Saturday, November 14, 2020

पहिली आंघोळ

पहिली आंघोळ 
रात्रीपासूनच ती खुश होती.रात्री झोपताना त्याने अचानक सांगितले उद्या कामावर जाणार नाही.पहिल्यांदा तिला नेहमीप्रमाणे थट्टाच वाटली.
"नाहीतर काय ..."?? हा माणूस अत्यावश्यक सेवेत असलेला.कधीही उठून कामावर निघायच्या तयारीत. अर्थात लग्नाआधी याची कल्पना त्याने तिला दिली होती. पण प्रेमाच्या धुंदीत तिने थोडे दुर्लक्ष केले.
 लग्नानंतरची पहिली दिवाळीच काय.... पण बरेच सण एकत्र साजरे केले होते.त्यामुळे  ती बेसावधच होती. पण नव्याची नवलाई संपली आणि त्याचे रुटीन चालू झाले . त्यानंतर ते आतापर्यंत तो कोणत्याच सणाला घरी नव्हताच .पण काल रात्री त्याच्याकडून कळल्यावर तिने आनंदाने त्याला मिठीच मारली आणि जुन्या आठवणी उगाळत कधी झोप लागली ते कळलेच नाही .
सकाळी तिला उशिराच जाग आली. त्याला बाजूला झोपलेले पाहून रात्री ऐकलेले सत्यच होते याची तिला खात्री पटली. गाढ झोपेत त्याचा चेहरा किती निरागस दिसत होता....आज कित्येक वर्षांनी त्याला असे गाढ झोपलेले पाहिले होते. न राहवून तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकले आणि त्याने खाडकन डोळे उघडले .अर्थात वर्षानुवर्षाचे सावधगिरीचे प्रशिक्षण त्याच्या अंगात मुरलेले होते.
"काही नाही हो झोपा अजून ... तिने अलगद त्याच्या गालावर चापट मारीत म्हटले . त्याने हसून कूस बदलली . ती गुणगुणत स्वयंपाकघरात शिरली . जाताजात बाजूच्या बेडरूममधील मुलांकडे नजर टाकायला विसरली नाही .आज सर्व काही आरामात करायचे होते. तिने सर्वांच्या अभ्यंगस्नानाची तयारी केली. उटणे आणि गरम पाणी तयार करून पुन्हा बेडरूम मध्ये शिरली .
तिला पाहून तो उठला.हात धरून तिने पाटावर बसविले आणि हळुवारपणे सर्वांगाला उटणे चोळू लागली. आजचा हा क्षण तिला जपायचा होता . तो भान हरपून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता . मनासारखे उटणे लावून झाल्यावर तिने त्याला बाथरूममध्ये ढकलले .
तो आंघोळ करून बाहेर आला आणि मुलांच्या बेडरूममध्ये घुसला . दोघांनाही आवाज देत त्याने अंगावरून पांघरूण खेचले . समोर पप्पांना पाहून मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला . ओरडून त्यांनी त्याच्या अंगावर उड्याच मारल्या . आजच्या दिवशी पप्पा सोबत दिवाळी साजरी करायला मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता .
सर्वांची आंघोळ झाल्यावर एकत्रच फराळाला बसले .तिच्या आणि मुलांच्या अंगावर नवीन कपडे शोभून दिसत होते .त्याने मात्र जुनेच कपडे चढविले होते. सणासुदीला कामावर जायचे असेल तर नवीन कपडे घेऊन फायदा काय ....?? हा त्याचा हिशोब .
ती मात्र आज जास्तच सुंदर आणि खुश दिसत होती. सतत स्वतःशी गुणगुणत हसत वावरत होती. आज पहिल्यांदा तो मुलांसोबत ओवाळणीला बसला होता .
खरे तर आज तो मनातून अस्वस्थ  होता.सणाला घरी राहून काय करायचे हेच विसरून गेला होता.सकाळी मुलांना उठवून पुन्हा बेडरूममध्ये जाऊन मोबाईलशी चाळा करीत बसून होता .बायकोची लगबग मुलांचा आनंद यामध्ये तो स्वतः कुठेच नव्हता.
 आजच का आपल्याला घरी राहायला सांगितले...??? सिनियर म्हणून..??? त्या नितीन मानेला बोलावले . त्याचे तर मागच्या वर्षी लग्न झालेय.एक वर्ष सगळे सण साजरे करायला दिले त्याला आणि या वर्षीपासून त्याला ड्युटी...?? हे चक्र असेच चालू राहणार . माझ्याजगी तो असणार .  नको त्याच्यावर ही पाळी नको . मला सवय झालीय मीच यापुढे ड्युटी करेन. मनाशी निश्चय केल्यावर त्याला जरा हायसे वाटले. 
फराळ करताना त्याला हे आठवले आणि समोर तिचा सुंदर चेहरा आला .भावना अनावर होऊन त्या डोळ्यातून अश्रूवाटे बाहेर पडल्या. 
त्याच्या अश्रूंचा थेंब ताटातील चकलीवर पडला . घाईघाईने ती चकली उचलणार इतक्यात मुलाने झडप टाकून तीच उचलली. तोंडाने एक तुकडा तोडला आणि मोठ्याने ओरडला ." आई चकली खारट...." ती धावत बाहेर आली आणि त्याचा चेहरा बघताच ती थबकली . हळूच मुलाच्या हातून चकली काढून घेतली आणि तोंडात टाकली . कुठे खारट आहे ....?? उलट ही चकली आज पहिल्यांदा गोड लागतेय मला ....
शुभ दीपावली 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment