Tuesday, June 23, 2020

लॉकडाऊन ....३

लॉकडाऊन ....३
"अहो... बाबांना टॉयलेटला जायला मदत करा ...."तिची हाक ऐकताच त्याने लॅपटॉपमधून डोके बाहेर काढले आणि कपाळावर आठ्या आणत बायकोकडे पाहिले.
"मी चपात्या करतेय म्हणून सांगितले तुम्हाला ...." तिने चेहरा बारीक करून म्हटले.
तसा तो नाईलाजाने उठला.
गेले पंधरा दिवस त्याचा बाप अंथरुणावर पडून होता.वॉकला जाताना एका सायकलस्वाराने धडक दिली आणि कंबरेचे हाड फॅक्चर झाले.
हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर त्यांच्यासाठी एक माणूस चोवीस तास ठेवला होता.त्यामुळे फारसे लक्ष द्यायची गरज नव्हती .पण लॉकडाऊन सुरू झाला आणि तो यायचा बंद झाला . ह्यालाही वर्क फ्रॉम होमची ऑर्डर मिळाली आणि हा पण आजपासून घरीच बसला .
चेहऱ्यावर त्रासिक भाव आणूनच तो त्यांच्याजवळ गेला.
"अरे फक्त व्हीलचेयरवर बसव बाकी करेन मी.." बाबा मिस्कीलपणे म्हणाले.तसा तो हसला.
"नको... तितका वेळ नाहीय ...  कामे आहेत.."असे म्हणत त्याने दोन्ही हातानी त्यांना उचलले आणि टॉयलेटच्या दिशेने चालू लागला.
"असेच मी तुला उचलून न्यायचो बघ.गावी आंब्याच्या झाडावरून पडला होतास आणि पाय  फॅक्चर झाला होता . तेव्हा असेच तुला उचलून सगळीकडे घेऊन जावे लागायचे .."ते हसत हसत म्हणाले.
त्याने काही न बोलता त्यांना कमोडवर ठेवले "झाले की सांगा .... बाहेर मी उभा आहे ...."
 "उपकार नाही केले ... मुलगा आहे मी तुमचा .कर्तव्यच होते ..तो मनात पुटपुटला .
लहानपणापासूनच बापविषयी एक प्रकारची अढी मनात बसली होती .त्याचे वडील अध्यात्मिक वृत्तीचे कीर्तनकार आणि समुपदेश. गावोगावी कीर्तन करायचे. आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका.
संसार काही फार सुखाचा नव्हता . ह्याला पहिल्यापासून कॉम्पुटर ..नेटची ..आवड .पण वडिलांनी कॉमर्सला  टाकले . आपली आवड बाजूला सारत तो पदवीधर झाला आणि चांगल्या कंपनीत जॉब मिळाला . तसेही मुंबईत आता सर्व कॉर्पोरेट ऑफिसच उभी राहिली होती . मग त्याने हळू हळू कॉम्पुटरचे विविध कोर्स केले आणि आता मोबाईलचे नवीन अँप तयार करू लागला .
तसे त्याचे लग्नही मानविरुद्धच झाले होते .एका मुलीवर त्याचे प्रेम होते .पण वडिलांना मंजूर नव्हते .त्यांनी त्याला दोन वर्षे थांबायला सांगितले पण मुलगी थांबली नाही .नाईलाजाने वडिलांनी ठरविलेल्या मुलीशी लग्न करावे लागले . त्याची बायको स्वभावाने खूप चांगली होती ..नोकरी सांभाळून.. सर्वांना सांभाळून संसार करीत होती. पण त्याच्या मनात राहिले ते राहिलेच.
आज त्याला नाईलाजाने का होईना वडिलांचे सर्व करावे लागत होते . रोज उठून स्पंजिंग करणे औषधे देणे नैसर्गिक विधी .... हे सर्व चालूच होते.
तो वडिलांशी फार काही बोलत नव्हता पण बायकोचे आणि वडिलांचे एकमेकांशी छान पटत होते असे वाटते . ते सतत काहीतरी मिस्कील बोलून वातावरण प्रफुल्लित ठेवत होते . संध्याकाळी आपल्या सहज सोप्या शैलीत नातवाला कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार देत होते . पहिल्यांदा त्याचे डोके फिरायचे पण हळू हळू त्याला ते आवडू लागले.
मग तो ही हळूहळू मोकळा होऊ लागला . कधी कधी त्यांच्याबरोबर पत्यांचा डाव बसू लागला . ते नेहमी त्याच्या लहानपणीच्या आठवणी काढून सर्वांना हसवायचे . आई मध्येच गेली आणि तीही बाबांमुळेच असा त्याचा समज . पण तरीही बाबांनी दुसरे लग्न केले नाही त्याचे कारण ही उमजू लागले.
त्या दिवशी मित्राने कुठूनतरी शोधून मटण आणून दिले होते . संध्याकाळी घरभर मटणाचा वास दरवळू लागला . "च्यायला... ह्या लॉकडाऊनमध्ये बरेच दिवस दारूच प्यायलो  नाही .. तो मनात म्हणाला. तशी घरात एक बॉटल होती . पण आतापर्यंत प्यायची वेळच आली नव्हती.
 त्याने हळूच बायकोला खूण केली . तिने रागाने डोळे वटारले. बाबांकडे खूण केली . तो चरफडत गप्प बसला .
इतक्यात बाबांची हाक ऐकू आली . 
"चिरंजीव .. आज छान बेत आहे वाटत जेवणाचा ...?? 
तो हसून हो म्हणाला .
" मग नुसते मटण खाणार ..?? आधी काय घेणार की नाही ..."?? बापाने अंगठा दाखवीत हसत विचारले.
त्याने खजील होत मान खाली घातली.
" घे रे ... !! उगाच मन मारू नकोस .. मला माहितीय तू घेतोस ते ... आणि तू मोठा झालायस.. बरे वाईट कळते तुला ...चल आजचा दिवस मी कंपनी देतो तुला ..."?? ते  हसत हसत म्हणाले.
" काहीही काय बाबा ....?? तुम्ही घेत नाही माहितीय मला .." तोही हसत म्हणाला.
"हो पण कोल्डड्रिंक तर घेईन... चल इथेच घेऊन ये आणि दरवाजा लावून घे ...." बाबांनी ऑर्डर सोडली तसा तो सगळा सरंजाम घेऊन आत आला. 
त्याला कसेतरीच वाटत होते पण बाबांनी हळू हळू त्याची भीती घालवली . तो अजून मोकळा झाला . 
"तुझी जुनी मैत्रीण काय करते आता ..."?? त्यांनी अचानक प्रश्न विचारला आणि तो हडबडला .. 
"माहीत नाही.. तिचा घटस्फोट झाला मग बहुतेक तिने दुसरे लग्न केले . पुढे माहीत नाही ..." तो खाली मान घालून म्हणाला.
"दुसरा ही घटस्फोट झाला ... बाबा  कोल्डड्रिंकचा एक घोट घेत म्हणाले ... तुला खरेच वाटते ती तुझ्यासाठी योग्य होती....??  ती मुलगी चांगली असेल पण ती आपल्याला सूट झाली असती ..?? तुझ्यासाठी दोन वर्षे ही थांबली नाही ती आणि स्वतः चे संसार ही सांभाळू शकली नाही .... आणि ही मुलगी ....?? आज तुला संभाळतेय ,माझा त्रास सहन करतेय नोकरी करतेय ... मला वाटते त्यावेळी मी घेतलेला निर्णय योग्यच होता ". त्यांनी नजर रोखून विचारले .
"पण शिक्षणाचे काय ....?? तो चिडून म्हणाला .
"येथील कारखाने कमी होऊन फक्त कॉर्पोरेट ऑफिस राहतील याचा अंदाज होता मला . कीर्तनाला ..समुपदेशन.. करायला जायचो तेव्हा हेच ऐकू येत होते. म्हणून तुला कॉमर्सला घातले . नंतर नोकरी मिळाल्यावर तू काहीही करशील याची खात्री होती मला . आपण मध्यमवर्गीय माणसे . शिक्षण आणि नोकरी आपल्यासाठी महत्वाची मग दुसरे छंद . तुझी आई गेली आपली ओढाताण होऊ लागली . दुसरे लग्न केले तर तुझ्यासकट बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील हे कळले मला .म्हणून दुसरे लग्न केले नाही .. पण आज आपली परिस्थिती बघून वाटतेय योग्य वेळी योग्य निर्णय घेतले मी .. परिस्थितीशी तडजोड त्यावेळी ही केली मी .. आणि आजही करतोय ...."त्याच्या हातातील दारूच्या ग्लासाकडे बोट दाखवीत  म्हणाले .
त्याने काही न बोलता ग्लास रिकामा केला . बाबांना उचलून टॉयलेटला घेऊन गेला. रात्रीचे जेवण शांततेत  झाले. 
रात्री झोपताना तो बायकोला म्हणाला .."लॉक डाऊन संपल्यावर त्या मेडला चोवीस तास बाबांच्या मदतीला ठेवायची गरज नाही . आठ तासच ठेवू . ते बरे होईपर्यंत मी वेळेवर घरी येईन .
 बायकोने हसून मान डोलावली आणि त्याच्या मिठीत शिरली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment