Sunday, March 15, 2020

गाऱ्हाणे

गाऱ्हाणे
त्या गावाबाहेरच्या देवळात तिची जोरदार तयारी चालू होती .आजूबाजूचे देव तिच्याकडे कौतुकाने पाहत होते . कारण ही तसेच होते. गावात होळी उत्साहाने साजरी झाली होती आणि आता गावकरी पालखीतून वाजत गाजत नाचवत  तिला आपल्या घरी घेऊन जाणार होते .आजूबाजूच्या देवांच्या कौतुकाच्या नजरा झेलत ती दुसऱ्या दिवशीची  निघायची तयारी करत होती .
खरे तर हेच काही दिवस असतात जेव्हा ती गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन खणानारळाची ओटी भरून घेत होती . त्यांच्या आदरातिथ्याने खुश होऊन त्यांच्या सर्व  मागण्या पूर्ण करीत होती . त्यांचा उत्साह पाहून मनोमन खुश होत होती . बाकीच्या वेळेस सर्व तिच्या पायाशी येऊन आपल्या मागण्या मांडत होते .म्हणूनच या दिवसाची ती खूप वाट पहायची .
सकाळी तिला जाग आली ती ढोल ताश्याच्या आवाजानेच. मानकरी खांद्यावर पालखी घेऊन तिच्या गाभाऱ्यात शिरले . पाया पडून जयजयकार करीत तिला अलगद उचलून पालखीत ठेवले आणि नाचवीत गावात घेऊन आले . ती आनंदाने आपल्या भक्तांच्या घरी जाण्यास तयार झाली .
पाहिले घर तर दत्तू नाईकचे . नेहमीच बंद असते पण पालखीला मात्र नाईक कुटुंबीय जेथे असतील तिथून गावात येतात . दरवर्षी.. आमच्यावर लक्ष राहू दे . सर्वांना सुखासमाधानाने ठेव ...सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे असेच  गाऱ्हाणे घालतात . साडी भारीतली असते. नंतरच्या लिलावात चांगली किंमत मिळते म्हणा. 
"अरे वा... !! आजगावकरांची मुलगी आणि जावईही आलेत या वर्षी... हो मागाच्यावर्षी नवस केला होता ना ..मुलीचे लग्न होऊ दे ,चांगल्या घरात जाऊ दे .. मी हो म्हटले ... गावातील शाळेत पंखे देणार आहेम्हणे ... बघू नवस फेडतात का ...?? 
हे काय ....?? बाकी सर्व नेहमीचेच .. तो जाधवांचा अश्विन अजूनही सुधारलेला दिसत नाही .काय नाचतय....किती रंग फासलेत चेहऱ्यावर ...??  जाधव काही लक्ष देत नाही पोराकडे.. माझ्याकडे बोलले तर काहीतरी करेन मी .... पण जाधव मानी माणूस .. पाया पडेल ओटी भरेल पण मागणार काही नाही . मला वाटते खूप काही करावे पण हा मागतच नाही . असे भक्त दुर्मिळ झालेत म्हणा.
आले  शेवटी आबा तोंडवळकरच्या दारात.... ह्या माणसाने काय कमी केलेय का माझ्यासाठी...??  ह्याच्या घरी आले की माहेरी आल्यासारखे वाटते . जवानीत ह्या माणसाने गाव गाजविले होते . स्वातंत्र्यलढ्यातील ह्याचे योगदान मला माहित आहे . माझ्याच गाभाऱ्यातील भुयारात किती वेळा लपला असेल . इंग्रजांचा खजिना ही तिथेच लपवून ठेवायचा . माझ्यावर भारी भक्ती हो . देश स्वतंत्र झाल्यावर सर्व खजिना गावाच्या सुधारणेसाठी वापरला. माझे मंदिर नवीन बनविले. दरवर्षी गावकरी त्याच्या दीर्घायुष्यासाठी माझ्याकडे नवस बोलतात. याच्या दारात पाहुणचारासाठी येणे म्हणजे वेगळाच आनंद असतो . आबा ... आले रे मी .. तिने साद घातली.
घरातून चार माणसांनी आबाला खुर्चीत बसवून बाहेर आणला ते पाहून ती हादरली .  एकेकाळी हट्टाकट्टा जोरबैठका काढून शरीर कामावणाऱ्या आबाची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण दिसत नव्हती की हात नमस्कारासाठी उठत नव्हते . आतापर्यंत कोणत्याही आजारासाठी दवाखान्यात पाऊल न ठेवणाऱ्या आबाचे शरीर दुबळे होत चालले होते . बाजूच्या माणसाने आबानू पालखी इली दारात.. असे म्हणत त्यांना हलविले.
 एक अनामिक शक्ती अंगात घेऊन आबा दोघांचा आधार घेत उठला. आपल्या थरथरत्या हाताने देवीला नमस्कार केला." गो बाय....आता लवकर सोडव यातून.पुढच्या वर्षी तुका पाया पडायची पाळी येऊ दे नको.... हे ऐकून ती पालखीतून उठली अश्रू ढाळीत आबांच्या समोर गेली . त्याला मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवत म्हणाली भोग आहेत रे आबा .. कोणालाच चुकले नाहीत. हे तुझे गाऱ्हाणे मी ही पुरे करू शकत नाही .
आज  कोणीतरी पहिल्यांदाच आयुष्य संपवावे म्हणून तिच्याकडे गाऱ्हाणे घातले होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment