Sunday, March 22, 2020

संचारबंदी

संचारबंदी
आज त्या वडाच्या मोठ्या झाडावर गडबड उडाली होती .नेहमीप्रमाणे नोकर कावळ्यांची घाई चालली होती. मेलेल्या पाली.. झुरळी..,कोळणीकडून चोरलेले मासे.. जिवंत अळ्या सर्व वेगवेगळ्या पानात ठेवले होते .तर आजूबाजूच्या झाडांवर चांभार चौकश्या करणारे कावळे उत्सुकतेने बसले होते.
अर्थात आज अखिल भारतीय कावळे संघटनेची सभा भरणार होती हे निश्चित होते. देशातील विविध राज्यातून कावळ्याचे प्रतिनिधी येण्यास सुरुवात झाली होती.. अखिल भारतीय कावळा संघटनेचे अध्यक्ष का.ळा. काक कोणत्याही क्षणी हजर होणार होते . 
अचानक बाहेरचा कोलाहल वाढला आणि का. ळा. काक ..कावकाव करीत हजर झाले . त्यांच्या ओरडण्यावरूनच आज कोणतातरी महत्वाचा विषय आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले . पण आज कोणीही शिव्या खाणार नाही किंवा कोणाला शिक्षा मिळणार नाही हे ही कळून चुकले .
"सर्वांचे काव काव स्वागत.." त्यांनी तोंडात सिगारेट पेटवून सुरवात केली. रस्त्यावर  पडलेली सिगारेट होती ती .काक याना सिगारेटचे व्यसन होते . 
"आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत..."काक बोलू लागले . "तुम्हाला माहीतच आहे संपूर्ण जगभरात मानवजातीवर एक संकट आले आहे . कोरोना नावाच्या विषाणूने  जगभरात थैमान घातले आहे . लोक घराबाहेर पडत नाहीत . कामे बंद आहेत . दळणवळण बंद आहेत.लोकांनी घरात कोंडून घेतले आहे .."
"होय खरे आहे .. दशक्रियेला स्मशानात गर्दी नाहीय . एका पिंडासाठी चारच माणसे येतायत .."स्मशानातील कावळ्यांचा प्रतिनिधी म्हणाला.
"हो.. मार्केटमध्ये मासे घ्यायला ही पूर्वीसारखी गर्दी नसते..." मार्केट प्रतिनिधी म्हणाला
"दुकाने बंद झालीत..रस्त्यावर गर्दी नाही .." रस्त्यावरील कावळ्यांचा प्रतिनिधी म्हणाला.
म्हणजे पुढील महिन्यात बदलीचे अर्ज भरपूर येणार तर... काकसाहेब मनोमन खुश झाले .
" म्हणूनच आपण सर्वांनी मानवाच्या मदतीला जायचे ठरविले आहे .मानव सुरवातीपासूनच आपले मित्र आहेत . ते जरी आपल्यापासून दूर राहतात आपल्याला स्पर्श करायला टाळतात तरीही आपल्याला मान देतात. काहीजण रोज खिडकीवर आपल्यासाठी जेवण ठेवतात .ते आपल्याला त्यांचे वंशज मानतात. माणूस मेला की आपली किंमत त्यांना कळते. मग आता ते संकटात आहेत तर आपण त्यांना त्यातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे... त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करू .. बोला तयार आहात का ...."?? असे म्हणून जोरात काव काव केले. त्यावर सर्व प्रतिनिधींनी त्यांना काव काव करून पाठिंबा दिला.
"पण आपण नक्की काय करायचे ..."?? एकाने  पानावरील जिवंत अळीकडे आशाळभूतपणे पाहत विचारले.
 "जे कावळे रोज मानवाच्या संपर्कात येतात त्यांनी ते टाळावे . त्यांच्या खिडकीत..गच्चीवर.. जाऊ नये . तुमच्या पायाला ,पंखाला लागलेले विषाणू त्यांच्या घरात जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी. तुमची चोच त्यांचे हात पोचतील अश्या ठिकाणी घासून साफ करू नका . मार्केटमध्ये जे जातात त्यांनी कोळीणींच्या टोपलीत आपली चोच घालून मासे पळवू नये . भविष्यात त्यांना अन्न धान्ये मासे आणि इतर जीवन उपयोगी वस्तूंचा तुटवडा पडू शकतो त्यात आपण भर टाकूया नको. रस्त्यावर फिरणार्यांनी मानवाची थुंकी आणि इतर गोष्टी साफ कराव्या त्यांनी इतर कावळ्यांच्या संपर्कात जाऊ नये . स्मशानातील कावळ्यांनी पिंडाला ताबडतोब चोच मारून आलेल्यानं ताबडतोब मोकळे करावे . पिंडात जे आहे ते त्यांनी खावे . उगाच रुसून बसायचे नाटक करू नये . जे कोणी माझ्या सुचनेसार वागेल तर भिविष्यात त्यांची चांगल्या ठिकाणी बदली करू ... कोणाला काही शंका असल्यास विचारा....."?? असे बोलून काकसाहेब शांत बसले . इतर प्रतिनिधींनी काव काव करून त्यांना पाठिंबा दिला आणि आपापल्या विभागात बातमी द्यायला उडाले .
तिथे अप्पा मानकरच्या खिडकीत नेहमीप्रमाणे छोट्या वाटीत जेवण ठेवून शोभा वहिनी कावळ्यांची वाट पाहत होत्या .." काय गो....?? तुझो आजा आज काय येवुचो दिसत नाय ... त्यास पण कोरोनाची भीती वाटता काय ...?? काय पण म्हणा पण अप्पाक लय काळजी हो आपली . आपल्याक त्रास होऊ नये म्हणून खिडकीत येवुचो बंद झालो बघ .. असे बोलून हात जोडल्यानं.
© श्री किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment