Tuesday, June 23, 2020

लॉकडाऊन ...२

लॉकडाऊन ...२
रात्रीची वेळ... साधारण दीड वाजला असेल.त्या एक मजली लांबलचक चाळीत भयानक शांतता होती.
चौकीच्या गाडीने त्याला चाळीजवळ सोडले.
" चल.. उद्या भेटू .."सहकार्यांना हात करत तो चाळीत शिरला.त्याच्या हालचालीने काही घरात दिवे पेटले तर काहींनी खिडक्या उघडून पाहिले . त्यांच्याकडे ओळखीचे हसत.. हात उंचावत तो स्वतःच्या दारात उभा राहिला.
दरवाजावर थाप मारण्याऐवजी त्याने मोबाईलवरून फोन केला.घरात कुठेतरी रिंग वाजली आणि काहीवेळाने बंद झाली. आतून पावले वाजताच तो दरवाजपासून दूर उभा राहिला.
दरवाजा उघडला गेला आणि दारात ती उंभी राहिली .. अर्धवट जागी,केस विस्कटलेले . अंगावर फुलफुलांची डिझाईन असलेला डार्क ढगळ गाऊन.
कितीवेळा सांगितले तिला असा ढगळ गाऊन घालत जाऊ नकोस म्हणून ,काकूबाई दिसतेस ... पण प्रत्येकवेळी हसते. आताही त्याला पाहातच ती गोड हसली.परत आत शिरून पाण्याने भरलेली बादली घेऊन आली आणि हातात टॉवेल. 
त्याने काही न बोलता अंगावरचे कपडे काढून त्या बादलीत टाकले . पाकीट घड्याळ ,पट्टा, मोबाईल  बाजूला ठेवला आणि थेट बाथरूममध्ये शिरला.
थंड पाणी अंगावर ओतून कमरेला टॉवेल गुंडाळून तो बाहेर आला तेव्हा ती किचनमध्ये जेवण गरम करीत होती. तिला पाठमोरे पाहून त्याच्या शरीरात वीज सळसळली . किती दिवस झाले तिला जवळ घेऊन . हा 21 दिवसाचा लॉकडाऊन ..त्याआधी होळीच्या निमित्ताने संवेदनशील ठिकाणी ड्युटी.
साल....!!  या चाळीत दिवसा काहीच करता येत नाही. दिवसा दार लावले तरी शेजारी काहीतरी मागायला किंवा द्यायला दार ठोठावणार.दुपारी पोरगा शाळेतून येणार. आमची फक्त रात्रीच मज्जा .... तो चरफडला. न राहवून तिच्या मागे उभा राहिला. 
त्याच्या चाहुलीने ती मोहरली .त्याने अलगद तिला मागून मिठी मारली . ती शांत उभी राहिली ..एक सुस्कारा सोडून तिने लाजेने डोळे मिटून घेतले. 
"पोरगा उठेल ना ...?? ती लाजून पुटपुटली .
"काय पण ...?? रात्री दोन वाजता आठ वर्षाचा पोरगा कसा उठेल ..."?? तो चिडून म्हणाला.
" पण नको ...मला अडचण आहे ...".तिच्या आवाजात अपराधीपणा होता.
"भेxx कधी....?? तो चिडून बोलला.
"पहिला दिवस .... तुम्हाला सांगणारच होते येताना पॅड घेऊन या. पण कधी याल त्याचा भरोसा नाही . म्हणून शेजारच्या मालतीकडून घेतले . उद्या येताना आणा म्हणजे तिचे तिला देऊन टाकू ...." ती खाली मान घालून म्हणाली.
लॉकडाऊनमुळे हे ही काम वाढले तर ...तो स्वतःशी हसला .  तिच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्याकडे पाहून तो खजील झाला.
 त्याला आठवला तो हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर. कोरोनाचा पहिला पेशंट आल्यापासून तो ड्युटीवर आहे . आंघोळ कधी करतो ,टॉयलेटला कधी जातो ते अजून पहिलेच नाही . घरदार सगळेच विसरून गेलाय.  त्या दिवशी म्हणाला हे एकदा संपले की  दोन खंबे मारून दोन दिवस झोपून राहीन . त्याच्या एका खंब्याची जबाबदारी आपण घेतलीय .काय साला माणूस आहे की मशीन ...?? आणि आपण बायको सापडली की चिकटलो.
 काही न बोलता त्याने तिची हनुवटी उचलून चेहरा जवळ आणला आणि थरथरणार्या ओठावर हळूच ओठ ठेवले.
" ह्याची तर अडचण नाही ना तुला ... तो हळूच पुटपुटला . तिचा संयम सुटला . डोळ्यातील अश्रू त्याचा चेहरा भिजवू लागले . 
"कधी संपणार हो हे ..."असे म्हणत त्याच्या छातीवर आपले डोके टेकविले .
"संपेल आपणच संपवू या रोगाला .. विश्वास ठेव ...तो जड आवाजात उत्तरला .
सकाळी सहाला नेहमीप्रमाणे जाग आली . त्याने घाईघाईने आवरले . तिने दिलेला चहा नेहमीप्रमाणे अर्धा पिऊन अर्धा तिच्यासाठी ठेवला.मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत "ह्याला माझा फोटो तरी दाखव... नाहीतर विसरून जाईल मला ..." गमतीने म्हणत तिच्या डोक्यावर टपली मारून बाहेर पडला .
"मास्तर आज तुमची ड्युटी फोरास रोडला ...." साहेबांनी हुकून सोडला . 
"त्या बायकांकडे कोणी जाणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि हो कोणीच नाही म्हणून तुम्ही जाऊ नका ...."साहेब हसत म्हणाले . सर्वच हसत बाहेर पडले.
 गल्लीच्या तोंडावरच त्याने बैठक ठोकली . सकाळी उगाचच फिरणाऱ्यांवर दोनचार काठीचे फटके मारले . तशी ही गल्ली रात्रीची जागी असते पण लॉकडाऊन मुळे दिवसरात्र शांत होती .
काहीजणी खिडकीत दात घासत बसल्या होत्या तर काही एकमेकींशी गप्पा मारत होत्या . त्याचे लक्ष गेले की काहीजणी मुद्दाम इशारा करीत होत्या .एकूण वातावरण हलके फुलके होते .
त्या कोपऱ्यातील खिडकीत ती उभी होती . फिट्ट बसणार ब्लाऊज खाली शॉर्ट परकर. नजर रोखून त्याच्याकडे पाहत होती .तिच्या चेहऱ्यावरचा माज नजरेतही स्पष्ट दिसत होता . तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या शरीरात वीज सळसळली .. त्याची नजर तिने बरोबर हेरली आणि नजरेने खेळ तिने चालू केले .
तो सहज राउंड मारायला म्हणून उठला आणि फिरत फिरत तिच्या दारासमोर उभा राहिला .
"बसणार का ...?? साहेब.. आम्हाला ही तुमची सेवा करायची संधी द्या की ..... किती दिवस सलग ड्युटी करतायत . पोटाची भूक असते तशी शरीराची ही असते की .. या मोकळे व्हा ... आज फ्री देते मी ... ती त्याच्या शरीराला चिकटून डोळ्यात डोळे रोखून म्हणाली .
त्याच्या शरीरातील रक्त जोरात धावू लागले . बायकोला रात्री मारलेली मिठी डोळ्यासमोर आली . क्षणभर त्याच्या डोळ्यात वासनेची ठिणगी उडाली .पण पुन्हा तिच्या डोळ्यातील अश्रू आठवून विझून गेली . काही न बोलता त्याने तिला बाजूला केले .
"साली ... उठबस हेच आठवत का तुम्हाला .... "तो चिडून म्हणाला .
"काय करू साहेब ... ..जो तो आपल्या परीने सगळ्यांना मदत करतोय. आमचे शरीर हेच आमचे भांडवल आहे .आज ते फुकटही कोणी घेत नाही .  वीस दिवसांपूर्वीच टेस्ट करून घेतलीय आम्ही . त्यानंतर आतापर्यंत घरातच बसून आहोत . सेफ आहोत आम्ही .  पोटाची भूक भागवायला सर्वच तयार होतात पण शरीराची भूक भागवायला आम्हाला पुढे यावेच लागेल . म्हणून आज तुम्हाला ऑफर केली . शेवटी समाजाला आमचेही देणे लागतेच की ....ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली . 
तो काही न बोलता बाहेर पडला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment