Tuesday, November 10, 2020

दोस्ती बडी चीज है ..२

दोस्ती बडी चीज है ....२
शासकीय तंत्रनिकेतन ठाणे  (जीपीटी )ला तिने सिव्हिल इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतला तेव्हा आम्ही तिसऱ्या वर्षात होतो. त्यामुळे सर्वात सिनियर अर्थात दादा होतो. ती लहान चणीची  मुलगी  छोट्या बहुलीसारखी दिसायची. ठाण्यातच वास्तव्य असल्यामुळे एक प्रकारचे धाडसीपणा  तिच्यात दिसत होते.ममता वाडकर असे शुद्ध मराठी नाव.दिसायला सुंदर आणि मुळातच  कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमीच.... त्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडेच.तिच्या बरोबर अजून तीन चार जणी होत्या.त्यांच्यामुळे मुलींची संख्या अचानक वाढली.पण दहाचा आकडा काही पार झाला नाही. आमचा ग्रुपतर इतर गोष्टीतच लक्ष घालून होता आणि एकदम ज्युनियरकडे कुठे लक्ष द्यायचे म्हणून फारसे काही मागे लागलो नाहीच .ठाणे एसटी डेपो आणि कॉलेजमध्ये समोरासमोर आलो की हाय... हॅलो... व्हायचे तेव्हडेच. हळू हळू आमचे कॉलेजला जाणे कमी झाले आणि इतरांचा दंगा वाढू लागला . त्यावर्षी गॅदरिंगला तिने सुंदर डान्स केला आणि तिच्यातील ह्या गुणाचीही ओळख झाली .  पुढे आम्ही बाहेर पडून आपापल्या मार्गाला लागलो . काही वर्षांनी आमचा ग्रुप सोडला तर दुसऱ्या कोणत्याही ग्रुपशी आणि कॉलेजशी संबंध राहिला नाही.व्हाट्स अप सुरू झाले आणि आमच्या बॅचचे बहुतेक सर्वच एकत्र झालो . 
एके दिवशी फेसबुकवर सर्च करताना तिचा फोटो पाहिला.रिक्वेस्ट टाकावी की नाही या विचारात दोन तीन दिवस गेले.आपल्याला इतक्या वर्षानंतर ती ओळखेल का ..?? हा मोठा प्रश्न .शेवटी बघू तर ... इतर शिव्या देतात तशी ही शिव्या देईल आणि फार फार तर ब्लॉक करेल . असा विचार करून रिक्वेस्ट पाठविली .काही दिवसांनी तिने रिक्वेस्ट स्वीकारून चक्क ओळख ही दाखवली. मग मोबाईल नंबर घेणे आलंच . पण फोनवर बोलणे काही झाले नाही . चॅटिंग करताना कळले की ती आता हरयाणा येथील गुरगावमध्ये स्थायिक झालीय. ठाण्यातून डायरेक्ट गुरगाव म्हणजे मोठीच उडी ... एक मुलगा आणि नवरा असे त्रिकोणी कुटुंब . . त्याच दरम्यान आमच्या ग्रुपचे स्टार्ट गिविंग फौंडेशन सुरू झालेले .  त्याचे अपडेट्स फेसबुकवर होतेच.अचानक तिने मेसेज केला .. मलाही तुमच्या उपक्रमात सहभागी होणे आवडेल . आमच्या उपक्रमात सगळ्यांचे स्वागत असते त्यात ही जीपीटीची...... हिला नाही बोलूच शकत नव्हतो . ती आमच्या ग्रुपमध्ये सामील झाली आणि वेळोवेळी आमच्या उपक्रमाला प्रोत्साहन देत राहिली . वेळेवर आर्थिक मदत करायला ही पुढे राहिली . 
मागच्या आठवड्यात तिचा मेसेज आला . ठाण्यात एका आठवड्यासाठी येतेय .. भेटू शकतोस का ...?? तिचे घर ही माझ्या कंपनीजवळ . मी ताबडतोब हो  म्हटले आणि आज तो योग जुळून आला . बिल्डिंग खाली तिला पाहिले आणि मधली 28 वर्षे निघूनच गेली . तोच हसरा चेहरा....  जणू कालच कॉलेज संपलाय . अर्थात आता ती लहान चणीची बाहुली राहिली नव्हती आणि मीही तो कॉलेजकुमार नव्हतो . पण तीच ओळख ,आणि चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून गेले . गडकरीच्या हॉटेलमध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . काय बोलू काय नको असे झालेले . कॉलेजच्या आठवणी ..स्टार्ट गिविंगचे उपक्रम ...मित्रांची चौकशी यात तास कसा गेला ते कळलेच नाही .  अजून बरेच काही बोलायचे होते पण वेळेअभावी शक्य झाले नाही . शेवटी आठवणींचा सेल्फी काढून आम्ही विरुद्ध दिशा पकडली . 
खरेच दोस्ती बडी चीज है ... 
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment