Thursday, June 18, 2020

लॉकडाऊन ...१

लॉकडाऊन ...१
शेवटी नाना मुळेकर गेले आणि आमच्या सोसायटीतील शेवटचा स्वातंत्र्यसैनिक अनंतात विलीन झाला.
अर्थात नव्वद हे जाण्याचेच वय आहे म्हणा.. त्यामुळे अलोकला.. म्हणजे त्याच्या मुलाला फारसे दुःख झाले नाही.उलट गेले काही महिने तो आणि नाना सकाळी  देवाच्या एकत्रच पाया पडायचे आणि ने रे बाबा ..पटकन ... असे देवाकडे मागणे मागायचे.
 याचा अर्थ असा नव्हे अलोकला त्यांचा काही त्रास होता उलट घरातले सर्वच त्यांचे आनंदाने करायचे .
अर्थात गेले काही दिवस देवाकडे मागणे बदलले होते . हा लॉकडाऊन संपूदे मग उचल... असे रोज सांगितले जात होते . शेवटी  देवच तो .. ह्यांचेच दिवसच भरले तर तो काय करणार .. नेले रात्री उचलून ..
च्यायला अलोक हैराण .. सर्टिफिकेट द्यायला कोण डॉक्टर तयार होईना .शेवटी सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यावे असे ठरले.
 लॉकडावूनमुळे अँबुलन्स ही सहजी मिळेना. शेवटी विक्रमने कशीबशी अर्रेन्ज केली आणि बंड्याला अलोकबरोबर पाठवून दिले.
ह्या कोरोनामुळे म्हाताऱ्याची रवानगी थेट शवागृहात......"दोन दिवसांनी बॉडी घेऊन जा .. "असा स्पष्ट आदेश अलोकला मिळाला.डॉक्टरांची ओळख काढली गेली पण या कोरोनामुळे सगळे कायदे कडक झाले आहेत असे सांगण्यात आले .नाईलाजाने अलोक घरी आला.
शेवटी दोन दिवसाने नानांची बॉडी घरी आणली गेली .कोरोना नाही यातच सर्वांनी आनंद मानला.
पण बॉडी डायरेक्ट घेऊन जायची की घरी न्यायची यावर चर्चा झाली.हरी म्हणतो काहीही होवो पण म्हाताऱ्यावर विधीवत अंत्यसंस्कार झाले पाहिजे.
 विक्रम हळूच म्हणाला "त्यासाठी चार माणसे तरी गोळा झाले पाहिजे ना ....?? आणि सामानाचे काय ..."??  हरीने तुच्छ नजरेने त्याच्याकडे पहाताच विक्रम मागे सरकला.
अलोकही म्हणाला "बाबांना शेवटचे घर पाहू दे.नाहीतर आयुष्यभर मनात राहील.."
शेवटी बॉडी घरी आणली.पण सोसायटीतले कोण जवळ यायला मागेना.बंड्या आणि अलोकनेच बॉडी घरात आणली आणि हलक्या आवाजात रडारड चालू झाली .
मी आणि विक्रम सामान आणायला गेलो .हारफुले काहीही मिळणार नाही असे दुकानदाराने स्पष्ट सांगितले .
"जे मिळेल ते दे .."असे बोलून सामान घेऊन आलो.
सामान पाहतच हरीच्या अंगात नेहमीचा आवेश संचारला . ताबडतोब बंड्याला घेऊन तिरडी बांधायला सुरवात केली . मी भात शिजवायला विस्तव पेटविणार इतक्यात हरीने थांबविले.
"भाताची गरज नाही..लॉकडाऊनमुळे काही मिळत नाही . रस्त्यात गरिबाला हे तांदूळ दे ...." तो सहज म्हणाला.
"मग ते विधिवत अंत्यसंस्कार ...?? मी भुवया उंचावत विचारले.
" तू मला शिकवू नकोस ... आहे त्यात ऍडजस्ट करीन मी .. तसाही म्हातारा काही बोलणार नाही ..."हरीने तिरसटपणे उत्तर दिले . मी काही न बोलता बाजूला झालो.
तयारी झाल्यावर परत बॉडीला खाली आणले .पाय धुवून तिरडीवर झोपविले.
" पक्याच्या घरसमोर तुळस आहेत भरपूर ..त्याची पाने काढून हार बनव..." हरीने पुन्हा ऑर्डर सोडली . मी मान हलवून तुळस काढायला गेलो.
"चला निघुया .... "हरी अलोककडे पाहून म्हणाला.
इतक्यात विक्रम कुठूनतरी हार घेऊन आला
 "अरे घरच्या देवाचे काढून आणलेस की काय ..."?? हरीने विक्रमला सोसायटीला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने विचारले. विक्रमच्या डोळ्यातील राग पाहून  जीभ चावली.
तिरडी उचलायला बंड्या आणि विक्रम पुढे झाले. मागे पुढे राहून त्यांनी तिरडीला हात लावला तोच पुन्हा हरी ओरडला .. "च्यायला.... ठेवा खाली. दोघात काय उचलता ..?? चार माणसे पाहिजे इतकी अक्कल नाही का तुम्हाला ..."?? 
"हरीभाऊ .. इतकी माणसे आहेत का ..?? आणि अँम्ब्युलन्सही जवळ आहे . नेताना तर बॉडी दोघांनीच वर नेली होती.." बंड्या उत्तरला. 
"बंड्या... वर नेताना ती बॉडी होती रे.आता ते प्रेत झाले आहे आणि प्रेताला खांदा द्यायला चार माणसेच हवी ." हरी बंड्याला समजावत म्हणाला.
शेवटी हरी गुरू होता त्याचा .
"मग आता चार कोण ..."?? मी विचारले.
" तू .. मी.. बंड्या .. विक्रम .. मडके अलोक धरेल. चला विधीनुसार जितके जमेल तितके करू ." हरी तिरडीला हात लावत म्हणाला ... आणि आम्ही पुढे झालो .
तिरडी आत ठेवल्यावर हरी बंड्याच्या कानाला लागून पुटपुटला. तसा बंड्या मान डोलवत मोटारसायकलवर बसला .
"भाऊ.. चला बसा आणि तो मास्क नीट लावा ." मला सूचना करत बंड्याने बाईक पुढे आणली .
एक मोटारसायकल पुढे... एक मागे मध्ये अँम्ब्युलन्स अशी नानांची अंत्ययात्रा निघाली . रस्त्यात बंड्याने राजू टायरवाल्याकडून सायकलचे दोन टायर घेतले .
"आता हे कशाला ..."?? मी चिडून विचारले .
"हरिभाऊ बोलले तूप वापरायचे नाही ते घरी कामास येतील. रॉकेल कोण देणार नाही.टायर घे चिता लवकर पेटेल..."बंड्या शांतपणे म्हणाला .. 
स्मशानात शिरताच हरीने सवयीनुसार पटापट विधी करून नानांना अग्नी दिला . 
 सोसायटीत येताच विक्रमने हरीच्या खांद्यावर हात ठेवला .."चल तुझी सोय करतो.."
हरीने शांतपणे खांद्यावरचा हात काढला.
"ते नको रे .. पोरांसाठी बिस्किट्स मिळतात का ते बघ . घरातली बिस्किट्स संपून गेली . पोर रोज विचारतात बिस्किट्स कधी आणणार ...??त्यांना काय माहीत रे कोरोना म्हणजे काय ....?? आपल्या दुकानात तर मिळतच नाही"
इतक्यात अलोक बाहेर आला .त्याच्या हातात एक मोठा बॉक्स होता . त्याने तो हरीच्या हातात दिला . आतमध्ये चार पाच प्रकारचे आठ दहा बिस्किट्सचे पुडे होते .
"हे काय ...?? हरीने आश्चर्याने विचारले .
"अरे नानांची आहेत. त्यांना खाताना खूप त्रास व्हायचा  मग दुधातून बिस्किट्स द्यायचो त्यांना . बरीच आणलेली त्यात ही राहिली . आमच्याकडे लहान मूल नाहीत ,तू घेऊन जा..."  अलोक डोळे पुसत म्हणाला . भारावलेल्या चेहऱ्याने हरीने तो बॉक्स घेतला आणि हळूच डोळे पुसले .
"तुझ्या बिस्किट्सची सोय झाली.आता तुझी सोय मी करतो. कालच नटराजच्या मागच्या दारातून एक बाटली आणलीय . अर्धी घेऊन जा माझ्याकडून .. चल.. पाठीवर थाप मारून विक्रम हरीला ओढत घेऊन गेला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment