Thursday, June 18, 2020

कामगार कपात

कामगार कपात
त्या कॉर्पोरेट ऑफिसच्यासमोर  मोठ्या संख्येने कर्मचारी जमले होते .सर्वचजण चेयरमन यशवंत मनोहर राज यांनी वाट पाहत होते.
थोड्याच वेळात काळ्या बुलेटवरून त्यांचे आगमन झाले.मागच्या गाडीतून त्यांचे प्रिय मित्र आणि सेक्रेटरी चित्रगुप्त हसऱ्या चेहऱ्याने उतरले.
जमा झालेल्या कर्मचार्यांकडे पाहून श्री. य.म.राज यांच्या कपाळावर आठ्या पडल्या तर चित्रगुप्त नेहमीसारखे छद्मीपणे हसले.जमावाला हात करून ते ऑफिसमध्ये शिरले .
"चित्रगुप्ता... काय प्रॉब्लेम आहे ..?? हे लोक आज येथे का ..??  त्यांनी चिडून विचारले . 
"काही कल्पना नाही सर...?? त्यांनाच विचारू.." चित्रगुप्तानी गूढ आवाजात म्हटले.
"ठीक आहे ..बोलवा त्यांच्या प्रतिनिधींना .." य.म.राजनी ऑर्डर सोडली .
काही वेळातच  सात आठ कर्मचारी ऑफिसमध्ये शिरले आणि श्री.य.म.राजांपुढे उभे राहिले .
"बोला काय प्रॉब्लेम आहे ...."?? हातातील सोन्याची साखळी गरागरा फिरवत विचारले .
 "साहेब... तुम्ही कर्मचारी कमी करणार असे समजले ...याबाबत तुम्ही युनियनला ही विश्वासात घेतले नाही..." एक प्रतिनिधी मोठ्या आवाजात म्हणाला .
"यात काय सांगायचे ..?? राष्ट्रीय आपत्ती आहे. संपूर्ण देशात फक्त एकाच गोष्टीने मृत्यू होण्याचे प्रमाण चालू आहे.तेही इतरांच्या मानाने फारच कमी .बाकी सगळीकडे बंदच आहे .रस्ते ओस पडलेत .रस्त्यावरून माणसेही चालत नाहीत . एकट्या रस्ते अपघातात रोज अनेक माणसे मारली जातात पण सगळी वाहतूक बंद.तर ट्रेन अपघातही बरेच होतात पण चक्क लोकल ही बंद झाल्यात . त्याशिवाय इतर छोटे मोठे आजार आहेत  डॉक्टरांकडे रांगा लागतात ,मग कधी कधी त्यातही संधी शोधून काही माणसांना आणतो आपण ओढून . इतकेच काय तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण दहशतवादी हल्ले  घडवून आणायचो.पण आता ते ही बंद आहेत..." श्री.य.म.राज समजवण्याचा सुरात म्हणाले .
" पण हे सर्व अचानक का ...?? दुसऱ्या प्रतिनिधीने विचारले .
"त्या श्री. देवेंद्र यांनी निर्माण केलेल्या नवीन रोगामुळे एकाच प्रकाराने मृत्यू होतातय आणि ते ही हळू हळू . त्यासाठी आपली माणसे ही कमीच लागतात. मग इतरांना ठेवून काय करायचे . हल्ली आपण फक्त हॉस्पिटलजवळ आपली माणसे ठेवली आहेत . रेल्वे स्टेशन ,रस्ते ,देशाच्या सीमा ,वादग्रस्त प्रदेश इथून आपली माणसे कमी केली आहेत ..."यमराज यांनी स्पष्टपणे सांगितले .
 " पण इतकी वर्षे सर्व सुरळीत चालू होते . आम्हाला इंसेंटिव्हही मिळत होता . काही काही भागात तर खूपच काम होते ... "एक प्रतिनिधी चिडून म्हणाला.
" माहीत नाही... मोठया साहेबांच्या मनात काय चालू आहे..?? मागे झालेल्या वार्षिक सभेत  पृथ्वीवरील परिस्थितीची चर्चा झाली होती. मानवाच्या वागणुकीवरही थोडा रागाचा सूर होता . मानवजात स्वतःला सगळ्यात श्रेष्ठ समजू लागली आहे असा एकूण सूर दिसत होता . आतापर्यंत साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला . कधी समुद्र विभागाच्या साहेबाना सांगून मोठमोठ्या लाटा निर्माण केल्या तर कधी वरुण विभागात ऑर्डर देऊन वेळीअवेळी प्रचंड पाऊस पाडला तर पशु पक्ष्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांच्यामार्फत रोगराई पसरवली . इतकेच नव्हे तर सूर्य विभागाला सांगून काही भागात दुष्काळही पाडला.पण मानवाने त्यावर मात केली इतकेच नव्हे तर .आम्ही कुठेही थांबणार नाही...आमचे स्पिरिट दाखवले अश्या वल्गना ही केल्या...."श्री. य.म.राज आपले म्हणणे प्रतिनिधींकडे स्पष्ट करीत होते.
"पण मानव आपले बुद्धिकौशल्य प्रभावी पणे वापरतोय  ना...?? त्यांनी संहारक अस्त्रे शोधली. पण त्याचा वापर करणार नाहीत असे वचनही दिले . अणूशक्तीचा वापर लोक कल्याणासाठी केला . सतत नवनवीन औषधे शोधली. एकमेकांवर कंट्रोल ठेवला ..आणि मुख्य म्हणजे तो कोणत्याही अवघड परिस्थितीला सामोरा जातोय....." एक प्रतिनिधी म्हणाला .
"हो... पण तो निसर्गाला विसरलाय. आपल्या माणसांना विसरलाय.. त्या दिवशी त्यात्या मुरुडकरच्या प्रेताला फक्त बारा माणसे होती . त्या स्वातंत्र्यसैनिकांची शेवटची यात्रा भव्यदिव्य व्हावी म्हणून आपण रविवारी त्यांचे प्राण ओढून आणले . तर शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी होती म्हणून बरेचजण पिकनिकचा प्लॅन ठरवून बसले होते .तर काहींनी मेगाब्लॉकची कारणे सांगितली .तर काहींनी रोज ऑफिसमध्ये राब राब राबतो म्हणून एक दिवस आराम करू म्हणून टाळले . तर मागे मीनल राजवाडेच्या लग्नाला सुट्टी नाही म्हणून बऱ्याच लोकांनी व्हाट्स अँपवरच शुभेच्छा दिल्या तर काहींनी संध्याकाळी रिसेप्शन ठेवा तर येऊ असा निरोप दिला . पूर्वी चार चार दिवस लग्न समारंभ व्हायची पण आता फक्त सकाळी लग्न लावतात संध्याकाळी पूजा घालतात . दुसऱ्यादिवशी सर्व आपापल्या कामाला निघून जातात . पैसे जास्त खुळखुळले की नवीन फर्निचर घेतात ,जुने कवडीमोल भावाने विकून टाकतात. रस्ते , इमारती ,मोठमोठे कारखाने बनविण्यासाठी वृक्षतोड होतेय . पर्यावरणाचा नाश होतोय . रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी ..ट्राफिक जाम त्यातून विषारी वायू वातावरणात सोडला जातोय . लोकांना घरी जेवण बनवायचा कंटाळा सगळे बाहेरून रेडिमेड मागवले जाते आणि त्यामुळे आजार वाढतायत . जितके आजार वाढले तितकीच नवीन औषधे निर्माण झालीय . कारखान्यातील रसायने नदी आणि समुद्रात सोडली गेली त्यामुळे पाणी ही विषारी बनतेय . अरे ह्या मानवाने पाणी बनविण्याचे कारखानेही सुरू केले . लोकांना साधे पाणी पिणे कमीपणाचे वाटू लागले . काहीही झाले कुठे जायचे ठरविले की आम्हाला भरपूर कामे आहेत ,वेळ नाही हे ब्रीदवाक्य झालेय ... नुसते धावत असतात. म्हणूनच असे ठरविले असेल की मानवाला थांबवावे . घरात डांबून ठेवायचे ,इतकेच नाही तर त्याला उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी थांबवाव्या . कळू दे त्याला या सर्वांची किंमत . कळू दे त्याला कुटुंब आणि नातलगांची किंमत . मानवाला जगण्यासाठी किती कमी गोष्टींची गरज असेल याची जाणीव झालीच पाहिजे...."यमराज आवेशातच म्हणाले . त्यावर चित्रगुप्तनीही हसत मान डोलावली .
"पण साहेब... यातूनही मानव पुन्हा ताठ उभा राहील . तो या परिस्थितीवर नक्कीच मात करेल .आणि पुन्हा बेताल वागेल ..."एक प्रतिनिधी हसून म्हणाला.
"होय... शेवटी तो मानव आहे . एक लढवय्या योद्धा आहे. तो नक्कीच यावर मात करेल पण पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून यावर उपाय ही शोधेल.पण यावरून  त्याला पर्यावरणाचे महत्व कळेल . स्वच्छतेचे ,सुरक्षित अंतर ठेवायचे.. रोगांपासून लांब कसे राहायचे हे ही कळेल.त्याला अन्नाचे ,आपल्या कुटुंबाचे महत्व कळेल.अरे.... आपण त्यांचे शत्रू नाही आहोत ते आजही आपल्याला पूजतात. संकटकाळी आपली आठवण काढतात.आपण फक्त सृष्टीचा समतोल राखायचा प्रयत्न करतोय.आज तुमच्याच नाहीत तर लाखो मानवाच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झालाय . पण ते नक्कीच यातून मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्ग शोधून देतील . जा सध्या तुम्ही ही काही दिवस आराम करा .. पुढे तुमचेही काम पूर्ववत होईलच ..." असे बोलून यमराजनी हात जोडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment