Tuesday, March 24, 2020

शिकारी

शिकारी 
कोकणात जाणाऱ्या एसटीत तो चढला तेव्हा ती जवळजवळ रिकामीच होती .शहरात काय तर देशातही कर्फ्यु लागला होता. 
पण तो शिकारी होता. जातिवंत हाडाचा शिकारी... नेहमी त्याची नजर शिकार शोधतत फिरायची.कोणी ना कोणी भेटतेच याची त्याला खात्री होती.
नुसता हात लावायचा अवकाश... शिकार अलगद त्याच्या तोंडात जाणार होती.
पण हल्ली त्याला भक्ष्य सहजासहजी मिळत नव्हते .काही वेळातर भुकेने प्राण कंठाशी येत होते . शहरातील सर्व आता हुशार झाले होते ..सावध झाले होते.ते प्रतिकार करत होते.शिकारीला जवळपास भटकू देत नव्हते . त्याच्या कमजोर बाजू त्यांना माहीत होत्या . ते त्याचा उपयोग करून त्याला दूर ठेवीत होते. शेवटी नाईलाजाने तो गावात शिरला.
एसटी डेपोत पूर्ण सन्नाटा होता . आता मात्र त्याची ताकद संपायला आली होती.त्याला फक्त शिकार हवी होती.
फिरता फिरता तो एका शेतात शिरला .शेतात सुदाम सुर्वे  एकटाच काम करीत होता .नवीन शिकार टप्प्यात येताच तो खुश झाला .तो सुदामच्या जवळ गेला . हात पुढे करून म्हणाला.." हाय... !! मी येथे नवीनच आहे .   पियाला पाणी मिळेल का ..."?? सुदाम नुसता हसला . त्याने हातातील फावडे खाली ठेवून त्याला नमस्कार केला "मी सुदाम सुर्वे .. ह्या जमिनीचो मालक ... पाव्हन तुम्ही खयसून इलाव.. त्याने प्रेमळ स्वरात विचारले.
"मी परदेशातून आलोय ..पाणी मिळेल का ..."??  त्याने हसत विचारले.
" व्हय...व्हय.. थांबा वाईच.." तो कोपऱ्यात ठेवलेल्या हंड्याकडे  धावत गेला' घ्या .." असे बोलून हंडा त्याच्या समोर धरला ." हय हाताच्या ओंजळीनेच पाणी पिवूचा .. पेलो नाय वापरत आम्ही .."
नाईलाजाने त्याने हाताची ओंजळ पुढे केली . थंडगार पाण्याने त्याला बरे वाटले पण डोक्यावरील उन्हाने तो कासावीस झाला होता.
"पावन्यानो आता घरी चला आणि जेवनच पुढे जावा..." सुदाम त्याच्याकडे पाहत हसत म्हणाला.
 खुश होऊन तो त्याला मिठी मारायला गेला."नको.. नको.... पाव्हन तुमंच कापड खराब होतील .. "असे म्हणत सुदाम लांब झाला .आता मात्र त्याची अस्वस्थता वाढू लागली.लवकर शिकार मिळाली नाही तर मात्र आपण संपणार हे तो समजून चुकला. समोर शिकार आहे पण त्याला साधा स्पर्श करू शकत नाही ही  बोच त्याला होतीच . आता ह्याच्या घरी तरी कोणीतरी मिळेलच या आशेवर तो त्याच्याबरोबर निघाला.
दारात येताच  सुदामने त्याला थांबविले . एक थंड पाण्याची बादली त्याने त्याच्या पायावर ओतली.
"बसा ...मी आंघोळ करून येतो ...."
साला सगळी मेहनत पाण्यात गेली . ह्याने आंघोळ केली आता परत जाळे विणावे लागेल .नाहीतर घरात कोणीतरी दुसरी व्यक्ती असेलच..
तो अवस्थ होऊन ओट्यावर बसला . घरात कोणी दिसत नव्हते . इतक्यात एक स्त्री बाहेर आली . लांबूनच तिने त्याला हात जोडले. मग कोपऱ्यातील चूल पेटवली . तो पर्यंत सुदामने जेवणाची भांडी बाहेर आणून ठेवली.
"पाव्हन... काय काळजी करू नका .आता गरम गरम जेवनच बाहेर पडा...' सुदाम त्याला म्हणाला.
गरम जेवण त्याची तगमग वाढू लागली.मला माझे खाद्य हवेय.तो तडफडला. सर्व जेवण गरम झाल्यावर ते दोघेही जेवायला बसले .ते गरम जेवण जेवताना त्याचा जीव कासावीस होत होता. जेवण संपताच त्याची ताटे बाहेरच ठेवली गेली . मग सुदामच्या बायकोने गरम पाण्याने ती ताटे स्वच्छ घासली . आता मात्र त्याच्या शरीरात विचित्र संवेदना जाणवू लागली . जवळजवळ बारा तास तो एकटाच फिरत होता . एकही शिकार त्याला मिळाली नाही . त्याचा मृत्यू जवळ येऊ लागला होता . सुदामने हात जोडून त्याला निरोप दिला . काही न बोलता तो बाहेर पडला आणि काही अंतर जाताच कोसळून पडला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment