बायको कामाला जाते आणि हा घरची कामे करतो. मुलाला जन्म सोडल्यास बाकी सर्व कामे तोच करतो .त्याची बायको घरातील कर्ता पुरुष आहे आणि हा संसारी नवरा ..
मी फोन करून प्रसाद आणि विक्रमला घरीच बोलावले .बायको काही छोटी मोठी खरेदी करायला खाली गेली होती आणि मी घरात आमची तयारी करत होतो. 
बेल वाजली म्हणून दार उघडले तर दारात प्रसाद दळणाची पिशवी घेऊन उभा .. पाठीमागे सौ. पदर तोंडावर ठेवून हसत उभी. 
"अरे प्रसाद ....दळण घरी ठेवून यायचे ना ...?? जाताना विसरलास तर ...."?? मी सहज म्हणालो.
"ए भाऊ...हे दळण तुमचेच आहे ..च्यायला स्वतःची पिशवी ही ओळखता येत नाही ..काय करता रे तुम्ही ...?? सगळे वाहिनीवर टाकून मोकळे .रस्त्यात भेटल्या वहिनी.चक्कीवरून येत होत्या . मी घेतली पिशवी आणि घेऊन आलो " ....पिशवी स्वयंपाकघरात ठेवत प्रसाद म्हणाला .
"बरे झालात हो तुम्ही भेटलात..तुम्हालाच कळतात आम्हा बायकांचे कष्ट. बरे ते जाऊ दे .. मला भेंडीची भाजी कशी करायची ते सांगा..." सौ. ने आपले काम सुरू केले .
"सोपी असते हो वहिनी .. अशी सुरवात करून प्रसाद आपल्या आवडत्या कामात रंगून गेला . 
पाचच मिनिटात विक्रम दरवाजात हजर झाला.प्रसाद भाई अशी हाक मारून तो घरात घुसला.
"वहिनी.... वनिता ला घेऊन आलोय ती बंड्याकडे बसलीय . लवकर निघा आणि आरामात या ..विक्रमने ऑर्डर सोडली.
तशी सौ."अग बाई....!! आली का वनिता ...?? आता निघायला पाहिजे.."असे म्हणत बाहेर पडली.
"काय रे प्रसाद ....आज तुला वेळ कसा ...?? वहिनी महिलादिन साजरा करायला गेल्या का ..?? ग्लास टेबलवर ठेवीत विक्रम म्हणाला 
"हो रे... ती महिलादिन साजरा करणार. पण तो घरीच.ती आज मुलासोबत राहणार .जेवण बनविणार...कपडे धुणार ..साफसफाई देखील करणार... .काही मैत्रिणीना घरी बोलावून जेवायला घालणार ... हे करताना माझी अडचण नको म्हणून बाहेर पाठविले मला...म्हणाली आज तू तुझी मजा कर...च्यायला मला काही सुचेनाच..अशी कधी सवय नाही ना ...?? मग तुमची आठवण झाली . म्हटले तसाही रविवार आलाय.. तुम्ही असलाच घरी . तिला सांगून आलोय तुमच्या बरोबर आहे . तशी ओके म्हणाली".
"म्हणजे महिलादिनी तुझी मजा आहे तर ...?? आमच्या बायका रोज काम करून आज सुट्टी घेतात आणि तुझी बायको रोज तू घराची कामे करतोस म्हणून तुला सुट्टी देऊन स्वतः घर आवरतेय ...." मी हसत म्हणालो.
"काही चुकत नाही रे भाऊ त्यांचे ... रोजच्या त्याच त्याच कामापासून एक दिवस विरंगुळा म्हणून काही वेगळे का करू नये त्यांनी ...?? त्यांचाही हक्क आहे ना ....?? माझी बायको सकाळी जाते ते रात्री येण्याची वेळ नसते . संशोधनात इतकी अडकलेली असते की घरची काळजी नसते.पण कधी कधी वाटते ना स्वयंपाक बनवावा .मुलांशी खेळावे म्हणून हे असले निमित्त आणि आजचा दिवस त्यांचा आहे . त्यामुळे त्या म्हणतील ती पूर्व दिशा मानून आपण ही त्यांना साथ दिली पाहिजे ..."हातातील ग्लास उंचावून प्रसाद म्हणाला .
"अगदी खरे ...म्हणूनच मी नटराजला फोन करून काही टेबले राखून ठेवायला सांगितली होती . वनिताला म्हटले तिथेच जेवून या शेट्टी आपलाच माणूस आहे ...." विक्रम चणे तोंडात टाकीत म्हणाला .
"आणि पन्नास टक्के सूट ही देणार आहे म्हणे बिलात.." मी कौतुकाने म्हणालो.
"तो कसली सूट देतो रे .... पक्का व्यावसायिक आहे तो....मीच म्हटले बिलात पन्नास टक्के कमी कर ते मी नंतर देईन. अशी सूट कोणी देत असेल तरच आपल्या बायका जातील तिथे ....नाहीतर आज जेवण आपल्याला बनवावे लागले असते ...." विक्रम हसत म्हणाला .
"आयला हे बाकी खरे .. मलाही सौ विचारत होती . सेल कुठे चालू आहेत .....??दोन तीन ठिकाणे सांगितली तिला ... "मी हसून म्हटले 
"ए भाऊ.... मलाही सांग ना कुठे आहेत सेल.. ??उद्या जाईन म्हणतो ...प्रसादने पटकन विचारले आणि विक्रमने कपाळावर हात मारला .
"तू गप पी रे ... आजतरी हे सर्व विसर .. आज एन्जॉय करू संध्याकाळी आरामात घरी जा.... "मी प्रसादला म्हटले .
"नाही हा भाऊ .... बायकोने सांगितले आहे संध्याकाळी लवकर घरी ये . माझ्या आवडीचे जेवण बनविणार आहे ती ...".प्रसाद लाजत म्हणाला .
"च्यायला... किती वर्षानी बायकोच्या हातचे जेवणार रे तू...."???. मी त्याच्या पाठीवर थाप मारून विचारले.
इतक्यात माझा फोन वाजला. समोरून सौ. होती "आहो जास्त पीत बसू नका आणि लवकर आटपा. आज संध्याकाळी काहीतरी स्पेशल करते तुमच्यासाठी ..."तिने समोरून म्हटले .
"अग कशाला ....??आपण बाहेर जाऊ आज "मी जरा जोरातच म्हटले .
"काही गरज नाही सकाळ संध्याकाळ बाहेर खायची. तुमच्या बायकोला चांगला स्वयंपाक येतो म्हटलं. उगाचंच खर्च कशाला..??तिने माझ्यापेक्षाही जोरात आवाज काढला. मी फोन बंद केला आणि दोघांकडे पाहिले. दोघेही माझ्याकडे पाहून हसत होते .
शेवटी काही म्हणा स्त्री ती स्त्रीच ... आपल्या माणसांची काळजी घेणारच....
महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment