Friday, March 27, 2020

शो मस्ट गो ऑन

शो मस्ट गो ऑन
"अहो ....घरात फक्त दोन दिवसाचे सामान शिल्लक आहे.काही वस्तू आजच आणाव्या लागतील ..."तिने कोपऱ्यात टेबलावर बसून मोबाईल बघणाऱ्या  नवऱ्याला सांगितले.
ते ऐकून बेडवर बसलेला त्याचा म्हातारा बाप ..खाली बसून टीव्ही बघणारी त्याची दोन मुले... यांनी एकदम त्याच्याकडे पाहिले.
खरेतर तिच्याकडेही पर्याय नव्हता.त्या दहा बाय दहाच्या खोलीत जे काही बोलले जाईल ते सर्वानाच ऐकू येत होते.
ह्या कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच घरात होते.तो रंगभूमीवरील छोटा कलाकार.बापामुळेच हा वारसा त्याच्याकडे आलेला. बापाने आयुष्यभर नाटकेच केली. पैसा कधी कमावलाच नाही . प्रसिद्धी भरपूर मिळाली पण हातात काहीच नाही. ह्याला रंगभूमीपासून दूर ठेवायचा खूप प्रयत्न केला त्याने . पण म्हणतात ना...हे गुण रक्तातच असतात .कॉलेजची पायरी चढला आणि आय एन टी.... पुरुषोत्तम करंडक.. अंगात भिनले . काहींनी त्याच्या गुणांचा छान वापर केला तर काहींनी नुसता राबवला . आपलं पोरग आपल्याच मार्गाने जाणार याची खात्री बापाला पटली आणि त्याने समजावणे सोडून दिले.
पुढे त्याला कमी जास्त प्रमाणात कामे मिळत गेली . रंगभूमी म्हणजे त्याचा जीव की प्राण . एकवेळ मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडणार नाही पण त्याच्या बाजूला असलेल्या नाट्यगृहात जाऊन पडद्याला पाया पडेल . नाटकांमुळे काही सिरीयल ही नाकारल्या त्याने.
बाप सतत कानीकपाळी ओरडून सांगायचा.." अरे सिरीयल आधी ...मग नाटके कर ...तरच  चार पैसे जास्त कमावशील...
हा बापाकडे थंडपणे पाहून म्हणायचं "मग तुम्ही का नाही कमावले .....??
 पण आज गेले काही दिवस सर्व काही बंद होते .ना नाटके ना सिरीयल ....ह्याच्या खिशातील पैसा ही संपत आला होता . म्हाताऱ्याची पेन्शन ही येणार नाही या महिन्यात बहुतेक आणि तसेही ब वर्गातील कलाकाराला किती पेन्शन असणार म्हणा..... 
काही मोठ्या कलाकारांना फोन केला तर देतील पैसे. पण किती दिवस मागणार ..तसेही असे पैसे कधी मगितलेच नाही म्हणा ..च्यायला बापाचे सर्वच गुण कसे अंगात उतरले आपल्या .... त्याने स्वतःशीच विचार केला आणि चेहऱ्यावर हास्य उमटले .
"काय रे... किती दिवस शो बंद राहणार ...."??  त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बापाने विचारले .
"हो ना ... काहीतरी करायला हवे हो ...?? बायकोने चहाचे पेले सर्वांपुढे फिरवले.
"आई माझे दूध ...."?? मुलगी ओरडली. 
"गप ग ... थोडे दिवस थांब.. उद्यासाठी एक पिशवी ठेवलीय ... तुझा बाप मोठा नटसम्राट ... सांग त्याला आणायला . बाहेर पडला तर सर्व धावत येतील ...इथे आयुष्याची नाटके झालीत....आणि तुला दूध हवेय......" तिने सर्व राग पोरीवर काढला .तो आणि म्हातारा काही न बोलता चहा पिऊ लागले .
"पप्पा..... तुम्हाला व्हाट्स अप आलाय बघा. जागतिक रंगभूमीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...  आज काय आहे ." त्याचा छोटा मुलगा मोबाईल पाहून ओरडला .
"अरे ....आज 27 मार्च नाही का ....?? जागतिक रंगभूमी दिन ....म्हातारा ओरडला .."एकेकाळी या दिवशी चार चार शो करायचो आम्ही . काय दिवस होते ते .. शेक्सपिअर.. बर्नाड शॉ.. त्यात्यासाहेब शिरवाडकर ,गडकरी, देवल..खाडीलकरांचे स्मरण करायचो .सगळे शो हाऊसफुल्ल ..." म्हातारा जुन्या आठवणीत रमला.
"हो ना....अजूनही या दिवशी त्यांची आठवण काढली जाते . मागच्या वर्षीपर्यंत आजचा दिवस रंगभूमीवर साजरा करत होतो आम्ही . पण या वर्षी देशात काय पण परदेशातही साजरा होणार नाही .आजच्या दिवशी प्रयोग नाही ही किती दुर्दवाची गोष्ट आहे ..."तो डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला .
"प्रयोग नाही ....?? का प्रयोग नाही ....?? आजही प्रयोग होईल.. पण रंगमंच असेल हे आपले घर .. प्रेक्षक ही आहेत ... ही आपली मुले तुझी बायको .... फार काय तर या शोची नाईट मिळणार नाही ना ...?? पण आपण हाडाचे कलाकार आहोत.नाईटशिवाय केवळ दोन प्रेक्षकांसमोर ही प्रयोग केलेत आपण ...  चल हो तयार मी आप्पासाहेब बेलवलकर बनून नटसम्राटची स्वगत म्हणतो ,तू लक्ष्मणराव देशपांड्यांचे व्हराड निघालय कर .... आपल्या ह्या प्रेक्षकांच्या टाळ्याच आपली नाईट .. लक्षात ठेव शो मस्ट गो ऑन...." म्हातारा आवेशात बोलला. 
तसा तो ही भारावून उठला "हो...आपण कलाकार आहोत. मराठी रंगभूमीचे सुपुत्र ...आज शो होणारच .. भले स्टेज कोणतेही असो .समोर कितीही प्रेक्षक असो "
ताबडतोब बेड फोल्ड करून ठेवला गेला आणि सुरू झाला  बाप बेट्यांचा जागतिक रंगभूमीच्या निमित्ताने एक अविस्मरणीय प्रयोग . ज्यात प्रेक्षक होते त्याची बायको आणि दोन मुले . 
दुसऱ्या दिवशी त्याला मोबाईलच्या रिंगने जाग आली . समोरून त्याच्या नाटकातील एक प्रसिद्ध कलाकार बोलत होता . 
"अरे यार ...मानलं तुम्हा बाप बेट्यांना .. काल घरीच शो केलात . रंगभूमीचे नाव राखले तुम्ही ... तुझ्या मुलाने तुमचा विडिओ पाठवला मला . तुझे वडील आजही खूप सुंदर काम करतात . अरे त्यात्यासाहेबांची स्वगते यावयात बोलणे खायचे काम नाही . मी हा व्हिडिओ  यु ट्यूब वर टाकतोय आणि ह्या शो च्या तिकिटाचे पैसे ही पाठवतोय तुला .  जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना पैसे देण्याचे आवाहन करणार . तुमची नाईट तुम्हाला मिळालीच पाहिजे ... मानलं तुम्हाला ..... शो मस्ट गो ऑन...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment